आठवणीतले अटलजी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |


Atal bihari Vajpayee_1&nb



आज देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने जनसंघ, राष्ट्र सेविका समितीच्या कार्यादरम्यान, काही सोहळ्यांप्रसंगी अटलजींशी सुशीला महाजन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या झालेल्या भेटीगाठी, कौटुंबिक संवाद याआधारे त्यांनी शब्दबद्ध केलेल्या अटलजींच्या काही आठवणी...



प्रथम म्हणजे माझी आणि अटलजींची पहिली भेट १९५३ मध्ये झाली. जनसंघांने केलेल्या काश्मीर सत्याग्रहामध्ये महाजन सहभागी होते. ते आग्रा जेलमधून सुटल्यावर आम्ही दोघं जण तेथून ग्वाल्हेरला माझ्या बहिणीकडे रेल्वेने गेलो. ग्वाल्हेर स्थानकावर उतरल्यावर आम्ही जात असताना प्लॅटफॉर्मवरती मागून कोणीतरी “महाजनजी, महाजनजी!” अशा हाका मारताना मी ऐकलं. मी मागे वळून पाहिले तर एक तरुण सामानाचे बोचके खाकेमध्ये घेऊन झपाझप पावलं टाकत आमच्याकडे येताना दिसला. मी मधुकररावांना म्हटलं, “कोणीतरी तुम्हाला हाका मारत आहे.” तोपर्यंत तो तरुण आमच्यापर्यंत येऊन थांबला होता. “अरे, अटलजी!” आणि मला त्यांनी ओळख करुन दिली, हे अटलजी वाजपेयी माझ्याबरोबर जेलमध्ये होते. त्यांना आम्ही म्हटलं, आमच्या बरोबर चला आम्ही तुम्हाला घरी सोडतो. त्यावर ते म्हणाले, “नाही! मी चालत जातो.” अशा तर्‍हेने भारताच्या भावी पंतप्रधानांशी माझी पहिली भेट झाली आणि मग पुढे वारंवार अशा तर्‍हेच्या भेटी होत राहिल्या.
 

कारण की, मधुकरराव महाजन जनसंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीत होते व मुंबईचे संघटनमंत्री असल्यामुळे बैठकीसाठी वारंवार अटलजी मुंबईला येत, त्यावेळी आम्ही मुंबईत भुलेश्वरला जय हिंद इमारतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सहा खोल्यांच्या सदनिकेत राहत होतो. तेथे संघाचे प्रचारक व जनसंघाचे कार्यकर्ते असे अनेक जण राहत असत. त्यामुळे जनसंघाच्या बैठकीही तिथेच होत. त्यामध्ये दीनदयाळजी, सुंदरसिंह भंडारी, जगन्नाथराव जोशी, प्रभाकरपंथ पटवर्धन यांसारखी मंडळी तेथे उतरत व त्यांच्या जेवणा-खाण्याची सर्व व्यवस्था माझ्याकडे होती. त्यावेळी अटलजींशी माझा जवळून परिचय झाला.
 
त्यावेळची आठवण म्हणजे माझी मुलगी विद्या देवधर लहान सात-आठ महिन्यांची होती. त्यामुळे माझ्या स्वयंपाकाच्या गडबडीत अटलजींनी अनेकदा तिला सांभाळले. त्यांच्या या महतीची मला खूप अपुर्वाई वाटायची. त्यांना एकदा खूप ताप भरला होता. सर्व मंडळी बैठकीला गेल्यावर हे एकटेच घरी होते. ते दुखण्याला खूप हळवे होते. अशा या दुखण्याला हळव्या असणार्‍या माणसाला शेवटी आठ-दहा वर्षे झोपून काढावी लागली याचे वाईट वाटते. अशा तर्‍हेने त्यांच्या वारंवार भेटी झाल्या. त्यानंतर जनसंघाच्या जबाबदारीतून मधुकरराव मुक्त झाले. तरीही त्यांचे आणि आमचे संबंध कायम होते. जनसंघाचे एक अधिवेशन १९६८-६९ मध्ये मुंबईला जनसंघाचा अधिवेशन झाले. त्यावेळेला हे अधिवेशनाला गेले होते. एक दिवस अटलजी यांना म्हणाले, “महाजनजी, विद्या तो अभी बडी हो गयी है। तो उसको लेके आओ मुझे देखना है।” आणि त्याप्रमाणे हे विद्याला घेऊन गेले. विद्याला बघून त्यांना खूप आनंद झाला. मला हे विद्याने सांगितल्यावर त्यांचा कौटुंबिक ओढा पाहून मी थक्क झाले. एवढ्या व्यापातून त्यांनी विद्याची आठवण काढली, हे विशेष.
 
महाजनांच्या नावाचा पुरस्कार ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी’ यांच्या सहकार्याने आम्ही दरवर्षी देतो. सुरुवातीला जवळ-जवळ दहा वर्षे जनसंघाचे सुरुवातीचे नेते उदा. नानाजी देशमुख, दत्तोपंत ठेंगडी वगैरे. त्याचप्रमाणे त्यांच्या तिसर्‍या वर्षाच्या पुरस्कार समारंभाला अटलजींना बोलावले होते. रामभाऊ म्हाळगीचे पदाधिकारी विनय सहस्त्रबुद्धे वगैरे मला म्हणत, “सुशीलाताई, बोलावण्याचे पहिले पत्र तुमचे दिल्लीला जाऊ दे. मग आम्ही पुढचे सर्व बघतो.”
 
अटलजींना जेव्हा मी पत्र लिहिले, तेव्हा ज्यांचे लगेच उत्तर आले की, “सुशीलाजी, आपने मुझे बुलाया हैं तो मै ना कैसे कहूं ।”
 
हे वाचून की अगदी थक्क झाले. त्यावेळच्या समारंभात विद्याच्या पुस्तकाचे स्त्रीलिखित कादंबरी ‘प्रेरणा व प्रवृत्ती’चे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यांनी पुस्तक वाचून काढले होते आणि त्याच्यावर ते बोलले आणि विद्याचं कौतुक केले. विशेष म्हणजे, ते पुस्तक मराठी भाषेमध्ये होते. विद्याधर गोखले यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे नाटक तसेच आम्ही समितीच्या एका कार्यक्रमाचा मदतीसाठी घेतले होते. नाटक सुरू होण्याच्या आधी अचानक अटलजी नाटकाला आले. आम्ही सगळ्याजणी आश्चर्यचकित झालो. ते म्हणाले, “मला मराठी समजते. कारण, मी ग्वाल्हेरचा आहे व मला संगीत नाटकाची आवड आहे म्हणून मी आलो.”
 
‘तेजतपस्विनी’ या राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय लक्ष्मीबाई तथा मावशी केळकर यांच्यावर लिहिलेल्या ‘दीपज्योती नमोऽस्तुते’ या चरित्र ग्रंथावरुन केलेल्या चित्रपटाच्या चित्रफितीचे प्रकाशन दिल्लीला झाले. त्यावेळी विद्या व मी आम्ही दिल्लीला गेलो होतो. अटलजी यांना त्यावेळेला भेटलो. पण, त्यांची तब्येत फारच खराब झाली होती. पण, त्याही परिस्थितीत त्यांनी विद्याला आपल्या जवळ बसवून तिच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या माणसाने अत्यंत आपुलकीने आमची दखल घेतली, हे विशेष.
 
माझी मुलगी सुषमा देवधर वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट) हिने लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या वेळेला निघालेल्या रथाची अंतर्गत सजावट केली होती. त्यानिमित्ताने तिचा १९९७च्या जून महिन्यात अटलजींच्या हस्ते सत्कार झाला. मंचावर उपस्थित असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी ‘यह कौन है!’असे विचारले असता, अटलजीं यांनी सांगितले, “अपने बम्बई के मधुकर महाजन की यह लडकी हैं। यह अपनी बेटी हैं।”
 
अटलजी मुंबईला जेव्हा जेव्हा येत असत, तेव्हा ते वेदप्रकाशजी गोयल यांच्याकडे उतरत आणि तेव्हा ते आवर्जून आम्हाला भेटायला बोलवत असत. त्यावेळेला मी सुषमाला घेऊन त्यांच्याकडे जात असे. तिची लहान मुलगी सलोनीही आमच्याबरोबर असे. लहान असल्यामुळे ती थोडी दूर दूर असे. तेव्हा ते सलोनीला प्रेमाने म्हणत, “आईए मेरे पास। मेरे गोद मे बैठो। मे तुम्हारा नाना हूं।”
 
इतकी आपुलकी आणि स्नेह, आमच्या कुटुंबाशी त्यांचा होता. त्यानंतर त्यांची शेवटची भेट. मधुकरराव महाजन गेल्यानंतर ते मला भेटायला दिल्लीहून मुद्दामहून मुंबईला आले. केवढा मोठेपणा त्यांचा! हा जिव्हाळा आणि ही भेट माझ्या कायम लक्षात राहील, असा हा राजकारण धुरंधर रसिक व कवी मनाचा माणूस आमच्या कौटुंबिक परिवारात इतक्या आपुलकेने मिसळला हे आमचे भाग्यच! अशा कर्तृत्वान माजी पंतप्रधानाला माझा शतश: नमस्कार!
 

- सुशीला महाजन

 
@@AUTHORINFO_V1@@