ना जनाची, ना मनाची !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020   
Total Views |

vedh_1  H x W:


अशा बेशिस्त तरुणांना ना स्वत:च्या आरोग्याची काळजी, मग समाजाचा विचार तर अगदी दूरचीच गोष्ट. कारण, जनाची नाही, तर किमान मनाची थोडी तरी लाज शिल्लक असती, तर अशा महामारीच्या परिस्थिती नियमांचे उल्लंघन करुन, दारु ढोसून नाच-गाणे सुचले नसते.


कोरोनाच्या विळख्यातून अद्याप ना मुंबईला मुक्ती मिळाली ना देशाला. मुंबईत अजूनही दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडतात आणि शेकडोंना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे आर्थिक चक्र गतिमान करण्यासाठी ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाली, म्हणजे सर्व काही अगदी पूर्ववत ‘जैसे थे’ झाले, या भ्रमात राहता नये. परंतु, काही अतिउत्साही व्यसनी तरुणांना पार्ट्यांचा मोह काही सुटता सुटेना. अशाच या पार्टीखोरांवर रविवारी मुंबई पोलिसांनी ओशिवराच्या एका हॉटेलवर धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले.‘अनलॉक’ची प्रकिया सुरु झाली असली तरी अद्याप हॉटेल, रेस्टॉरंट, पब्स यांना परवानगी देण्यात आलेली नाही. असे असताना हॉटेल मालकाने सर्व नियम धाब्यावर बसवत ही हुक्का पार्टी आयोजित केल्याचे समजते आणि मग काय, चार महिने कोंडवाड्यात काढलेली ही हौशी मंडळी संधी साधत हुक्क्याच्या धुरात बेधुंद धिंगाणा घालत होती.


आता मुंबईत हुक्का पार्लरवर बंदी असतानाही ही सगळी व्यवस्था गपचूप केली जाते, हे वेगळे सांगायलाच नको. पोलिसांनी विविध कलमांतर्गत पार्टीखोर तरुणांवर, हॉटेल मालकासह एकूण ९७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पण, या पार्टीमध्ये बहुतांशी सहभागी झालेले हे उच्चभ्रू आईबापांचेच पोरंपोरी असतील, हे वेगळे सांगायला नको. काही पालकांचे पैसे उडवणारे, तर काही आपल्याच कमाईतून ऐष करणारे. उच्चभ्रू म्हणजेच सुशिक्षित. परिस्थितीची चाड असणारे, असा समज. पण, या अशा बेशिस्त तरुणांना ना स्वत:च्या आरोग्याची काळजी, मग समाजाचा विचार तर अगदी दूरचीच गोष्ट. कारण, जनाची नाही, तर किमान मनाची थोडी तरी लाज शिल्लक असती, तर अशा महामारीच्या परिस्थिती नियमांचे उल्लंघन करुन, दारु ढोसून नाच-गाणे सुचले नसते. मुद्दा कोणाच्या पैशांचा, व्यसनांचा आणि सवयीचाही नाही. तो ज्याचा त्याचा प्रश्नच. परंतु, कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारातही स्वत: धोका पत्करुन अंधारात घोळक्याने नाचगाणे करणे हा कुणीकडचा सुशिक्षितपणा म्हणायचा? इथे डॉक्टर, पोलीस, सरकार आणि सर्वच सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण असताना, त्यांचे जीव धोक्यात असताना अशाप्रकारे आपल्या मजेसाठी हुक्का पार्ट्यांत दंगा करणेे हा नेमका कसला माज? अशा हुक्केबाजांना पोलिसांचे चारे बुक्के पडल्यानंतर तरी उपरती होईल का?



‘लोकल’घाई...


जोपर्यंत मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची वाहतूक पूर्वपदावर येणार नाही, तोपर्यंत तरी कोरोनाच्या विळख्यातून मुंबईकरांची पूर्णपणे सुटका झाली असे मानण्याचे काहीएक कारण नाही. यासंबंधी सरकार दरबारी बैठका सुरु असून त्यासंबंधी कधी आणि काय निर्णय होतो, याकडे कोट्यवधी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल रुळावर धावत असली तरी या लोकलच्या हजारो फेर्‍यांमध्ये दररोज ७५ लाख मुंबईकर प्रवास करतात. पण, आता यापैकी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी ही सेवा सुरु असून चाकरमानीही लोकलच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे दैनंदिन तीन-चार तास खर्ची घालून मुंबईनजीकच्या शहरांमधील चाकरमान्यांना प्रवास करावा लागतो. कारण, एका आसनावर एकच व्यक्ती या नियमामुळे बेस्ट आणि एसटीची प्रवासीक्षमताही अर्ध्यावर आली. त्यात एवढा लांबवरचा प्रवास उभ्याने करणेही दमवणारे.

मग, दोन तास रांगेत आणि पुढे आणखीन दोन तास प्रवास असा उपद्व्याप करुन पोटापाण्यासाठी कित्येकांचा हा दमछाक घडविणारा प्रवास सुरुच आहे. म्हणा, मुंबईकरांना प्रवासाचे वावडे नसले तरी चार-चार तास तोंडावर मास्क लावून आणि गर्दीचा बचाव करत प्रवास करणेही तितकेच जिकिरीचे. पण, त्याला पर्याय नाही. बर्‍याच मुंबईकरांना वाटते, आता लोकलसेवाही सुरु करावी. मुंबईतील प्रवासाच्या दृष्टीने ही मागणी रास्त असली तरी कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. शिवाय, ‘बेस्ट’, एसटीमध्ये किमान ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करणे काही प्रमाणात जमेलही, पण ज्या लोकलमध्ये सकाळी-संध्याकाळी चढण्या-उतरण्यासाठी एरवीही श्वास रोखून धरावा लागतो, तिथे कोण, कशी पाळणार ‘दो गज कि दूरी?’ इथे एकाच हॅण्डलवर चार चार हात लटकलेले, घामट दर्पाचे शर्ट एकमेकांना चिकटलेले आणि त्यात सामानाची फरफट. अशा अवस्थेत लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करणे हे कोरोनाच्या फैलावाला आणि कदाचित दुसर्‍या लाटेला आमंत्रण देणारेही ठरु शकते. तेव्हा, यासंबंधी राज्य आणि केंद्र सरकार विचारपूर्वक निर्णय घेतीलच. पण, हा निर्णय घेताना मुंबईची लोकसंख्या, प्रवासीसंख्या, लोकलप्रवासातील वास्तव स्थिती याकडे डोळेझाक होणार नाही, एवढीच अपेक्षा!
--
@@AUTHORINFO_V1@@