माणसाच्या जगण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020   
Total Views |

dr bhaskar mharsale_1&nbs


कृतिशील साहित्यिक, उत्तम कुस्तीपटू ते संवेदनशील समाजशील माणूस असे हे डॉ. भास्कर म्हरसाळे म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व...


“मी शाहू-फुले-आंबेडकरांचा झेंडा हातात घेतला की, मला आणखीन कोणत्याच झेंड्याची गरज नाही. मी स्वतंत्र आहे. मी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणार आहे.” सत्तरच्या दशकात त्या युवकाने पँथरच्या चळवळीच्या नेत्याला सांगितले. त्या नेत्यानेही म्हटले, “ठीक आहे. विचारांचे स्वातंत्र्य आहे. तुला काय वाटते ते तू कर. मी तुला सांगणार नाही की तू का सामील होत नाहीस?” कार्यकर्त्याला विचारस्वातंत्र्य देणारा तो चळवळीचा नेता होता. कवी नामदेव ढसाळ आणि तो युवक होता भास्कर म्हरसाळे. ‘आता माझ्या मनाप्रमाणे वागेन,’ असे सांगणारे म्हरसाळे असे म्हणाले. हे बोलणेही केवळ बोलणे नव्हतेच, तर भास्कर यांनी नेहमीच वैचारिक स्वातंत्र्य जपले. आपल्या विचारांशी ते प्रामाणिक राहिले. पँथर चळचवळीमध्ये नामदेव ढसाळ, राजा ढाले ते रामदास आठवले या सगळ्यांसोबत चळवळी केलेले डॉ. भास्कर म्हरसाळे म्हणजे नाशिक साहित्यसृष्टीतले मोठे प्रतिष्ठित नाव. साहित्यिक वसंत कानिटकर ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा स्नेह त्यांना लाभलेला. त्यांच्या ‘कुस्तीचा आखाडा’ पुस्तकास महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाड्.मयाचा पुरस्कार प्राप्त झालेला. एक ‘अधुरे स्वप्न’, ‘नाशिकचा चिवडा’ (विडंबन काव्यसंग्रह), ‘कुंभोळ्या’ आणि ‘सटर पटर’ (चारोळी संग्रह) ही त्यांची इतर पुस्तकेही प्रसिद्ध. समाजसेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे तीन पुरस्कार मिळालेले.


डॉ. भास्कर म्हरसाळे एक कुस्तीपट्टू आहेत. उत्कृष्ट मल्ल म्हणून दारासिंग यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झालेला. त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘नाशिक श्री’ पुरस्कारही पटकावलेला. साहित्य ते कुस्ती या प्रवासात सर्वसमावेशक समाजसेवा करणारे संवेदनशील मनाचे आणि तितक्याच कर्तृत्ववान आयुष्याचे धनी म्हणजे डॉ. भास्कर म्हरसाळे. त्यांचे मूळ गाव जळगाव. पण, गेल्या पाच पिढ्यांपासून म्हरसाळे घराणे नाशिकमध्ये स्थायिक. डॉ. भास्कर यांचे वडील बबन हे लौकिक स्तरावर अशिक्षित. पण त्यांना उत्तम अक्षरओळख. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ तो. तथाकथित जातीय उतरंडीमध्ये म्हरसाळेंनी पोथी-पुराण वाचू नये असेच दुष्ट संकेत. पण, त्या काळात त्यांचे वडील अभंगाचे उत्तम निरूपण करत. त्यांची आई लक्ष्मीबाई यासुद्धा उत्तम काव्यरचना करत. सहावी-सातवीला असताना भास्करही उत्तम निरूपण करायला शिकले. त्यावेळी म्हरसाळे कुटुंब नाशिकच्या गांगुर्डे चाळीत राहायचे. तिथे विविध जातीधर्माचे लोक एकोप्याने राहत होती. या काळात आंबेडकर जयंतीला वस्तीमध्ये वामनराव कर्डक यांचे जलसे व्हायचे. ते कोरससाठी भास्कर यांना सोबत घ्यायचे. त्यावेळी भास्कर सातवी-आठवीला असतील. वामनराव कर्डकांचे काव्यविश्व भास्कर यांनी जवळून पाहिलेले. त्याआधीही भास्कर यांनी अण्णाभाऊ साठे यांनाही प्रत्यक्ष पाहिलेले-ऐकलेले. नाशिकमध्ये अण्णाभाऊंनी स्टेजवर स्वत: हलगी वाजवत ‘माझी मैना गावाकडं राहिली’ गाऊन दाखवलेले. त्यावेळी पाचवी-सहावीला असलेले भास्कर त्यांचा आवाज, सादरीकरणाची शैली पाहून इतके हरखून गेले की, गर्दीचे कडे तोडत ते सरळ अण्णाभाऊंपर्यंत पोहोचले. त्यांच्याकडे पाहतच राहिले की, हा माणूस किती छान गाणी म्हणतो!


असो, पुढच्या काळात या सर्व साहित्यकांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊनच की काय भास्कर स्वत: चळवळीचे साहित्यिक झाले. ते कलाशाखेतून पदवीधर झालेच होते. पुढे त्यांनी कोकण कृषी विद्यापीठातून गुरांच्या उपचारासंदर्भातला डिप्लोमा केला. जिल्हा परिषदमध्ये त्यांना तत्काळ नोकरीही लागली. नोकरी करत असताना नाशिकमधील वनवासीबहुल दुर्गम क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा अनुभव सुरस आणि महत्त्वाचाच आहे. गुरे आजारी पडली की लोक भगताकडे नेत. कोंबड्या-बकरे कापत, पण त्यांच्या गोठ्यातले गाई- म्हशी, बैल बरे होत नसत. एकदा गावातल्या एका शेतकर्‍याची गाय आजारी पडली. तिच्या मालकाने भगत, गंडे-दोरे केले, पण ती मरणाच्या वाटेला लागली. तरीसुद्धा गावातले डॉ. भास्करांकडे जायला तयार नव्हते. डॉ. भास्कर स्वत: तिथे गेले. म्हणाले, “मीसुद्धा भगतच आहे. मला बकरे-कोंबडे काही नको. मी गाईला एक सुई टोचतो.” बस. याआधी भास्करांनी कसलीशी विभूतीही ओवाळली. का तर त्या शेतकर्‍याने त्यांच्यावर विश्वास ठेवावा म्हणून. भास्कर यांनी उपचार केल्यावर ती गाय दुसर्‍याच दिवशी बरी झाली. त्यामुळे दुरून दुरून गुराढोरांना बरे करण्यासाठी लोक डॉ. भास्कर यांना बोलवू लागले. डॉ. भास्करांची ज्या गावात बदली होईल, त्या गावात ते मुलांना कुस्ती शिकवत, मल्लखांब शिकवत, गाणी-गोष्टी शिकवत. त्यांच्या तालमीतली शेकडो मुलं आज सैन्यात आणि पोलीस दलात आहेत. पुढे त्यांचा संपर्क अशोक बांगर यांच्यामुळे समरसता मंचाशी आला. विजयराव कापरे, दिलीह क्षीरसागर यांच्या संपर्कात ते समरसता मंचाचे कामही करू लागले. इचलकरंजीला झालेल्या समरसता साहित्य संमेलनाचे ते निमंत्रकही होते. वयाचे ६५ वर्षे पार केलेले डॉ. भास्कर कोरोना काळात लोकांची सेवा करत आहेत, गरजूंना अन्नधान्य वाटपाची व्यवस्था करत आहेत. त्यांना विचारले की, तुमची प्रेरणा काय? यावर त्यांचे म्हणणे, “ माणसाचे जगणे हीच माझी प्रेरणा आहे.” खरेच डॉ. भास्कर यांसारखे कृतिशील साहित्यिकच माणसाच्या जगण्याला अर्थ देतात.


@@AUTHORINFO_V1@@