भगव्याकडे स्वागतच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020
Total Views |


agralekh_1  H x


सत्तेसाठीच्या काकांच्या करामती आपल्याला जमतील का, हा अजित पवार तसेच पार्थ व रोहित पवारांपुढील प्रश्न आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाचा जोर आहे, तर आपणही त्याच बाजूने गेलेले बरे, असा विचार त्यांनी केला असावा. अर्थात, ते शरद पवारांविरोधात हिंदुत्वाकडे वळत असतील तर हरकत नाहीच, फक्त ते राहुल गांधींच्या जनेयुधारी नकली हिंदुत्वासारखे असू नये.


राष्ट्रीय राजकारणातील गांधी कुटुंबाप्रमाणेच महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबीयांचे स्थान राहिले. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती शरद पवारांनी गेल्या ५० वर्षांत कोलांटउड्या मारत का होईना, पण काँग्रेस व गांधी घराण्याशी संधान बांधण्याचे आणि सत्तेत राहण्याचे थांबवले नाही. अर्थातच, ते त्याला हिंदुत्ववादी-जातीयवादी शक्तींविरोधातील एकजूट आणि धर्मनिरपेक्षतेच्या जपणुकीचे नाव देत आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबातील पार्थ आणि रोहित या नव्या पिढीच्या विविध विषयांसंदर्भातील भूमिका पाहता, त्यांचा ओढा भगव्याकडे तर नाही ना, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही आणि तसे असेल तर त्याचे नक्कीच स्वागत केले पाहिजे. सर्वप्रथम पार्थ पवार यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी उभारण्यात येणार्‍या भव्य श्रीराम मंदिराच्या पायाभरणीबाबत मनमोकळ्या शब्दांत आनंद व्यक्त केला.



पार्थ यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात ‘जय श्रीराम’ची घोषणा देत ते श्रीराम मंदिराच्या माध्यमातून हिंदू श्रद्धास्थानाची पुनर्स्थापना होत असल्याचे म्हणाले. तसेच अयोध्येतील बाबरी मशिदीचा दावा सर्व मार्गांनी पराभूत झाल्याचेही त्यांनी यात अधोरेखित केले. पार्थ पवार यांची ही भूमिका नेमकी त्यांचे आजोबा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत धोरणाला छेद देणारी आहे. कारण, शरद पवारांनी कधीही अयोध्येतील बाबरी ढाँचाखाली श्रीराम मंदिर असल्याचे विधान केलेले नाही वा बाबरी ढाँचाची निर्मिती मंदिर पाडून झाल्याचे म्हटले नाही. उलट अन्य तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि हिंदुविरोधी राजकीय पक्ष व नेत्यांप्रमाणेच संबंधित जागेवरील कथित बाबरी ढाँचाचीच बाजू त्यांनी घेतली. इतकेच नव्हे तर श्रीराम मंदिराच्या पायाभरणीआधीही त्यांनी आपला विरोध दर्शवला आणि ‘मंदिर बांधल्याने कोरोना जाईल का,’ असा निरर्थक प्रश्न विचारला व हिंदुत्वाला किंवा हिंदू श्रद्धास्थानांना आपला विरोध असल्याचे दाखवून दिले. हा सवाल निरर्थक अशासाठी कारण मंदिर बांधल्याने कोरोना जाईल, असा दावाही कोणी केलेला नव्हता. अशा परिस्थितीत पार्थ पवार यांनी घेतलेली भूमिका निराळी ठरते आणि त्यांची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत, याची चाहूलही त्यातून मिळते.



दरम्यान, पार्थ पवार यांनी स्वतःच हा वेगळा मार्ग निवडला की, त्यांना अन्य कुणाचे किंवा अजित पवारांचे मार्गदर्शन आहे, याचाही विचार केला पाहिजे. कारण, २०१९सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शरद पवारांचे पुतणे आणि पार्थ पवारांचे वडील अजित पवार यांनीही अशीच काहीशी भूमिका घेतली होती. त्याला आता १२महिने होत असून गेल्या ऑगस्टमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा ध्वज फडकावण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचा भगव्या झेंड्याबाबतचा आदेश वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी अजिबात संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रामुख्याने काँग्रेस व राहुल गांधी यांनी केलेली टीका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी त्याचे समर्थन करण्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपले वेगळे मत मांडले होते. “देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि इतरही अनेक गोष्टींमध्ये सावरकरांचे योगदान आहे, ते नाकारुन चालणार नाही,” असे रोखठोक विचार अजित पवार यांनी व्यक्त केले होते. अजित पवारांची ही भूमिकादेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या धोरणाशी विसंगतच होती. मात्र, आपली ही भगव्याबाबतची किंवा हिंदुत्वाबाबतची भूमिका अजित पवार स्वतः नव्हे तर पुत्र पार्थ पवार यांच्याकडून पुढे नेत असावेत का? तसेच एकीकडे पार्थ पवार यांनी श्रीराम मंदिराचे स्वागत केलेले असतानाच शरद पवारांचे दुसरे नातू आमदार रोहित पवार यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली.



लोकांच्या धार्मिक भावना आणि रोजीरोटीच्या मुद्द्यावरुन त्यांनी कोरोना व ‘लॉकडाऊन’मुळे बंद करण्यात आलेली मंदिरे खुली करावीत, असे म्हटले. रोहित पवार यांची ही भूमिकादेखील शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या धोरणाविरोधातीलच आहे. तसेच नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅनिटरी पॅडविषयी घेतलेल्या निर्णयाचेही रोहित पवार यांनी अभिनंदन केले. मात्र, पार्थ पवार असोत किंवा रोहित पवार आणि त्याहीआधी अजित पवार असोत, ही मंडळी पक्षाची चौकट मोडण्याची भूमिका का घेत असतील? असे कोणते कारण ठरले की त्यांना आता हिंदूंची, भगव्याची आठवण व्हावी? तर देशातले समाजकारण, राजकारण झपाट्याने बदलत असून २०१४ सालापासून निर्माण झालेले हिंदुत्वाचे वातावरण यापुढेही कायम राहणार, हे निश्चित. म्हणजे देशात सर्वत्र हिंदुत्वाचा प्रसार-प्रचार आतापेक्षाही अधिक होणार असून तशा वातावरणात धर्मनिरपेक्षतेसारख्या भंपकपणाला जनतेकडून लाथाडलेच जाईल. परिणामी, धर्मनिरपेक्षतेच्या नावावर इथल्या बहुसंख्यकांना डिवचणार्‍या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल, ते नामशेषही होतील. तेव्हा आपले भवितव्य काय, हा भलामोठा प्रश्न अजित पवार, पार्थ वा रोहित यांना पडला असेल तर आश्चर्य नाही आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी भगव्याचा, हिंदुत्वाचा आधार घेणे त्यांना क्रमप्राप्त आहे. म्हणूनच जमेल तसे आणि जमेल तितके आपले हिंदुपण दाखवून देण्याचे काम पवार कुटुंबातल्या पुढल्या दोन पिढ्या करत असल्याचे दिसते.



तसेच शरद पवारांनी कधी बंड करुन स्वतःचा स्वतंत्र राजकीय प्रवाह निर्माण केला नाही. उलट सत्तेच्या उपभोगासाठी फक्त याच्या-त्याच्या जोड्या लावण्याचा, सरकार बनवण्याचा उद्योगच त्यांनी केला आणि आपल्या मागे-पुढे प्रशासकीय-पोलिसी ताफा राहील, याची खबरदारी बाळगली. मात्र, राजकारणात आपले बस्तान बसवण्याची ही शरद पवारांची स्वतःची पद्धती होती. पण, सत्तेत राहण्यासाठीच्या या काकांच्या करामती आपल्याला भावी काळात जमतील का, हा अजित पवारांपुढील तसेच पार्थ व रोहित पवारांपुढील प्रश्न आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाचा जोर आहे, तर आपणही त्याच बाजूने गेलेले बरे, असा विचार त्यांनी केला असावा. मात्र, यासाठीची चाल ते पुत्र पार्थ पवार यांच्याद्वारे खेळत असल्याचे दिसते. म्हणजे आधी पार्थ यांना नेमका कसा प्रतिसाद मिळतो, लोक कितपत समर्थन देत आहेत की विरोधात जात आहेत, याचा अंदाज घेण्याचा हा अजित पवारांचा प्रयत्न असेल. त्यानंतरच ते अंतिम निर्णय घेतील, असे समजते. अर्थात, पवार कुटुंबातली पुढली पिढी शरद पवारांच्या राजकारणाविरोधात जाणारा निर्णय घेऊन हिंदुत्वाकडे वळत असेल तर त्याला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. फक्त ते राहुल गांधींच्या जनेयुधारी नकली हिंदुत्वासारखे असू नये.
@@AUTHORINFO_V1@@