गे मातृभू! तुझंसाठी देऊ बलिदान!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020
Total Views |

adya aradhya_1  


राष्ट्रमातेवर आलेली सर्व संकटे दूर करण्यासाठी तिच्या पुत्रांनी सर्व प्रकारचे बलिदान देण्यास तयार राहावे - वयं तुभ्यं बलिहृत: स्याम। हे मातेे, आम्ही तुझ्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणार्पण करण्यास सदैव तत्पर राहू! तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाहीत. या मंत्रांशातून भूमिमातेच्या रक्षणासाठी बलिदानाची परंपरा अगदी वैदिक काळापासून असल्याचे निदर्शनास येते.


उपस्थास्ते अनमीवा अयक्ष्मा
अस्मभ्यं सन्तु पृथिवी प्रसुता:।
दीर्घं न आयु: प्रतिबुध्यमाना
वयं तुभ्यं बलिहृत: स्याम ॥
(अथर्ववेद 12/1/62)


अन्वयार्थ

(पृथिवि)हे पृथ्वीमाते! आम्ही (ते प्रसुता:) तुझ्या पोटी जन्मलेली मुले आहोत. म्हणूनच (उपस्था:) तुझ्या कुशीतील व आश्रयातील सर्व जड - चेतन पदार्थ हे (अस्मभ्यम्) आम्हा सर्वांकरिता (अनमीवा:) सामान्य रोगराईपासून व (अयक्ष्मा:) विविध भयंकर आजारांपासून वाचविणारे (सन्तु) असोत. त्यामुळे (न:)आम्हा सर्वांचे (आयु:) आयुष्य (दीर्घं) दीर्घकालीन होईल. (वयम्) आम्ही (प्रतिबुध्यमाना:) जागृत होत, ज्ञान-विज्ञानाने परिपूर्ण होत (तुभ्यम्) तुझ्याकरिता (बलिहृत:) आपले बलिदान देण्यास (स्याम) ठरोत.


विवेचन

वेदज्ञान हे सर्व विषयांना स्पर्श करणारे आहे. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी प्रत्येक बाबतीत वेदांनी उपदेश केला आहे. म्हणूनच वेदवाणीला सर्व ज्ञान-विज्ञानाचे आधारभूत केंद्र मानले आहे. माणसाने कसे जगावे? कशा प्रकारचा व्यवहार करावा? या सर्वांवर वेदांनी प्रकाश टाकला आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व समग्र विश्व यांचे जीवनमान अतिशय प्रगत असावे. ज्ञानपूर्वक या सर्वांचे व्यवस्थापन व्हावे, यांकरिता वेदांनी समान आचारसंहिता मानवाकरिता प्रदान केली आहे. वेदांचे राष्ट्रीय विचार हे फारच प्रगल्भ आहेत. सारी पृथ्वी हेच वैदिक राष्ट्र म्हणून गणले गेले आहे. पण, दुर्दैवाने स्वार्थाच्या संकुचित भावनेतून प्रेरित झालेल्या जगातील नेतेमंडळींनी व मानवांनी भूमीच्या काही लहानसहान तुकड्यांनाच ‘देश’ किंवा ‘राष्ट्र’ म्हणून संबोधित केले. पृथ्वीमातेची वाटणी करून स्वतःला खूपच लहान केले, पण वेद मात्र विशाल दृष्टिकोन बाळगतात. वैदिक राष्ट्र हे समग्र वसुंधरेकरिता एकच आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ अशी उदात्त संकल्पना हीच वेदांकडून जगाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. वेदांनी प्रतिपादित केलेली स्वदेशभक्ती आणि मातृभूमीची अर्चना ही विशाल स्वरूपाची आहे.

चारही वेदांमध्ये राष्ट्राचे व्यापक स्वरूप प्रतिपादित केले आहे. अथर्ववेदाचे भूमिसूक्त हे तर देशप्रेमाचा उत्कृष्ट नमुना होय. या सूक्तातील एकूण ६३ मंत्र हे पृथ्वीच्या विविध तत्त्वांचे वर्णन करणारे आहेत. एका मंत्रात तर समग्र पृथ्वीला माता म्हणून संबोधले आहे. ‘माता भूमि: पुत्रोऽहं पृथिव्या:।’ म्हणजेच भूमी ही माझी आई आहे आणि मी या भूमिमातेचा पुत्र आहे, याचाच विस्तार केल्यास या पृथ्वीवरील सर्व नागरिक मग ते कोणत्याही देशाचे असोत, ते सर्व या भूमीची लेकरेच आहेत. जेव्हा एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले हे समग्र विश्वातील पुत्र असतील, तर मग ते एक दुसर्‍यांचे भाऊच झाले. मग एक दुसर्‍या देशाांशी युद्धाची भाषा कशासाठी? प्रत्येक देशाने पृथ्वीला आपली राष्ट्रमाता संबोधून कार्य केले, तर जागतिक महायुद्धे होणार नाहीत की शेजारील राष्ट्रांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होणार नाही. सर्वजण मित्रराष्ट्रे म्हणून कार्य करत राहतील. वरील मंत्रात पृृृृथ्वीमातेला उद्देशून म्हटले आहे- पृथिवि, तेे प्रसुता:! अर्थात, आम्ही तुझ्या उदरी जन्मलेले तुझे पुत्र आहोत. आम्हाला तूू आपल्या कुशीत घे. तूू आमचे कर. आम्हाला दुःखापासून वाचव. तुझ्यापासून जन्माला आलेल्या विविध औषधी वनस्पती आणि धनधान्याच्या उपयुक्ततेने आम्हाला आरोग्य प्रदान कर. दुःखापासून दूर झाले की, आम्ही सुदृढ, बलवान व समर्थ होऊ. यामुळे आम्हाला दीर्घायुष्य लाभेल व उत्तम आरोग्याच्या माध्यमाने आम्ही सतत ज्ञानसंपन्न होऊ. यावरून माता व पुत्राचे घनिष्ठ नाते आपल्या लक्षात येते.

प्रत्यक्ष जन्म देणार्‍या मातेपेक्षा ही भूमिमाता मात्र महान व सर्वश्रेष्ठ आहे. जन्माला घातल्यानंतर या मातेने आम्हाला वार्‍यावर सोडले नाही. जन्माला येण्यापूर्वीच हिने आमची जगण्याची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केली आहे. हिने काय नाही पाणी, हवा, गोदुग्ध, अन्नधान्य, फळे, औषधी वनस्पती याद्वारे आमचे जीवनमान उंचावण्याचे फार मोठे काम या जगदंबेने केले आहे. हे सर्व जड व चेतन पदार्थ या भूमीच्या आश्रयानेच सतत वृद्धिंगत होतात. जगातील सर्व प्राणिमात्रांकरिता हे फार उपयोगी आहेत. याद्वारे आमचे शारीरिक व मानसिक आजार आणि भय नाहीसे होतात. यामुळे आमचे सर्व प्रकारचे कल्याण साधते. मानवांसह सर्व पशु-पक्षी व प्राण्यांकरिता ही माता या सर्व गोष्टी मुक्तहस्ते वितरीत करण्याचा प्रयत्न करते. याबाबत ती कधीही पक्षपात किंवा भेदभाव करीत नाही. सर्वांना समानतेने देण्याची तिची उदात्त भावना असते. पण, घेणारेच जर संकुचित वृत्तीचे व स्वार्थी असतील, तर मग या मातेने तर काय करावे? आम्ही आजारी पडलो की याच धरतीवरील नानाविध मौल्यवान वनस्पतींद्वारे तयार झालेल्या औषधी या आमच्याकरिता संजीवनी ठरतात. आजार सामान्य असोत की गंंभीर, त्या सर्वांचा इलाज पृथ्वीवरील औषधी तत्त्वांद्वारे होऊ शकतो. वैदिक निसर्गोपचार व आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने हेच तर जगाला दाखवून दिले आहे. अशा प्रकारे या मातेकडून मिळालेल्या योग्य पदार्थ व औषधी तत्त्वांच्याा माध्यमाने आमचे शरीर, मन, बुद्धी व इंद्रिय सुदृढ बनतात. यामुळे आम्ही शूरवीर, पराक्रमी, धाडसी होऊन दीर्घायुषी ठरू! धरणी मातेकडून मिळालेले दीर्घायुष्य केवळ ऐषआराम व मौजमजा करण्यासाठी नव्हे, तर सतत सत्य व प्रामाणिक मूल्यांसाठी मनसा, वाचा, कर्मणा जागृत राहण्यासाठी! तिच्या पुत्रांचे हे जागणे तिच्याच रक्षणासाठी!



कारण, मातेच्या रक्षणाची जबाबदारी ही ही पुत्रांवर असते. आईकडून माया, ममता, स्नेह, वात्सल्य आणि सर्व जगण्याची साधने व पदार्थ मिळाले, पण मुलगा मात्र आळशी, कर्महीन बनला आणि तो आपल्या मातेचे रक्षण करण्यात अपयशी ठरला, तर तो पुत्र कसला? मंत्राच्या शेवटी भूमिमातेच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या पुत्रांवर असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रमातेवर आलेली सर्व संकटे दूर करण्यासाठी तिच्या पुत्रांनी सर्व प्रकारचे बलिदान देण्यास तयार राहावे - वयं तुभ्यं बलिहृत: स्याम। हे मातेे, आम्ही तुझ्या रक्षणासाठी स्वतःचे प्राणार्पण करण्यास सदैव तत्पर राहू! तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाहीत. या मंत्रांशातून भूमिमातेच्या रक्षणासाठी बलिदानाची परंपरा अगदी वैदिक काळापासून असल्याचे निदर्शनास येते. यातून वैदिक राष्ट्रवादाचा संकेत मिळतो. बलिदानाचा ही दिव्य वारसा आम्हाला वेदांपासून शिकण्यास मिळतो. जगातील प्रत्येक देशांनी आपल्या राष्ट्रभूमीच्या पालन-पोषण, संवर्धन व रक्षणाच्या पुण्यकार्यात स्वतःला आहुत करण्यासाठी सज्ज असावे. प्राण तळहाती घेऊन बलिदान देण्यासाठी तयार राहावे, यासाठी वेदातील हा दिव्य संदेश जणू काही क्रांतीचा मंत्रच आहे. भारतातील हजारो राष्ट्रभक्तांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पिले आणि स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपले बलिदान दिले. अनेकांनी आपल्या घरादाराची परवा न करता भारतमातेला पारतंत्र्याच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी सर्वस्वाचे जे बलिदान दिले, तो निश्चितच या वैदिक राष्ट्रभक्तीच्या उगमस्थानापासून सुरू झालेला अखंडित प्रवाह आहे. तो असाच याहीपुढे भारतासह भूमंडळावरील सर्व देशांमध्ये खळाळत राहो, हीच सदिच्छा !


- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
@@AUTHORINFO_V1@@