याला जीवन ऐसे नाव...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020
Total Views |

vividha_1  H x
शोकातून जाणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कठीण आहे, पण त्यातून सावरणेही शक्य आहे, गरजेचे आहे. यात आपल्याला दिलासा देणार्‍या गोष्टी व्यक्तीने स्वत: शोधल्या तर अधिक चांगले. गेलेल्या गोष्टी आणि व्यक्ती आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण करतात, पण त्या पोकळीत आपण हरवायचे की नाही, हे ज्याने त्याने ठरवायचे.

‘लॉकडाऊन’च्या पहिल्या सत्रात आमच्या परिचयाच्या कुटुंबातील एका गृहस्थाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. तो सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे कुटुंबाला प्रॅक्टिकल समस्यांचा सामना करताना खूप भावनिक आघातातून जावे लागले. त्यातच त्याच तो एकुलता एक मुलगा आणि त्या गृहस्थाची नव्वदीच्या घरात पोहोचलेली वृद्ध माता. या काळात दुसरा कोणी नातेवाईकही मदतीला येऊ शकत नव्हता. शेजार्‍यांनी घाबरून दरवाजे बंद करून टाकलेले. कोरोनाच्या विषाणूला अगम्य आणि गूढ भीतीचे पूर्ण वलय असल्याने जो तो त्याच्या सावलीपासून दूर पोहोचलेला. शेवटी त्या एकट्या मुलाने कशीबशी सगळी प्रक्रिया पूर्ण करून ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत एका दुसर्‍या मुलाच्या मदतीने आपल्या पित्याचे सगळे सोपस्कार केले. त्यानंतर आजपर्यंत मी त्याची चौकशी मोबाईलवर जेव्हा जेव्हा करते, तेव्हा तो एकच गोष्ट खूप दुःखाने सांगतो की, आजी अजूनही भडभडून रडते. आता तो पंचविशीचा तरुण नव्वदीच्या घरातील आजीच्या भावनांचा कोलाहल समजू शकत नव्हता. त्यातच ‘लॉकडाऊन’मध्ये एकटे पडल्याने दोघांनाही इतर कोणी प्रत्यक्ष जाऊन सांत्वन करणारे नव्हते. दुःखाचा शोक वेळेनुसार कमी व्हावा, अशी अपेक्षा जरी असली, तरी परिस्थिती मात्र सर्वसाधारण नव्हती. कारण, अशा काळात सख्खे शेजारी साथ द्यायला तयारच नव्हते. बर्‍याच लोकांच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या जवळची व्यक्ती कोरोनाच्या काळात गमावली आणि कुणाचा आधारही मिळू शकला नाही. त्यामुळे शोककळा अधिक तीव्र तर झालीच, पण खूप काळ लांबलीसुद्धा.

दुखवटा किंवा शोक किती काळ चालेल, याचे मोजमाप नसतेच. शोक ही पूर्णत: सामान्य प्रक्रिया आहे. काही गोष्टी जसं आठवणीने गदगदायला होणं, ऊर्जा संपल्यासारखं वाटणं, दैनंदिन जगण्यात रस न वाटणं किंवा त्यात मन न रमणं, नियमित कामात लक्ष न लागणं या सर्वसामान्य अनुभवातून शोकाकुल व्यक्तीला जावे लागते. हळूहळू शोकाकुल व्यक्ती आपल्या नवीन दैनंदिन जीवनाला सुरुवात करते. तथापि काही व्यक्ती मात्र, अधिक गुंतागुंतीच्या दुखवट्यातून जातात. त्यांना त्या दुखवट्यातून बाहेरीही येता येत नाही आणि सर्वसामान्य आयुष्यही जगता येत नाही. त्यांच लक्ष प्रिय व्यक्तीच्या मृत्यूतून बाहेर पडतच नाही. आपल्या प्रियजनांचा मृत्यू स्वीकारणं त्यांना कठीण होतंच, पण आपण का जगतो आहोत, ही अपराधीपणाची भावना त्यांच्या मनातून जात नाही. त्यांना ती मृत व्यक्ती सतत भासत राहते. मनात मृत्यूचे विचार येतात. विशेषत: अचानक अनपेक्षित अपघाती मृत्यू दीर्घकालीन आजारात खूप व्यथित होऊन झालेला मृत्यू, कोवळ्या वयात झालेला मृत्यू प्रियजनांच्या हृदयात खोलवर जखम देतात. कुठल्या नात्यात शोक तीव्रतेने जाणवतो हे सांगणे कठीण आहे. पण, पुत्रशोक हा मात्यापित्यांना विकल करतो.
कुठल्याही परिस्थितीत शोक अनुभवणे न टाळता त्याला वाट करुन दिली पाहिजे. कधी कधी दुसर्‍यांना अस्वस्थ वाटेल म्हणून काही लोक आपलं दु:ख मनातच ठेवतात. तसं न करता शोक व्यक्त केला पाहिजे. दु:ख भरतानाच्या प्रक्रियेत कळत नकळत हिंमत लागते. अवसान लागते. डोळे भरुन येतात तेव्हा ‘माझ्या वैवाहिक जीवनात आम्ही किती सुखी होतो आणि आता मला एकाकी वाटत आहे.’ ‘आईबाबा होते तेव्हा मला माझा वाढदिवस साजरा करताना जो आनंद मिळायचा तो आता मिळत नाही,’ अशा प्रकारचं व्यक्त होणं माणसाला त्या अनमोल दु:खाला स्वीकारण्याची ताकद देतं. आपल्याला जे दु:ख कल्पनेतसुद्धा सहन करायला कठीण वाटतं, ते वास्तविकतेत स्वीकारण्याचे साहस अशा सुस्पष्ट प्रकटीकरणामुळे मिळायला लागते. बर्‍याच जणांना दु:खाने दडपल्या गेलेल्या शोकाकुल मनाला दु:ख पटकन विसरुन गेले, तर किती बरे होईल असे वाटते. ‘मी का विसरु शकत नाही’ हा प्रश्न थोडा किचकट आणि अनुत्तरितच राहणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी अशा सहज मनपटलावरुन पुसल्या जात नाहीत. आठवणी दाटतातच, पण आपल्याला एक करता येईल की, आठवणीत जो विरह वाटतो, त्याऐवजी आपण ज्या ज्या आठवणी आापल्या प्रिय व्यक्तीबरोबर जगल्या त्याबद्दल बोलायचे. त्या आठवणींना तजेला द्यायचा. असे केल्याने त्या आठवणींनी मनाला उभारी येते. किंबहुना, काहीही विसरुन जायची गरज भासत नाही. जे लोक सुखी आणि आनंदी असतात, त्यांच्या घरी कधी मृत्यू झालेले नसतात का? कोणाच्या घरात वा आयुष्यात मृत्यूचे दर्शन झाले नाही असे होत नाही, पण ज्यांनी ज्यांनी हे सत्य स्वीकारले, त्यांचे जगणे मार्ग सुसह्य झाले.
आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला सहज जाऊ देणे कुणाला शक्य नाही. ते खूप मोठे आव्हान आहे खरे. पण अशी वेळ नक्की येते की, आपण स्वत:चे वेगळे आयुष्य बांधायला सुरुवात करतो. एका दिवसात नाही, पण हळूहळू आपण आयुष्याला नवा अर्थ द्यायला लागतो. आपण आपल्या दु:खी जगण्याला नवीन वळण देतो, तेव्हाच कुठे जगायला शिकतो. शोकातून जाणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कठीण आहे, पण त्यातून सावरणेही शक्य आहे, गरजेचे आहे. यात आपल्याला दिलासा देणार्‍या गोष्टी व्यक्तीने स्वत: शोधल्या तर अधिक चांगले. गेलेल्या गोष्टी आणि व्यक्ती आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण करतात, पण त्या पोकळीत आपण हरवायचे की नाही, हे ज्याने त्याने ठरवायचे. बरेच जण ही पोकळी विधायक कृतीनेही भरुन काढतात. आयुष्यात जगत पुढे जाणेसुद्धा जमवून घ्यायला पाहिजे. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने आयुष्यात कधी उत्तम संधी गमावली, कधी कौशल्य गमावले, कधी भावना गमावल्या, तर कधी तत्त्वं गमावली. या सगळ्या गोष्टी परत त्याच अस्तित्वात मिळतील, असे नाही, पण हा सगळा अनुभव म्हणजेच जगणे आहे.
- डॉ. शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@