बंदिस्त पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2020   
Total Views |

jagachya pathivr_1 &


भारताच्या लष्करी वाहनांवर झालेला दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृतच होता हे पुन्हा अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानने द्विराष्ट्र मैत्रीनीतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून चालविला आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेची मनधरणी करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र, चीन वगळता अन्य कोणताही देश त्याला दारात उभे करायला तयार नाही.



राष्ट्र स्वतंत्र होणे हा जरी संघर्षमय प्रवास असला तरी राष्ट्राचे सार्वभौमत्व कायम अबाधित राहणे हे नक्कीच एक आव्हान आहे. राष्ट्राचे स्वातंत्र्य हे प्रदीर्घ आणि अविरत लढा दिल्यानंतर प्राप्त होत असतेच. मात्र, स्वतंत्र राष्ट्राचे सार्वभौमत्व कायम राखणे हे त्या राष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या नीतिमत्तेवर आणि कार्यपद्धतीवर निर्भर करत असते. सध्याच्या घडीला भारताबरोबरच स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नुकताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनी पाकिस्तान दौरा निश्चित केल्याचे वृत्त आहे. भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांचा हा दौरा भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठीच आगामी काळात आव्हान निर्माण करणारा ठरण्याची दाट शक्यता आहे. लडाखमधील गलवान खोर्‍यात चीनने केलेली आगळीक ही व्यूहात्मकदृष्ट्या फायद्याची आहे, यावर लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेली मते पाहिली, तर चीनचा वेगळाच कांगावा दिसून येतो. चीन, पाकिस्तान आणि नेपाळ या तीन देशांच्या कुरापती सध्या भारताविरोधात वाढल्या आहेत. लडाखच्या सीमेनजीक पाकिस्तानच्या हद्दीत चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत, तर काश्मीरच्या अन्य भागात पाकिस्तानने कुरापती वाढविल्या आहेत. भारताच्या लष्करी वाहनांवर झालेला दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृतच होता हे पुन्हा अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानने द्विराष्ट्र मैत्रीनीतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून चालविला आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेची मनधरणी करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र, चीन वगळता अन्य कोणताही देश त्याला दारात उभे करायला तयार नाही.



काश्मीरप्रश्नी भारताविरोधात भूमिका घ्यायला नकार दिलेल्या सौदी अरेबियावर आगपाखड केल्याची किंमत पाकिस्तानला नुकतीच मोजावी लागली. साडेसहा अब्ज डॉलर्सच्या कर्जापैकी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज सौदी अरेबियाने पाकिस्तानकडून तातडीने वसूल करून घेतले. त्यामुळे पाकिस्तान अडचणीत आला असताना शी जिनपिंग पाकिस्तानच्या दौर्‍यावर जात आहेत. या दौर्‍यात दोन्ही देशांमध्ये संरक्षणविषयक महत्त्वाचे करार होणार असल्याची दाट शक्यता आहे. याआधी त्यांनी २०१५ मध्ये इस्लामाबादचा दौरा केला होता. चीनच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जिनपिंग यांच्या पाकिस्तान दौर्‍याबाबत अद्यापही तारखा जाहीर झाल्या नाहीत. या दौर्‍याला ऐतिहासिक करण्यासाठी पाकिस्तान आणि चिनी अधिकार्‍यांचे प्रयत्न सुरू असून सातत्याने बैठका सुरू आहेत. जिनपिंग यांनी २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी)च्या अनुषंगाने ५१ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. दक्षिण आशियात चीनचा वाढता प्रभाव आणि भारतासोबत तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्या या पाकिस्तान दौर्‍याला महत्त्व आहे. चीनने फक्त लडाख, अक्साई चीन भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैन्याची जमवाजमव सुरू केली नसून पाकव्याप्त काश्मीरमध्येही अनेक प्रकल्पाच्या नावाखाली आपल्या सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. त्याशिवाय पाकिस्तानला चीन आणखी मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.



सौदी अरेबियासोबत संबंध बिघडल्यानंतर पाकिस्तानला चीनकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आर्थिक कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या पाकिस्तानला आता सौदी अरेबियाने झटका दिला आहे. पाकिस्तानने २०१८मध्ये सौदी अरेबियाकडून ६.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. यामध्ये पाकिस्तानला ३ .२ अब्ज डॉलर्सचे कच्चे तेल उधार देण्यात आले होते. आता या कराराची वेळ मर्यादा संपली असून त्याचे नूतनीकरण झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानसमोरील आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. जागतिक नाणेनिधीनेदेखील मागील पाच महिन्यात तांत्रिकदृष्ट्या आर्थिक मदत रोखली आहे. अशा वेळी जिनपिंग पाकच्या पाठीवर सहानुभूतीचा आणि मदतीचा हात फिरविण्याची शक्यता आहे. मात्र, चीनचा हा हात पाकसाठी नसून भारताच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी असणार आहे. त्यामुळे या मदतीत नि:स्वार्थ किंवा मैत्रीपूर्ण भाव असण्याची सुतराम शक्यता नाही. अडचणीच्या काळात करण्यात आलेली मदत नि:स्वार्थ नसेल तर, ती आगामी काळात आपल्या अस्तित्वावरच घाला घालणारी असते. त्यामुळे चीनच्या मनातील डाव हा वेगळाच असून यामुळे पाकिस्तानचे सार्वभौमत्वच येणार्‍या काळात धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनचे पाकसोबतचे मैत्री बंधन हे जरी आजमितीस भारतासाठी धोक्याचे वाटत असले तरी ते अल्पकाळ आहे. मात्र, या नीतीमुळे पाकिस्तान जागतिक पटलावर बंदिस्त होण्याचीच शक्यता जास्त दिसून येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@