शिवसेनेचा कम्पाऊंडर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2020
Total Views |

agralekh_1  H x


मुख्यमंत्रीपदी बसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डॉक्टर व मी शिवसेनेचा कम्पाऊंडर असे तर संजय राऊत सुचवत नसतील ना? ठाकरे केवळ खुर्चीत बसलेत, पण अधिकार माझ्यासारख्या कम्पाऊंडरचाच चालतो, हा तर त्यांच्या बोलण्याचा आशय नसेल ना? तसे असले तरी काही हरकत नाही. मात्र, यामुळे महाराष्ट्राची जी वाट लागली त्याचे काय? महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे मातेरे झाले त्याचे काय?


अवघ्या जगासह देश व राज्यावर कोरोनाचे भीषण संकट कोसळलेले असताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या फाटक्या तोंडाचा परिचय करुन दिला. राज्यात सारे काही आलबेल असल्याच्या थाटात मुलाखती देण्या-घेण्याचे खेळ सरकारमधील नेतृत्वाने चालवलेले असताना खासदार राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. कोणी, कधी आणि कोणाला मुलाखत द्यावी, हा अर्थातच त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण सार्वजनिक जीवनात वावरताना संबंधित व्यक्ती काय बोलते, बोलली हे त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित राहत नाही. मात्र, हे जाणीवपूर्वक विसरुन किंवा मी कसा सार्‍यांना उडवून लावतो, हे दाखवून देणार्‍या एखाद्या टपोरी गावगुंडासारखे वक्तव्य संजय राऊत यांनी या मुलाखतीत जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांबद्दल केले. जागतिक आरोग्य संघटना व डॉक्टरांबद्दलच्या एका प्रश्नावर उत्तर देताना, “डॉक्टर असले म्हणून काय झाले. मी कधी डॉक्टरकडून औषध घेत नाही. मला माहिती आहे. मी कम्पाऊंडरकडून औषधे घेतो. कम्पाऊंडरला जास्त माहिती असते,” असे विधान खासदार राऊत यांनी केले. हे जितके निषेधार्ह तितकेच लज्जास्पद. कारण महाराष्ट्राने अगदी इतिहासकाळापासून सातत्याने गुणवंतांची, बुद्धिमंतांची, ज्ञानवंतांची कदर केली, त्यांचा आदर-सन्मान केला. मात्र, वर्षानुवर्षे अभ्यास करुन रुग्णाचे प्राण वाचवण्याचे शिक्षण घेतलेल्या आणि ते प्रत्यक्षात आणणार्‍या डॉक्टरांची हेटाळणी, अपमान करण्याचे काम महाराष्ट्राचेच राज्यसभेत प्रतिनिधित्व करणार्‍या संजय राऊत यांनी करावे, ही दुर्दैवी गोष्ट. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून काय पात्रतेचे नेते आपल्या नशिबी आलेत, याची महाराष्ट्राच्या जनतेलाच शरम वाटेलसाही हा प्रसंग. मात्र, जनादेशाशी बेईमानी करुन सत्तेच्या खुर्च्या उबवणार्‍या शिवसेना किंवा संजय राऊत यांच्यासारख्यांना, त्याचे काही सोयर-सुतक नसेलच.



दरम्यान, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून मुंबई-महाराष्ट्राची रुग्णसंख्या व मृत्युदर देशात सर्वाधिक आहे. तथापि, राज्य सरकारने पुरेशा आरोग्य सुविधांची उभारणी केलेली नसली तरी आहे त्या साधनांनिशी रुग्णांची कोरोनातून मुक्तता व्हावी म्हणून सारेच डॉक्टर्स दिवस-रात्र शर्थीचे प्रयत्न करत असून त्यातल्याच दीड हजारांच्या आसपास डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. तसेच रुग्णसेवेचे कर्तव्य बजावताना राज्यातील शंभरावर डॉक्टरांना कोरोनामुळे प्राणासही मुकावे लागले. तरीही कित्येक डॉक्टर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात ये-जा करत असून आपण जगू-वाचू-मरु याची त्यांना कसलीही खात्री नाही. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्रीपद हाती असलेल्या पक्षाच्या प्रमुख नेत्याने डॉक्टरांना अंगावर पडलेली पाल झटकावी, तशा आवेशात लाथाडले. म्हणूनच ही गंभीर बाब ठरते आणि डॉक्टरांना कवडीची किंमत देणारे लोक सत्तेवर असल्यानेच कोरोनाकाळात राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे राऊत केवळ शिवसेना नेते नाहीत तर शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक आहेत आणि म्हणूनच ते जे बोलतात, ते शिवसेना पक्षप्रमुखानेच आणि आता मुख्यमंत्र्यांनीच बोलल्यासारखे होते. त्यामुळे आता एकतर संजय राऊत यांनी डॉक्टरांच्या अवमानाप्रकरणी माफी मागावी किंवा उद्धव ठाकरे यांनी तरी त्यांचा निषेध करावा. अन्यथा, वैद्यकीय ज्ञान नसलेल्या सर्वप्रकारच्या सरकारी मालकीच्या रुग्णालयांतून डॉक्टरांना तसेच कोरोनाविरोधातील डॉक्टरांच्या टास्क फोर्सला घरी हाकलून द्यावे. इतकेच नव्हे तर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये बंद करण्याचा क्रांतीकारी निर्णयही घेऊन टाकावा. कारण संजय राऊत यांच्या भाषेत, या मंडळींचा उपयोग तरी काय?



पुढचा मुद्दा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी संजय राऊत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असे दोन्ही काँग्रेसच्या दारात हेलपाटे मारत होते. दरम्यानच्याच काळात हृदयरोगामुळे त्यांच्यावर मुंबईतल्याच एका प्रसिद्ध रुग्णालयात अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. तथापि, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिनाभर विश्रांती घेण्याचे मानले जात असतानाही राऊत लगेचच दुसर्‍या दिवशी ‘सामना’त लेख लिहिण्यासाठी व तिसर्‍या दिवशी रुग्णालयातून सुट्टी घेऊन सरकारस्थापनेच्या जुळवाजुळवीला लागले. तेव्हा अनेकांपुढे हे कसे शक्य झाले, असा प्रश्न पडला. आता मात्र, राऊत यांनी आपण तेव्हा तात्काळ कसे नीट झालो, याचेच उत्तर दिल्याचे दिसते. त्यांनी डॉक्टरांकडून अ‍ॅन्जिओप्लास्टी आणि औषधोपचार घेण्यापेक्षा कम्पाऊंडरकडूनच हे सारे वैद्यकीय सोपस्कार पार पाडले आणि म्हणूनच ते लगेच ठणठणीत झाल्याचे समजते. म्हणूनच आता रुग्ण लवकर बरे होण्यासाठी संजय राऊत यांनी प्रत्येक रुग्णालयात कम्पाऊंडरना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी मिळावी आणि आरोग्यमंत्र्यांनी तसा आदेश द्यावा, अशी रोखठोक भूमिका घ्यावी. जेणेकरुन राऊत यांच्या मते काहीही न कळणार्‍या डॉक्टरांच्या तावडीतून राज्यातील जनतेची सुटका होईल. आणखी एक म्हणजे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेताना त्यांना पार जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागारपदी नेऊन बसवले होते. पण आता स्वतः मुलाखत देताना ते जागतिक आरोग्य संघटनेला काय कळते, असे म्हणालेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नादाला लागल्यानेच कोरोना वाढल्याचा दावाही त्यांनी केला. मग हे जागतिक आरोग्य संघटनेचे अधःपतन आणि कोरोनाची वाढ उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच झाले का?


उद्धव ठाकरे यांचा वैद्यकीय क्षेत्रात दांडगा अभ्यास असल्याचेही राऊत म्हणाले होते. म्हणजे त्यांच्या भाषेत मुख्यमंत्री डॉक्टरांच्या तोडीस तोड आहेत. पण संजय राऊत आता डॉक्टरांना काही कळत नाही व कम्पाऊंडरलाच जास्त समजत असल्याचेही म्हणतात. अर्थात मुख्यमंत्रीपदी बसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डॉक्टर व मी शिवसेनेचा कम्पाऊंडर असे तर राऊत सुचवत नसतील ना? ठाकरे केवळ खुर्चीत बसलेत, पण अधिकार माझ्यासारख्या कम्पाऊंडरचाच चालतो, हा तर त्यांच्या बोलण्याचा आशय नसेल ना? तसे असले तरी काही हरकत नाही. कारण स्वतः डॉक्टररुपी मुख्यमंत्र्यांनाही कम्पाऊंडरच्या हाती कारभार सोपवणे मान्यच असेल. मात्र, यामुळे महाराष्ट्राची जी वाट लागली त्याचे काय? महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे मातेरे झाले त्याचे काय? त्यावर या डॉक्टर-कम्पाऊंडरच्या जोडीने ठोस उपाय शोधावा, अन्यथा वेळ येताच निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारच्या कर्त्या-धर्त्यांना असा काही डोस देईल की, त्यांना पुन्हा राजकारणात उभेही राहता येणार नाही. तोपर्यंत चालू द्या टिवल्याबावल्या नि उडाणटप्पूपणा!
@@AUTHORINFO_V1@@