तो ग्रंथ नव्हे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020
Total Views |

dasbodh_1  H x


साधनमार्गात उपयोगी पडणार्‍या ग्रंथांची लक्षणे स्वामींनी दासबोधात विस्तारपूर्वक सांगितली आहेत. त्याचे थोडक्यात सार म्हणजे ज्याच्या अभ्यासाने विरक्ती येते, आपल्यातील दोष सुधारतात तो खरा ग्रंथ. ज्याच्या अभ्यासाने धैर्य उत्पन्न होते, परोपकाराची सद्बुद्धी होते, देहसुखाची लालसा मावळते तो ग्रंथ या नावास योग्य. ज्यातून परमार्थ साधना कळते, आत्मज्ञान प्राप्त होते तो खरा ग्रंथ.


सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, प्रापंचिक माणूस असमाधानी असतो. प्रपंचात स्वार्थमूलक हेवेदावे, द्वेष, मत्सर, अहंकार या दुर्गुणांच्या सोबतीने राहावे लागते. परमार्थाचा जराही विचार नसल्याने पैसा व स्त्री यांचेच चिंतन चालू असते. नंतर त्रिविध तापाने पोळल्यावर व संतांचे विचार ऐकून मन हळूहळू शांत होऊ लागते. सद्गुणांचे विचार मनात येऊ लागतात. परोपकार करावा, असे वाटू लागते. अस्वस्थ मनाला समाधानाची ओढ लागते. अशावेळी सुदैवाने सत्संगती लाभली, तर जीवाचा आध्यात्मिक कल्याणाकडे प्रवास सुरू होतो. तथापि सर्वांनाच सत्संगाचा लाभ मिळेल, अशी शक्यता नसते. ज्यांना सत्संग मिळत नाही, त्यांनी अद्वैत ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन केले तर त्यांना सत्संगासारखा लाभ मिळतो. हे आपण मागील एका लेखात पाहिले. ग्रंथवाचन, त्यांचे मनन व चिंतन हे सत्संगतीसमान फळ देणारे असते. असे असले तरी कोणते ग्रंथ वाचावे, तसेच ग्रंथ कशाला म्हणावे, याबाबत समर्थांनी दासबोधात चर्चा केलेली आहे. दासबोधातील हे ग्रंथांसंबंधीचे विचार समजून घेऊन मग ग्रंथवाचनाकडे वळले, तर त्यापासून अपेक्षित लाभ मिळेल. तसे पाहिले तर अद्वैत ग्रंथ अनेक आहेत. सर्व ग्रंथ मिळवणे व त्यांचे वाचन-मनन करणे हे कठीण असले तरी अशक्यच नाही. त्यापैकी काही ग्रंथ आपण वाचू शकतो. तथापि लोक वेगवेगळे ग्रंथ अथवा पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात. त्यानुसार आपण ग्रंथ वाचायला सुरुवात केली, तर त्यातील गंमत अशी की, एखादा ग्रंथ वाचून मनाने काहीतरी साधन करायचे ठरवले, तर दुसर्‍या ग्रंथाच्या वाचनाने पहिल्या ग्रंथाने झालेला मनाचा निश्चय उडवला जातो. काही ग्रंथ बुद्धिभेद करणारे असतात. असे ग्रंथ वाचण्यात काळ व्यर्थ जातो. काहीच हाती लागत नाही. वास्तविक पाहता ग्रंथवाचनाने आपले मन भगवंत विचारावर स्थिर झाले पाहिजे. आत्मनात्म विवेक कळला पाहिजे. अनेक ग्रंथांच्या परिशीलनाने, त्यातील विचारांनी मनाची चलबिचल अवस्था होते. विचारांची एकवाक्यता राहत नाही. मनातील शंकांचे समाधान होत नाही. असे ग्रंथ जर आपण सतत वाचत राहिलो, तर मन अनिश्चिततेच्या भोवर्‍यात सापडून मनाची अस्थिरता आणखी वाढेल. या अनिश्चिततेमुळे आपल्या मनातील परमार्थविषयक संशयांचे निवारण होणार नाही. समाधान मिळणे तर दूरच.


एक्या ग्रंथे निश्चय केला । जो दुजयाने उडवला ।
तेणे संशयोचि वाढला । जन्मवरी ॥ (दा. ७.९.४)


काही लोकांना कामनिक व्रतवैकल्येविषयक ग्रंथांची आवड असते. असे लोक कोणते व्रत केले, तर काय लाभ होतो याची माहिती इतरांना सांगतात. त्या ग्रंथातील फलश्रुती लोकांना ऐकवतात आणि ते व्रतवैकल्याचे ग्रंथ वाचण्याचा सल्ला देतात किंवा त्यांची पारायणे करायला सांगतात. तथापि त्याने आसक्ती वाढून परमार्थमार्गातील स्मरणांचे मार्गदर्शन मिळत नाही. म्हणून प्रापंचिकांचे हे ग्रंथ परमार्थात उपयोगाचे नाहीच. भाराभार ग्रंथ न वाचता, ज्या ग्रंथांनी आपल्या मनातील संशय दूर होतील, आपल्या शंकांचे निवारण होईल, असे जे परमार्थपर अद्वैत तत्त्वज्ञान सांगणारे ग्रंथ आहेत ते साधकाने वाचावेत. असे असले तरी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचायला मिळाले, तर त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उसळतात. समाजात अनेक प्रकारची माणसे असतात. त्यांच्या आवडीनिवडीही अनेक असतात. ज्ञानी माणसाला ज्ञानाच्या गोष्टी आवडतात. भक्ताला भजन आवडते. स्वार्थी माणसाला स्वार्थ साधण्यात आनंद असतो. कंजूष माणसाला द्रव्य आवडते. कवीला काव्य आवडते. तर्क करण्याची आवड असणार्‍याला तार्किक वाद करणे आवडते. विद्वानाला विद्वत्ता प्रिय असते. शहाण्याला चातुर्य आवडते. शृंगारप्रिय असलेल्या माणसाला कामशास्त्रात गोडी वाटते. निंदक दुसर्‍याच्या उणिवा शोधण्यात आनंद मानतो. त्याप्रमाणे आपल्या आवडीची पुस्तके मिळाली, तर माणूस ती आवडीने वाचतो. त्याचा त्याला कंटाळा येत नाही. यासाठी प्रथम साधकाने अद्वैत ग्रंथ वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. कारण, सर्वदूर विचार करता अद्वैत ग्रंथ साथकाला उपयोगी पडणारा आहे. तथापि हे न समजल्याने लोक आपली आवड तृप्त करण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचे, ग्रंथांचे वाचन करीत असतात. आज बाजारात कथा, कादंबर्‍या, ऐतिहासिक कादंबर्‍या, पौराणिक कादंबर्‍या, कविता, मनोरंजक साहित्य, विनोद चुटके इत्यादी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. अशा पुस्तकांच्या वाचनाने काहीवेळा करमणूक होते, विरंगुळा मिळतो. परंतु, त्यातून परमार्थ साधनेच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करता येत नाही. त्याने आपले संशय नाहीसे होणार नाहीत किंवा समाधान टिकून राहणार नाही.


इतर जे प्रपंचिक । हास्य विनोद नवरसिक।
हित नव्हे ते पुस्तक। परमार्थासी॥ (दा. ७.९.२९)


हे हास्यादी नवरस पुरवणारी, रंजक पुस्तके वाचू नयेत, असे स्वामींनी म्हटलेले नाही. परंतु, ती पुस्तके परमार्थहिताची नाहीत, असे स्वामी सांगतात. ज्याला मोक्षाचा अधिकारी व्हायचे असेल, त्याने प्रथम आपल्या मनात अद्वैतग्रंथांबद्दल प्रेम निर्माण केले पाहिजे, त्याशिवाय त्याला अद्वैत ग्रंथाची आवड निर्माण होणार नाही. अद्वैतशास्त्र ग्रंथांतून आत्म-अनात्म विवेक समजतो. सारं काय आणि असार काय, यांचा उलगडा होतो. त्यामुळे असार टाकून द्यायचे व सार म्हणून काय स्वीकारायचे, याचा विवेक समजतो. विवेक कळल्यावर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखाने करता येतात. एकदा आपल्या मनात अद्वैतग्रंथांची आवड निर्माण झाली की, मग इतर करमणूक प्रधान ग्रंथांचे आकर्षण आपोआप कमी कमी होते. कारण, मनाची खात्री झालेली असते की, या प्रापंचिक विषयावरील ग्रंथांचा परमार्थात उपयोग नसतो. परमार्थ साधना करण्यासाठी सत्संगती, गुरुउपदेश याप्रमाणे अद्वैत ग्रंथही उपयोगी पडतात हे नक्की. ज्याला स्वहित साधायचे आहे, त्याने अद्वैत ग्रंथांचे वाचन नेहमी केले पाहिजे. परमार्थ साधनेसाठी हे वाचन एखाद्या निवांत स्थानी एकाग्र मनाने केले, तर ते निश्चितपणे समाधान देऊन जाईल, असे स्वामींचे मत आहे.

आत्मज्ञानी येकचित्त। तेणे पाहावे अद्वैत।
येकांत स्थळी निवांत। समाधान ॥


साधनमार्गात उपयोगी पडणार्‍या ग्रंथांची लक्षणे स्वामींनी दासबोधात विस्तारपूर्वक सांगितली आहेत. त्याचे थोडक्यात सार म्हणजे ज्याच्या अभ्यासाने विरक्ती येते, आपल्यातील दोष सुधारतात तो खरा ग्रंथ. ज्याच्या अभ्यासाने धैर्य उत्पन्न होते, परोपकाराची सद्बुद्धी होते, देहसुखाची लालसा मावळते तो ग्रंथ या नावास योग्य. ज्यातून परमार्थ साधना कळते, आत्मज्ञान प्राप्त होते तो खरा ग्रंथ.


जेणे धारिष्ट चढे। जेणे परोपकार घडे।
जेणे विषयवासना मोडे। त्या नांव ग्रंथ॥
जेणे परम साधन। जेणें ग्रंथें होये ज्ञान ।
जेणे होईजे पावन। या नांव ग्रंथ॥
एवढे सगळे सांगून झाल्यावर ज्यापासून विरक्ती आणि भक्ती निर्माण होत नाहीत, त्याला ग्रंथ म्हणता येणार नाही, असे स्वामींनी स्पष्टपणे सांगितले आहे.
ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फलश्रुती ।
जेथे नुपजे विरक्ती भक्ती । तो ग्रंथचि नव्हे ॥ (७.९.३५)


- सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@