असे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2020
Total Views |

chetan chauhan_1 &nb
आपल्या मर्यादांची जाणीव ओळखत क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांतील जबाबदार्‍या व्यवस्थितरित्या पाडणार्‍या चेतन चौहान यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...

क्रिकेटला जशी सर्वत्र पसंती आहे, तशीच प्रसिद्धी या खेळातील खेळाडूंनाही जगभरातून मिळते. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतरही हे खेळाडू वर्षानुवर्षे सदैव सर्वांच्या स्मरणात राहतात. क्रिकेटच्या मैदानापासून दुरावले असले तरी त्यांची प्रसिद्धी कायम असते. क्रिकेटच्या मैदानातून इतर क्षेत्रांत पदार्पण केल्यानंतरही अनेकांच्या मनात ते घर करून राहत असतात. इतकेच नव्हे तर जगातून निरोप घेतल्यानंतरही त्यांच्या चाहत्यांकडून अशा खेळाडूंची नेहमीच आठवण काढली जाते. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे नेते उत्तर प्रदेश सरकारमधील सैनिक कल्याणमंत्री चेतन चौहान हे त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. क्रिकेटपटू, प्रशासक, राजकीय नेते आणि मंत्री अशा विविध जबाबदार्‍या उत्तमरित्या हाताळणार्‍या चेतन चौहान यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. कोरोनामुळे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात क्रिकेट आणि राजकारणासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून दुःख व्यक्त करण्यात आले. एक उत्तम व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना यावेळी अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. क्रिकेट असो किंवा राजकारणाचे क्षेत्र त्यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे असल्यानेच निधनापश्चातही त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. आपल्या मर्यादांची जाणीव ओळखत सर्व क्षेत्रातील जबाबदार्‍या व्यवस्थितरित्या पार पडणार्‍या चेतन चौहान यांच्या आयुष्याची कहाणीही तितकीच रंजक आहे.

चेतन चौहान हे मूळचे उत्तर प्रदेशचे. २७ जुलै १९४७रोजी त्यांचा जन्म बरेली येथे झाला. त्यांना लहानपणापासून विविध खेळांत रस होता. चेतन चौहान यांचे वडील सैन्यदलात असल्याने त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी कुटुंबीयांकडून भरपूर पाठिंबा मिळाला. शालेय शिक्षणाबरोबरच नित्यनियमाने ते विविध खेळांचा सराव करत असत. चेतन चौहान हे १३वर्षांचे असताना सेनादलात अधिकारीपदावर असलेल्या वडिलांची १९६० मध्ये पुणे शहरात बदली झाली. त्यामुळे चौहान कुटुंबीय बरेली येथून पुणे येथे स्थलांतरित झाले. पुण्यात त्यांनी आपले उर्वरित शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वाडिया महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यावेळी पदवीधर झालेल्या चेतन चौहान यांनी शिक्षणासोबतच आपल्या खेळांचा सरावही तसाच सुरु ठेवला होता. इतर खेळांत स्वारस्य असले तरी क्रिकेट हे भारतात लोकप्रिय असल्याने त्यांनी क्रिकेटच्या सरावाकडे अधिक लक्ष केंद्रीत केले. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू कमल भांडारकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. कमल भांडारकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवणार्‍या चेतन चौहान यांनी १९६६साली ‘रोहिंटन बारिया’ करंडक क्रिकेट स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळेच विझ्झी करंडक स्पर्धेत त्यांची पश्चिम विभागातून निवड झाली. यावेळी अंतिम सामन्यातील दुसर्‍या डावात भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आणि ‘लिटल मास्टर’म्हणून जगभरात प्रसिद्ध असणारे सुनील गावस्कर यांच्यासह प्रथमच सलामीची जबाबदारी सांभाळली. या कामगिरीमुळे १९६७मध्ये त्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले. मग रणजीतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर १९६९मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. सुनील गावस्कर यांचा सलामीचा नियमित साथीदार म्हणून त्यांची ओळख होती. पण, गावस्कर यांच्या खात्यावर १०,१२२ धावा होत्या, तर चौहान यांनी ४० कसोटी सामन्यांत २०८४धावा केल्या. गावस्कर यांनी विक्रमी ३४ शतके झळकावली, तर चौहान यांना तब्बल नऊ वेळा ८० ते ९७या धावांदरम्यान बाद झाल्यामुळे शतकाने हुलकावणी दिली. पण, १६अर्धशतके त्यांनी नोंदवली. हेल्मेट परिधान करणारे चौहान हे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू.
१९७७ ते १९८१ हा त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ. चौहान यांनी गावस्कर यांच्या साथीने ११ शतकी सलामीच्या भागीदारी केल्या. कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामनाही ते न्यूझीलंडविरुद्ध खेळले. १९७५पासून दिल्लीत राहणार्‍या चौहान यांनी निवृत्तीनंतर, सर्वात वादग्रस्त क्रिकेट संघटना मानल्या जाणार्‍या दिल्ली क्रिकेट संघटनेतील पदे सांभाळली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजपने अमरोहा लोकसभा मतदारसंघातून त्यांना १९९१मध्ये उमेदवारी दिली, तेव्हा ५८टक्के मते मिळवून ते खासदार झाले. १९९८मध्ये पुन्हा येथूनच ते लोकसभेत गेले, परंतु १९९९मध्ये पराभूत झाले. त्यानंतर जून २०१६मध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’चे अध्यक्षपद त्यांना मिळाले आणि २०१७मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविण्याची संधीही. नौगवाँ सदात मतदारसंघातून निवडून आल्यावर योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात त्यांना सैनिक कल्याण खात्याचे मंत्रिपद मिळाले. मंत्रिपदाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत असतानाच, त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्रिकेटपटू, प्रशासक, राजकीय नेते आणि मंत्री अशा विविध जबाबदार्‍या उत्तमरित्या हाताळणार्‍या चौहान यांच्या कर्तृत्वाला अखेरचा सलाम!
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@