सौरऊर्जा क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर’ उद्योजिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2020
Total Views |


Rucha Joshi_1  



आजचा स्वातंत्र्य दिन सर्वार्थाने खास आहे. कारण, यंदा देशातील नागरिक आणि उद्योजकांनीही ‘आत्मनिर्भर भारता’च्या ध्येयाकडे कूच केली आहे. त्यापैकीच एक उद्योजिका म्हणजे ‘रुबी सोलर वर्ल्ड’च्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचा जोशी. अनेक आव्हानांचा सामना करत, आज सौरऊर्जेसारख्या फारशा महिला कार्यरत नसलेल्या क्षेत्रात, त्यांनी आपल्या कामाने या क्षेत्राला अधिक प्रकाशमान केले आहे. तेव्हा, त्यांचा हा उद्योजकीय प्रवास आणि सौरऊर्जा क्षेत्राविषयी त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत...



‘रुबी सोलर वर्ल्ड’ची स्थापना दि. १ ऑगस्ट २०१८ साली औरंगाबाद येथे झाली. मी व जी. एच. कुलकर्णी या दोघांनी मिळून ‘रुबी सोलर वर्ल्ड (एलएलपी)’ची सुरुवात केली. सौरऊर्जा क्षेत्रात सुरुवातीपासूनच या कंपनीचे महत्त्वाचे योगदान आहे. पुनर्नवीकरणीय ऊर्जेमध्ये ३ कि.वॅट, ५ कि. वॅटपासून सुरुवात करून आता मोठ्या प्रकल्पांकडे या कंपनीची वाटचाल सुरु आहे. सौरऊर्जा क्षेत्रात होम लायटिंग सिस्टिमपासून सोलर वॉटर हिटर ते फोटोव्होल्टॅनिक इन्स्टॉलेशनपर्यंतची सर्व कामे, तसेच मेंटेनन्सची कामे केली जातात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घोडदौड करत यशाचे उंच शिखर गाठण्यासाठी कंपनी आणि कर्मचारी अग्रेसर आहेत. ‘रुबी सोलर वर्ल्ड’ ही कंपनी सुरुवातीपासूनच ‘क्वॉलिटी बेस’वर काम करते. ग्राहकांच्या गरजेनुसार चांगल्या सेवेसोबत त्यांच्या प्रत्येक शंकेचे निराकरण करून प्रत्येक वेळी सहकार्य करते. यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात या कंपनीने यश मिळवले आहे. सुरुवातीला या व्यवयाता अनेक अडचणी समोर आल्या. जसे टीम तयार करणे, ज्ञानात भर घालणे. तसेच आपल्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना एकत्र करून त्यांच्या सहकार्याने काम करणे, हे सगळे एकाचवेळी शक्य नव्हते.


घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे महत्त्वाचे होते ते आर्थिक समस्या कशा सोडवायच्या? आधीपासूनच कर्ज काढायचे नाही, कमी पैशात सुरुवात झाली तरी चालेल, या मतावर ठाम असल्याकारणाने पैशाची जमवाजमव हळूहळू करून मानसिकरित्या ताण न घेता एक-एक पाऊल आम्ही पुढे टाकले. कोणताही व्यवसाय उभा करताना अनंत अडचणी येणारच. पण, यामध्ये आपले कुटुंब, नातेवाईक किंवा मित्र यांचे सहकार्य मोलाचे ठरते. दुर्दैवाने मला कोणीही मदत केली नाही. दोन मुलींच्या शिक्षणासोबत स्वतःचे उर्वरित शिक्षण पूर्ण करत स्वबळावर कंपनी काढायचा निर्णय घेणे अवघड होते. पण, म्हणतात ना, महत्त्वाकांक्षा मोठी असेल तर अडचणी फार छोट्या वाटायला लागतात. जिद्द व परिश्रम करायची तयारी असेल तर काहीही अवघड नाही. उद्योगात आल्यानंतर बर्‍याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. उद्योग उभारणीपासून सेलिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग, फायनान्शिअल मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल यासारखे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे, ज्या कामातून आनंद मिळतो ते का करावे, हे शिकले. पैशासाठी काम न करता असे काम करा, ज्यातून आनंद व पैसा दोन्ही मनासारखा मिळेल.


नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा आपण जे काम हातात घेतले, ते वेळेवर पूर्ण करून त्यांना योग्य दर्जा व सेवा देणे मला योग्य वाटते. त्यामुळे आपल्याकडे ग्राहक आपोआपच येतात. एक सामाजिक बांधिलकी असल्याकारणाने बचत गटांमार्फत महिलांना प्रशिक्षण देणे, नवीन युवापिढीला सोलार उद्योगात येण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच नवनवीन उपक्रमात भाग घेऊन सौरऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, यासाठी आकाशवाणीसारख्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे असे अनेक उपक्रम ही कंपनी राबविते. शाळा-कॉलेजला भेटी देऊन इंजिनिअरिंग क्षेत्रातील मुलांना सौरऊर्जेबद्दलचे आकर्षण वाढवणे, तसेच त्यांना वर्कशॉप किंवा पर्सनल ट्रेनिंगसारखे योग्य प्रशिक्षण देण्यात ही ‘रुबी सोलर वर्ल्ड’चा खारीचा वाटा आहे. उद्योजकता विकास प्रशिक्षणासोबत प्रॅक्टिकल प्रोजेक्टवरही ही कंपनी काम करते. लहान होममेड सोलर लायटिंग सिस्टिम तसेच, सोलर स्ट्रीट लाईट, सोलार कुकर, सोलार कृषिपंप यावरदेखील काम करण्यास सुरुवात केली आहे. लघु उद्योगातून खेडोपाडी ग्रामीण मुलांना कौशल्य विकासाच्या सर्टिफाईड कोर्सेसना चालना देण्याचा नवीन उपक्रम सध्या ही ऑर्गनायझेशन राबवत आहे. यासाठी सौरऊर्जा क्षेत्रात काम करणारे नामवंत प्रोफेसर व तज्ज्ञ यांच्या सहकार्याने ऑनलाईन वेबिनारमार्फत डिजिटल कोर्सेस सुद्धा सुरु आहेत.


उद्योगाच्या नवीन संधी व कमी भांडवलात उद्योग उभारणी कशी करावी, याचे वेळोवेळी मार्गदर्शन करून ‘नोकरी देणारे हात’ कसे निर्माण होतील, यासाठी महत्त्वाची भूमिका ही कंपनी बजावत आहे. ग्रीन एनर्जी-रिन्युएबल एनर्जीमध्ये देशाची आर्थिक प्रगती कशी दडलेली आहे, हे समजावून समाजातील बेरोजगारी दूर कशी होईल व देश कसा संपन्न होईल, याकरिता कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे. विजेची बचत ही काळाची गरज आहे. ‘आत्मनिर्भर अभियानमध्ये प्रत्येकाने सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून आपले व पुढच्या पिढीचे संवर्धन करावे. एमआयटी कॉलेज असो किंवा देवगिरी कॉलेज, जेएनईएल कॉलेजला प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील मुलांना सौरऊर्जेबद्दल आत्मीयता निर्माण करणे व जास्तीत जास्त या क्षेत्रातील सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. ‘मोठे उद्योजक घडवण्यासाठी छोटी सुरुवात’ हेच ‘रुबी सोलर वर्ल्ड ऑर्गनायझेशन’चे वैशिष्ट्य आहे. अनुभव घेत पुढे जाणार्‍या या कंपनीला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे जावे लागले. प्रत्येक निर्णय हा एक सत्वपरीक्षाच होती. पण, त्यावेळी मागे खेचणारे अनेक जण आज आमची स्तुती करताना पाहून खरंच अभिमान वाटतो. महिला वर्ग या क्षेत्रात फार कमी आहे. महिला मोठ्या साईटवर काम करू शकत नाहीत किंवा टीमवर्क महिलांना जमत नाही, असे ठासून सांगणारे पुरुष आज महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.


एक महिला उद्योजक म्हणून नवनवीन ठिकाणी कामाचा अनुभव कधी चांगला, तर कधी वाईटही होता. पण, सौरऊर्जा क्षेत्रात ‘महिला उद्योजक’ असणे ही खरंच माझ्यासाठी खूप स्वाभिमानाची बाब आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करून आलेल्या प्रत्येक अडचणींना सामोरे जात आपली स्वतःची नवीन ओळख निर्माण करून आज अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात मी कार्यरत आहे. इच्छाशक्ती असेल तर ‘शिक्षण आणि पैसा’सुद्धा जमवता येतो, हेच यातून दिसते. मी ऋचा जोशी ‘रुबी सोलर वर्ल्ड ऑर्गनायझेशन’ची मॅनेजिंग डायरेक्टर CEO / Founder सर्वेसर्वा एवढंच सांगू इच्छिते की, नवीन पिढीने काळानुसार बदलून डिजिटल क्षेत्रात, अपारंपरिक ऊर्जेसारख्या ‘एव्हरग्रीन’ क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावा. कोरोना, ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत ‘रुबी सोलर वर्ल्ड ऑर्गनायझेशन’ने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात सहकार्य केले. ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करून नवनवीन टेक्नॉलॉजी अवगत करून मुलांना अखंड शिक्षण देत आहे व पुढेही ही वाटचाल अशीच राहील. या व्हिजनला पुढे नेण्यासाठी आजपासून आपण माझ्या ‘मिशन ग्रीन इंडिया’ या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःबरोबर समाजाचा व देशाचा विकास होईल, यावर भर द्यावा व एक ‘आत्मनिर्भर उज्ज्वल भारत’ घडवावा.

- ऋचा जोशी
 
 
@@AUTHORINFO_V1@@