ठाकरे सरकारची मस्ती उतरली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020
Total Views |

agralekh_1  H x


मुंबई आपल्याच वाडवडिलांची जहांगिरी असल्याच्या थाटात वावरणार्‍या आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात बिहार पोलिसांना आडकाठी करणार्‍या व सीबीआयलाही ‘क्वारंटाईन’ करु पाहणार्‍या शिवसेनेची मस्ती सर्वोच्च न्यायालयाने उतरवली. तसेच आता सीबीआयच्या अखत्यारित हे प्रकरण गेल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सत्य लपवण्याचा डाव उधळला जाईल, याची खात्री वाटते.



मुंबई आपल्याच वाडवडिलांची जहांगिरी असल्याच्या थाटात वावरणार्‍या आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात बिहार पोलिसांना आडकाठी करणार्‍या व सीबीआयलाही ‘क्वारंटाईन’ करु पाहणार्‍या शिवसेनेची मस्ती सर्वोच्च न्यायालयाने उतरवली. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी पाटण्यात दाखल केलेली तक्रार मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी याचिका अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने केली होती, तर त्या तक्रारीवरुन बिहार पोलीस तपासासाठी मुंबईतही आले. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांना कसलेही सहकार्य केले नाही. उलट मुंबईत आलेल्या बिहारच्या पोलीस अधिकार्‍याला ‘क्वारंटाईन’करण्याचा प्रताप सत्ताधार्‍यांनी करुन दाखवला. तसेच मुंबई पोलिसांच्या अब्रूच्या चिंधड्या उडालेल्या असतानाही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने बिहार पोलिसांना तपासाचा अधिकार नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आपले नसलेले कायदेविषयक ज्ञान पाजळण्याचा उद्योग केला.



दरम्यानच्या काळात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणीही करण्यात आली. बिहार सरकारनेदेखील पाटण्यात दाखल केलेली तक्रार व सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांच्या मागणीवरुन हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवत असल्याचे जाहीर केले. उल्लेखनीय म्हणजे, सीबीआय तपासाची मागणी करणार्‍यांत सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीला आघाडीवर होती व तिने 16 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून तसे ट्विटही केले. नंतर मात्र रिया चक्रवर्ती आपल्याच मागणीवरुन पलटली व या प्रकरणाचा फास आपल्याच गळ्याभोवती आवळतो की काय, या शंकेने तिने या एकूणच प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा, असा धोशा लावला. एकीकडे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरुन धुरळा उडालेला असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे युवराज व राज्य सरकारमधील पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबतही चर्चा सुरु झाल्या. आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंहच्या प्रकरणाशी कसलातरी संबंध असल्यानेच मुंबई पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही, एफआयर नव्हे तर केवळ एडीआर दाखल केला, त्यांच्यावर राजकीय दबाव आहे आणि याच कारणामुळे बिहार पोलिसांची अडवणूक करण्यात आली, सीबीआय तपासाची मागणी फेटाळण्यात आली, अशी चर्चाही माध्यमांत रंगली. अखेर सर्वोच्च न्यायालयानेच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निर्णय देत त्याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवत महाराष्ट्र सरकारला जोरदार झटका दिला. मात्र, न्यायालयाने यावेळी व्यक्त केलेले मत महत्त्वाचे आहे.



मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह प्रकरणात केवळ ‘इन्क्वायरी’ (माहिती गोळा करणे) केली, ‘इन्व्हेस्टिगेशन’ (गुन्ह्याचा छडा लावण्यासाठीचा तपास) नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. अर्थात, मुंबई पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली, हत्येसारखा गंभीर गुन्हा घडूनही तपासात हेळसांड केली आणि यावर न्यायालयानेदेखील बोट ठेवले. पण, तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापासून शिवसेनेचे तोंडाळ प्रवक्ते संजय राऊत मुंबई पोलिसांच्या पाठराखणीसाठी सुशांत सिंहच्या वडिलांच्याच चारित्र्यावर चिखलफेक करत होते आणि बिहार पोलीस किंवा सीबीआय तपासाची बाजू घेणार्‍यांना महाराष्ट्रद्रोही ठरवत होते. तथापि, मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचे नेते या प्रकरणात इतका रस घेत असल्याचे पाहून कुठेतरी पाणी मुरत असल्याचेही निदर्शनास येते होते. कारण, तसे नसते तर त्यांनी अशी भूमिका घेतलीच नसती. आता मात्र, या प्रकरणी लोकशाहीचा विजय झाला असून सीबीआय तपासातून सत्य लवकरच समोर येईल, असे वाटते.


दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सीबीआय तपासाची मागणी केली व सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पार्थ पवार यांनी 27 जुलै रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या प्रकरणाच्या सीबीआय तपासाची मागणी केली होती. अर्थातच, आजोबा शरद पवारांच्या दृष्टीने पार्थ पवार अपरिपक्व व कवडीमोलाचे असल्याने पवारांच्या आदेशाबरहुकूम कृती करणार्‍या अनिल देशमुखांनीही पार्थ यांच्या मागणीकडे दुर्लक्षच केले. पण, आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे म्हणत आपण राजकारणात परिपक्व आणि लाखमोलाचे असल्याचेच दाखवून दिले. पार्थ पवार यांच्या सीबीआय तपासाच्या मागणीत सुशांत सिंहला न्याय मिळवून देण्याचा भाग असेलच, मात्र, त्यांना यातून आणखी काहीतरी साध्य करायचे असल्याचेही समजते. कारण, त्यांनी तशी मागणी करेपर्यंत राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणात अनेकदा समोर आले होते. तथापि, आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे अथवा नाही, हे आता सीबीआय तपासातूनच निष्पन्न होईल, सध्या त्यावर काहीही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण, पार्थ पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आल्यानंतरच सीबीआय तपासाची मागणी केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांनी तसे का केले याचे नेमके उत्तर पवार कुटुंबीयांपैकी कोणीही देत नाही. तसेच पार्थ पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात चर्चेत आल्यानंतर सीबीआय चौकशीची मागणी का केली, याचे उत्तरही अन्य कोणी नव्हे तर पवार कुटुंबीयच देऊ शकते.


दरम्यान, आता सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करेल, तेव्हा त्यात या अंगानेही तपास केलाच पाहिजे. सोबतच मुंबई पोलीस आयुक्त आणि चौकशी करणार्‍या पोलिसांचाही तपास सीबीआयने करायला हवा. कारण, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आत्महत्या ठरवण्याचा प्रकार मुंबई पोलिसांनीच केला होता. तसेच याप्रकरणी त्यांनी एफआयआर दाखल न करता केवळ एडीआर दाखल केला. मात्र, केल्या जाणार्‍या आरोपांवरुन, पुढे येत चाललेल्या माहितीवरुन व वास्तवाची झाकपाक करण्याच्या कृत्यावरुन मुंबई पोलीस जे करताहेत ते योग्य नाही, हे समजत होते. म्हणजेच एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत मुंबई पोलिसांनी केलेला हा ढिसाळपणाच होता. पण, त्यांनी तो स्वतःहून केला की कोणाच्या इशार्‍यावरुन? स्वतःच केला असेल तर त्यांचा असे करण्यामागे नेमका काय उद्देश होता? कोणाच्या सांगण्यावरुन केले असेल तर मार्गदर्शन करणारे कोण होते? संबंधित व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध काय? या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. अर्थात, सीबीआयच्या अखत्यारित हे प्रकरण गेल्याने ती मिळतीलच आणि सत्य लपवण्याचा डाव उधळला जाईलच, अशी खात्री वाटते.
@@AUTHORINFO_V1@@