आहार हेच औषध!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020
Total Views |

ahar_1  H x W:


आपली प्राणशक्ती आपण आहाराने नीट, व्यवस्थित जोपासली, तिची काळजी घेतली, तर आपण कधीच आजारी पडणार नाही. ज्यांची प्राणशक्ती कमी झाली आहे, त्यांना औषध जीवनदान देऊ शकत नाहीत. योग्य प्रमाणात आहार हेच औषध आहे.


आपला आहारच आपल्या रोगांना कारणीभूत आहे. नैसर्गिक आहार आपल्याला निरोगी ठेवतो आणि अनैसर्गिक आहार आपल्याला आजार देतो. आपण जो आहार घेतो तो आहार, त्याचे परिणाम आपल्या शरीरावर, आरोग्यावर आणि आपल्या वागण्यावर दिसतात. आपल्याकडे सुंदर आहाराची परंपरा आहे. आज हा आपला गैरसमज आहे की जे काम औषधं करतात, ते आहार करूच शकत नाही. आपण जर नैसर्गिक आहार घेत राहिलो, चौरस आहार घेत राहिलो, तर शरीर कधीही आजारी पडणार नाही. औषधाची आवश्यकता पडणार नाही. शरीरास उद्भवणारे आजार, रोग हे औषधांनी दाबून टाकले जातात. परंतु, समतोल योग्य आहाराने आपण शरीरातल्या आजारांना मुळापासून दूर करू शकतो. जोपर्यंत हे मुळापासून दूर होत नाहीत, तोपर्यंत शरीर निरोगी होऊ शकत नाही. अयोग्य चुकीच्या आहारामुळे पचन क्रिया मंदावते, पचनावर परिणाम होतो. परिणामी, शरीरामध्ये विषारी वायू आणि द्रव्यांचा साठा होतो. हळूहळू हे रक्तात मिसळतात. हेच निर्माण झालेले दोष भविष्यात होणार्‍या आजारांची सूचना असतात. आपली प्राणशक्ती आपण आहाराने नीट, व्यवस्थित जोपासली, तिची काळजी घेतली, तर आपण कधीच आजारी पडणार नाही. ज्यांची प्राणशक्ती कमी झाली आहे, त्यांना औषध जीवनदान देऊ शकत नाहीत.



योग्य प्रमाणात आहार हेच औषध आहे. आपल्या शरीराला जीवनसत्वांबरोबरच धातू आणि क्षारांची गरज असते. यांचा समतोल बिघडला तरी अनेक आजार उद्भवतात. म्हणून पूर्वी तांबे, सोने, चांदी, लोह या धातूंना पाण्यात उकळून ते दिले जायचे. अन्न लोखंडाची कढई, बिड, माती, तांब, पितळ्याच्या कल्हई लावलेल्या भांड्यात शिजवले जायचे. पिण्याचे पाणी हे माती अथवा तांब्याच्या पात्रात ठेवलेले असायचे. बाळगुटीमध्ये सोन्याचा एक वळसा उगाळला जात असे, पण आता बाळगुटीच बंद झाली. बाळाला पोषकतत्त्व आईच्या दुधातून मिळतात. परंतु, आईने घेतलेल्या आहारातून बाळाला त्रास होऊ नये. हवेतून होणारे जंतूसंसर्ग होऊ नयेत म्हणून बाळाला आईच्या किंवा गाईच्या दुधातून ज्येष्ठमध, हळद, सुंठ, वेखंड, बदाम, खारीक, जायफळ, मायफळ, मुरुडशेंग, गजपिंपळी, छोटी पिंपळी हे घटक असायचे. दात येताना डिकेमली उगाळून लावली जायची. त्यामुळे दात येताना त्रास होत नसे.



बाळाची पूर्ण वाढ ही रसांवरच होते. आईने खाल्लेल्या अन्नातून हे रस त्याला मिळत असतात. बाळ जेव्हा जन्माला येत तेव्हापासून ते अन्न ग्रहण करायला सुरुवात करेपर्यंत त्याची त्वचा ही मुलायम, मऊ, नितळ असते. तेव्हा ते सगळ्यांना हवेहवेसे वाटते. परंतु, तेच त्याने जेवण्यास सुरुवात केली की आपणच म्हणतो, ‘लहानपणी किती छान दिसायचा, आता पाहा कसा काळवंडला आहे.’ बरोबर ना? म्हणजेच आहार हाच मुख्य घटक आहे निरोगी रहाण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या प्रांतानुसार आपल्याकडे आहेत. कडीपत्ता, खोबरे, तीळ, जवस, कारळेतीळ, शेंगदाणे वगैरे. लहान मुलांना कफ झाला तर आळशी कढईत किंवा पातेल्यात तडतडवून त्यात पाणी घालून ते ऊकळून त्यांना पाजले तर कफ दूर होतो. लसणीची माळ गळ्यात घालून ही कफ दूर होतो. बाळगुटीमध्ये ज्येष्ठमध, वेखंड, सुंठ, हळद यांचा एक एक वळसा जास्त उगाळला की कफ मोकळा होतो. आळशीमध्ये असलेल्या घटकांचा आज परदेशात शोध लागून ती किती महत्त्वाची आहे, हे सांगितले जात आहे. पण, आपले पूर्वज याचा वापर करत असल्यामुळे त्यांना औषधांची आवश्यकता भासली नाही. तेच खोबर्‍याच्या बाबत पण हे खाल्ल्याने आणि तेल प्यायल्याने काय फायदा होतो, हे परदेशातून सांगितले गेल्यावर आपण त्याचा महिमा त्यांच्या नावानी गाऊ लागलो. पण, आपल्याला आपल्या आजीनी सांगितलेल्या गोष्टीवर आपला विश्वास नाही. जिथे पिकतं तिथे विकत नाही, हेच खरं. म्हणून मी म्हणते आपली भारतभूमी ही सर्वांगीण संपन्न आणि परिपूर्ण आहे. अनेक वनस्पतींचं भांडार आहे, ज्यांना आपल्या पूर्वजांनी मानाच स्थान दिलं आहे. प्रत्येकाला जन्मानुसार ज्या वनस्पती दिल्या गेल्या आहेत, त्यांच्या वापराने, पूजनाने, सहवासाने आजार दूर होतात, हा विषय वेगळा असला तरीही आरोग्याशी निगडित आहे. निसर्गोपचारात याचा वापर केला जातो.



हिरव्या भाज्या आपल्या शरीरात असलेल्या हरितद्रव्यांची, लोहाची, धातूंची पूर्तता करतात ज्या आपल्या शरीराला आवश्यक असतात. नुसत्या बिनापॉलिश तांदळाने शरीरात ताकद येते. त्याची पेज (भात शिजवून काढलेले पाणी) आजारी माणसासाठी उत्तम औषधाचे काम करते. पण ते आज कोणी खात नाही. चमकदमक दुनियेत अन्न हे चमक असणारं खाल्ल जातं आणि आजाराला आमंत्रण.आपल्या आहारातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कोशिंबीर, पचडी. यामुळे कच्च्या भाज्या सेवन केल्या जातात, ज्याला ‘सॅलड’, ‘रायता’ वगैरे आधुनिक नावं आहेत. ज्या आपल्या पोटाला स्वच्छ करण्यास उपयुक्त आहेत. म्हणजेच रेषेदार आहार. पूर्वी कोंड्यासकट पिठं वापरली जायची, ज्यामुळे पोट साफ होण्यासाठी औषधांची गरज भासली नाही. तेव्हा सत्वयुक्त आहार होता आणि आता सत्वहीन आहे आणि त्यामुळे रोग अनेक आहेत. आहारच औषध आहे आणि आहारच घातक आहे कोणता घ्यायचा हे सर्वस्वी आपल्यावर आहे. प्राकृतिक की अप्राकृतिक?


- सीता भिडे
@@AUTHORINFO_V1@@