
सैनिक वन हे हुतात्मा जवानांची आठवण : पालकमंत्री
वसई : 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर' संचालित 'राष्ट्र सेवा समिती ग्राम भालिवली' प्रकल्पातील 'पर्यावरण विवेक समिती'च्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या सैनिकी वनाला कृषि मंत्री व पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी स्वातंत्र्य दिनी भेट दिली. मंत्री भुसेंच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी मुंबई महापालिकेचे नगरसेवक अरविंद भोसले, 'विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर'चे संचालक प्रदीप गुप्ता, व्यवस्थापक लुकेश बंड, पर्यावरण समितीचे कार्यवाह उमेश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यातील हुतात्मा जवानांना मानवंदना देण्यासाठी हे खास 'सैनिक वन' तयार करण्यात आले आहे. यावेळी मंत्री भुसे यांनी प्रकल्पाला भेट देताना येथे प्रशिक्षित झालेल्या महिलांच्या बांबू हस्तकलेतून निर्मित विविध उत्पादनांची पाहणी केली. या उत्पादनांचा दर्जा व आकर्षकपणा पाहून त्यांनी महिलांचे कौतुक केले तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त ही उत्पादने खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांच्या रोजगाराला हातभार लावावा, असे आवाहनही केले.
राष्ट्र सेवा समितीच्या ग्रामीण भागातील आदिवासी, कष्टकरी व मोलमजुरी करणारे नागरिक असलेल्या भागात सुरू असलेल्या सेवा कार्याचा गौरव केला. येथे निर्माण होत असलेले सैनिक वन हे हुतात्मा जवानांची आठवण ठेवणारे एक प्रेरणादायी कार्य आहे. त्याबद्धल व 'विवेक'च्या ग्रामीण भागातील सेवा कार्याबद्धल मला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रीया भुसे यांनी दिली.संस्थेचे संचालक प्रदीप गुप्ता यांनी रमेश पतंगे लिखित 'आपले मौलिक संविधान' व 'समरसतेचा वाटसरू' ही पुस्तके तसेच वनवासी महिलांनी बनविलेल्या बांबू चा वस्तू भेट स्वरुपात दिल्या. दादाजी भुसे ह्यांनी संस्थेच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.