सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर!
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे सध्या राजकारण तापले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या निकालानुसार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र निकालानंतर भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस आयुक्तांनी २ महिने सुशांत प्रकरणी एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंहच्या परिवाराला न्याय मिळेल,’ असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी जोर धरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे, असे आदेशही दिले आहेत. तसेच बिहार पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा योग्य असल्याचेही म्हटले आहे. या प्रकारामुळे मुंबई पोलिसांसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.