नवी दिल्ली : २०११ विश्वचषक स्पर्धेचा स्टार फलंदाज युवराज सिंग याने काही वर्षांपूर्वी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराजला आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा पंजाब संघासाठी खेळण्याची विनंती केली आहे. खेळाडू आणि मार्गदर्शक अशी भूमिका त्याने स्वीकारावी अशी इच्छा पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी युवराज केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. या मार्गदर्शनाचा फायदा भारताच्या युवा क्रिकेटपटूंना झाला होता. त्यामुळे आता युवराजने मैदानात परतावे आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे, अशी मागणी जोर धरायला लागली आहे. त्यामुळे युवराजने जर ठरवले तर त्याचे मैदानात आता पुनरागमन होऊ शकते. युवराजने शुभमन गिल, बरिंदर सरण, जीवनज्योत सिंग आणि तरुवर कोहली या युवा क्रिकेटपटूंना काही दिवसांपूर्वी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर पंजाबच्या क्रिकेट संघटनेतील पुनीत बाली यांनी युवराजने मैदानात परतण्याची विनंती केली आहे.