ससून डाॅक 'व्हेल शार्क' प्रकरणातील मच्छीमारांच्या मुसक्या आवळल्या; तीघांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020
Total Views |

whale shark _1  

(फोटो -शौनक मोदी)

दोषी मच्छीमार पनवेलमधील केळवणे गावाचे 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात ससून डाॅकवर घडलेल्या 'व्हेल शार्क' व्यापार प्रकरणातील मच्छीमारांच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'ला यश मिळाले आहे. 'व्हेल शार्क'ची मासेमारी केलेल्या बोटीचा मालक, तांडेल आणि माशाला लिलावासाठी खरेदी केलेल्या व्यापाराला सोमवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
 
महाराष्ट्रातील प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या ससून डाॅकवर गेल्या आठवड्यात बुधवारी मृत 'व्हेल शार्क' मासा आढळून आला होता. हा मासा बंदरावर आणल्यानंतर त्याच्या विक्रीचा व्यवहार पार पडला. त्यानंतर व्यापाराकडून या माशाला कापण्यात आले. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'मध्ये व्हेल शार्क मासा संरक्षित आहे. त्यामुळे त्याची मासेमारी किंवा व्यापार करण्यावर कायदेशीर निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत हा मासा डाॅकवर आणून त्याचा व्यापार झाल्याने या प्रकरणी 'कांदळवन कक्षा'च्या अधिकाऱ्यांनी दोघा जणांना अटक केली होती. सोमवारी या प्रकरणात अजून तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये व्हेल शार्क बंदरावर वाहून आणलेल्या बोटीचा मालक, तांडेल आणि या माशाचा लिलाव करण्यासाठी त्याला खरेदी केलेल्या व्यापाराचा समावेश आहे. 


व्हेल शार्कची मासेमारी केलेली बोट ही पनवेलमधील केळवणे गावातील असून या बोटीचा मालक दिलीप हरी शीवकर आणि तांडेल गोपीनाथ दामोदर म्हात्रे या दोघांना अटक केल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिली. तसेच हा मासा लिलावाकरिता विकत घेतलेला कृष्णा बुचडे नामक व्यापाराला ससून डाॅकमध्ये सापळा रचून अटक केल्याचे त्यांनी सांगितले. या तिघांवर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी मच्छीमारांचा परवाना रद्द करण्याबरोबर बोट ताब्यात घेण्याची कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाकडून होऊ शकते, अशी माहिती विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. 

@@AUTHORINFO_V1@@