‘महेंद्र बाहुबली’ अमर रहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020
Total Views |

ms dhoni_1  H x


क्रिकेट विश्वात ‘बाहुबली’ या नावाने काही क्रिकेट समीक्षकांनी संबोधण्यास सुरुवात केली. असा कर्णधार पुन्हा भारताला मिळणे अवघडच आहे. निवृत्तीनंतर धोनी भारतीय संघाकडून खेळताना दिसणे फारच अवघड आहे. मात्र, ‘बाहुबली’ने अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केले असून क्रिकेटविश्वातील त्याचे कारनामे अमर राहणार आहेत.


मैदानी चाली रचण्यात पटाईत खेळाडू, मोक्याच्या क्षणी सामना फिरवण्याचे कौशल्य बाळगणारा चाणाक्ष कर्णधार अशी ओळख असणार्‍या महेंद्रसिंह धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. 2019 साली विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा अंतिम सामना खेळल्यानंतर धोनीने जवळपास वर्षभराहून अधिकच्या कालावधीनंतर हा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. धोनी मैदानाबाहेर राहिल्यानंतर जवळपास वर्षभराच्या कालावधीत भारतीय संघाने अनेक सामने खेळले. या सामन्यांदरम्यान भारतीय संघाने धोनीसाठी पर्याय म्हणून यष्टीरक्षकासाठी अनेक खेळाडूंना संधी दिली. मात्र, धोनीची उणीव भरून काढणे तर सोडाच, या खेळाडूंची संघात स्थान मिळविण्याची धडपड पूर्ण वर्षभर सुरु होती. धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने मालिका जिंकल्या. मात्र, काही स्वदेशी धर्तीवरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने अनेक हातचे सामने घालवले. महेंद्रसिंह धोनी जर मैदानावर असता तर हे सामने भारताला सहज जिंकता आले असते, अशी आठवण अनेक क्रिकेट समीक्षकांनी वेळोवेळी करून दिली.



सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि भारतीय फलंदाजीचा कणा मानला जाणारा विराट कोहली या दोन्ही युवा खेळाडूंनी वेळोवेळी कर्णधारपदाची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळत भारताला मालिकांमध्ये विजय मिळवून दिला. परंतु, मोक्याच्या क्षणी सामना फिरविण्याचे धोनीसारखे कौशल्य यावेळी दिसून आले नाही. २००७च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजय पाकिस्तानचाच होईल, असे अनेकांना वाटत होते. चार चेंडूंवर सहा धावा पाकिस्तानला सहज बनवता आल्या असत्या. मात्र, जोगिंदर शर्मा याला धीम्या गतीने गोलंदाजी करण्यास सांगणे मिसबाहसारख्या तडाखेबाज फलंदाजाला तंबूत धाडणे हे कसब धोनीलाच जमते, हेच यावरून सिद्ध होते. प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावणे केवळ धोनीलाच शक्य होते. म्हणूनच त्याच्या कारकिर्दीत भारताने सर्वाधिक सामने जिंकल्याचा इतिहास आहे. चाणाक्ष बुद्धिबळपटूंप्रमाणे रणनीती आखणार्‍या धोनीला क्रिकेट विश्वात ‘बाहुबली’ या नावाने काही क्रिकेट समीक्षकांनी संबोधण्यास सुरुवात केली. असा कर्णधार पुन्हा भारताला मिळणे अवघडच आहे. निवृत्तीनंतर धोनी भारतीय संघाकडून खेळताना दिसणे फारच अवघड आहे. मात्र, ‘बाहुबली’ने अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात घर केले असून क्रिकेटविश्वातील त्याचे कारनामे अमर राहणार आहेत.


म्हणून होता धोनी महान...


क्रिकेटविश्वात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी विविध विक्रम आपल्या नावावर केले. त्यांच्या या विक्रमांमुळे जगभरात त्यांची ख्याती पसरली आहे. विक्रम करणार्‍या खेळाडूंना स्वदेशात तर मानाचे स्थान मिळतेच, मात्र जगभरात काही असेही खेळाडू आहेत की या खेळाडूंनी खेळादरम्यान क्रिकेटचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंची नावे घेतली जातात. भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव, ‘लिटल मास्टर’ सुनील गावस्कर, ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर आणि ‘लेजेंड’ महेंद्रसिंह धोनीचे नाव या यादीत आवर्जून घेतले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून निवड करण्यात येणार्‍या ‘फेअर प्ले क्रिकेट’च्या यादीत अशा खेळाडूंची निवड करण्यात येते. सध्याच्या काळात या यादीत समावेश असणार्‍या एकमेव भारतीय खेळाडूने निवृत्ती स्वीकारल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.



आगामी आतंरराष्ट्रीय टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळल्यानंतरच धोनीने निवृत्ती स्वीकारायला हवी होती, असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले. केवळ भारतच नव्हे तर अनेक देशांतील क्रिकेटप्रेमींनी धोनीच्या या कर्तृत्वांच्या आठवणी जाग्या करताना असा खेळाडू क्रिकेटविश्वाला पुन्हा मिळणे अवघड असल्याची भावना व्यक्त केली. संघामध्ये नव्या खेळाडूंना संधी देणे, त्यांचे करिअर घडवणे, सर्वांना योग्य सन्मान देणे, वरिष्ठ खेळाडूंची मर्जी राखणे, प्रतिस्पर्धी संघातील सदस्यांशीही योग्य समतोल राखून क्रिकेट खेळणे आदी सर्वांगी कौशल्य केवळ कर्णधार धोनीकडेच होते. स्व संघातील असो किंवा प्रतिस्पर्धी संघातील, खेळाडू धोनीने कोणत्याच खेळाडूशी वितुष्ट घेतलेले नाही. अनेक खेळाडूंनी धोनीविरूद्ध द्वेष बाळगला. मात्र, धोनीने कोणतेही वैर न बाळगता प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना नमवले. त्यामुळेच आजही धोनीला एक महान खेळाडू म्हणून संबोधले जाते. एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने तर धोनीसारखे खेळाडू तर भारतीय संघात नसल्याची किंमतही या संघाला चुकवावी लागू शकत असल्याचे विधान केले. एका परिपक्व खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘अलविदा’ केला, असे इंग्लडच्या एका क्रिकेट समीक्षकाने यावेळी म्हटले. धोनीसारखा क्रिकेटपटू पुन्हा जगाला मिळणे कठीण असल्याचे ‘आयसीसी’नेही सांगितले. कोणत्याही क्रिकेटपटूबाबत ‘आयसीसी’ने विधान करण्याची ही पहिलीच वेळ असावी.


 - रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@