घरगुती गणेशोत्सवातून जपूया सामाजिक बांधिलकी!

    19-Aug-2020
Total Views |
Fandry foundation_1 

कोरोना संकटामुळे यंदा ‘फँड्री फाउंडेशन’ची ‘डिजिटल डोनेशन बॉक्स’ संकल्पना!


मुंबई : आपले सण-उत्सव नेहमीच समाजभान जपत, लोक उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या संस्थांपैकी एक ‘फँड्री फाउंडेशन’. मुंबईस्थित स्वयंसेवी संस्था ‘फँड्री फाउंडेशन’ २०१६ सालापासून घरगुती गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, दरवर्षी फँड्री फाउंडेशन एक छोटी देणगीपेटी भाविकांना उपलब्ध करून देते व त्या पेटीमध्ये जी काही रक्कम जमा होते ती गणेशोत्सव पार पडला, की त्या त्या भाविकांकडून जमा करुन त्याची रीतसर पावती देते व या जमलेल्या निधीचा वापर वेगवेगळ्या सामाजिक कामासाठी केला जातो.


या संस्थेकडून दरवर्षी नवीन उपक्रम राबवले जातात. २०१६मध्ये भयंकर सुका दुष्काळ पडला होता. तेव्हा, या निधीतून दुष्काळग्रस्त भागातील मजूर व गुरे यांच्यासाठी अन्नधान्याची सोय करण्यात आली. २०१७मध्ये इगतपुरीमधील जुनवणेवाडी येथील जिल्हापरिषद शाळेचे छप्पर तुफानी पाऊस व वाऱ्यामुळे उडून गेले होते ते नव्याने बसवण्यात आले. यासाठी देणगी म्हणून जमलेल्या निधीचा वापर करण्यात आला. याच निधीतून २०१८मध्ये इगतपुरीमधील कुरुंगवाडी येथे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, तर २०१९ मध्ये डहाणू व इगतपुरी मधील महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी साहाय्य करण्यात आले.


दरवर्षी चालणाऱ्या या प्रथेत यंदा मात्र कोरोनामुळे काहीसा अडथळा निर्माण होणार आहे. लोकांची समस्या सोडवणाऱ्या या संस्थेने मात्र यावरही तोडगा काढला आहे. कोरोनाच्या बंधनामुळे प्रत्यक्ष देणगीपेटी उपलब्ध करून देता येणे शक्य नसल्याने ‘QR code’च्या स्वरूपात डिजिटल डोनेशन बॉक्स अशी संकल्पना संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षीसारखेच मुंबईमधील सर्व गणेशभक्तांनी या संकल्पनेला प्रतिसाद देऊन फँड्री फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी देखील समाजकार्यात आपला वाटा उचलावा अशी विनंती, या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. या उपक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी आणि या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी आपण 9769088052, 9082828984, 9082828186 या क्रमांकांवर संपर्क करू शकता.