माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू

    16-Aug-2020
Total Views |

chauhan _1  H x



नवी दिल्ली :
माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ७३ वर्षांचे होते. गेल्या महिन्यात १५जुलै रोजी त्यांना गुरुग्राम मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चेतन चौहान हे उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातले दुसरे मंत्री आहेत ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याआधी ३ ऑगस्टला कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता.



किडनी फेल झाल्यानंतर चौहान यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ११ जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना किडनी आणि उच्च रक्तदाबाची समस्या सुरु झाली होती. प्रकृती बिघडल्याने त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन वेळा चेतन चौहान यांची कोरोना टेस्ट निगेट्विव्ह आली होती. मात्र पुन्हा त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. चौहान यांनी १९६९ ते १९७८या कालावधीत ४० कसोटी सामने खेळले. त्यांनी ३१.५७ च्या सरासरीने २०८४ धावा केल्या असून त्यांच्या नावावर १६ अर्धशतके आहेत. त्यांनी १३वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी ७वन डे सामन्यांत १५३ धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.



चेतन चौहान यांनी १९९१ मध्ये अमरोहा येथून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि तेथून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर पुन्हा एकदा १९९६ भाजपने त्यांना याच ठिकाणाहून निवडणुकीच्या मैदानात उतरवले. परंतु त्यावेळी त्यांचा पराभव झाला. १९९८ मध्ये चेतन चौहान पुन्हा खासदार म्हणून निवडून गेले. त्याच वेळी त्यांनी १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत नशीबही आजमावले परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या ते अमरोहा जिल्ह्यातील नौगावाचे आमदार होते.