आत्मनिर्भर भारत : अवश्यम्भावी संकल्पना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2020
Total Views |
3_1  H x W: 0 x



‘आत्मनिर्भरता’ या शब्दाचा आवाका विस्तृत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ घडवायचा असेल, तर सर्वात आधी आत्मबोध झाला पाहिजे. आत्मविस्मरणाचा दुर्धर रोग झालेल्या या राष्ट्राला जागृत करायचे असेल, तर आत्मगौरव जागृत करणारे वातावरण, व्यवस्था व सामाजिक मन तैयार करावे लागेल, आपण काय होतो, आपली ओळख काय होती, जगाची आपल्याकडे पाहायची दृष्टी कशी होते, याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.



जगभरात पसरलेल्या कोरोना संकटात भारताच्या पंतप्रधानांनी दि. १२ मे, २०२० रोजी संपूर्ण भारताला उद्देशून केलेल्या उद्बोधानात ‘आत्मनिर्भर भारत’ या शब्दाचा उल्लेख करून देशभरात एक अभूतपूर्व असे वातावरण उभे केले. सर्व स्तरांवर याची चर्चा सुरु झाली. त्यांच्या २० लाख कोटींच्या पॅकेजच्या घोषणेनंतर अर्थमंत्र्यांनी त्याचे वर्गवारीनुसार विस्तृत विवरण प्रस्तुत केले. अनेक सेमिनार्स, संवाद सत्रांतून हा विषय बऱ्यापैकी चर्चेत आला. त्याच्या विविध आयामांविषयी अनेक विद्वानांनी आपली मते मांडली. मनुस्मृतीतल्या श्लोकाचे अनायसे स्मरण झाले -



सर्वं परवशं दुःख, सर्व आत्मवशं सुखं।
एतद विद्यात समासेन लक्षणं सुखदुःखयो:।



अर्थात, पराधीनता हे दुःख आणि आत्मनिर्भरता हेच सुख आहे. हीच सुखदुःखाची लक्षणे होय. ‘सेल्फ रिलायन्स’ वा ‘सेल्फ डिपेन्डन्सी’ असे इंग्रजीमधील भाषांतर असले तरीही ‘आत्मनिर्भरता’ या शब्दाचा आवाका विस्तृत आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ घडवायचा असेल, तर सर्वात आधी आत्मबोध झाला पाहिजे. आत्मविस्मरणाचा दुर्धर रोग झालेल्या या राष्ट्राला जागृत करायचे असेल, तर आत्मगौरव जागृत करणारे वातावरण, व्यवस्था व सामाजिक मन तैयार करावे लागेल, आपण काय होतो, आपली ओळख काय होती, जगाची आपल्याकडे पाहायची दृष्टी कशी होते, याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.


आत्मबोध

भारताचा प्राचीन इतिहास तपासता लक्षात येते की, जीवनाच्या सर्वच क्षेत्रात भारताने प्रगतीचा उच्चांक गाठला होता. जगाच्या एकूण जीडीपीत भारताचे योगदान २३ ते २८ टक्के इतके होते याचे कारण म्हणजे येथील समाज हा उद्यमशील होता, कल्पक होता, परिश्रमी होता, पुरुषार्थी होता व परिणामी सुखी, समाधानी व वैभवसंपन्न होता. त्याकाळचा भारत हा सर्वार्थाने ‘आत्मनिर्भर’ होता. कारण, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात साहित्य, संगीत, कला, कृषी, उद्योग, विज्ञान, व्यापार, अन्यान्यशास्त्र इ. सर्व क्षेत्रांत भारत विश्वाचे नेतृत्व करत होता. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या उदात्त भावनेने व ‘वयं अमृतस्य पुत्राः’ या अजेय आत्मविश्वासाने आपल्या चारित्र्याच्या आधारावर भारताने अक्षरशः जगाच्या मनावर राज्य केले होते. आजच्या आधुनिक विज्ञानात ज्याला विशेष मान मिळत नाही, अशा आपल्या खगोलशास्त्राचा गहन अभ्यास करणारे, नक्षत्रांची संख्या निश्चित करणारे गर्गऋषी यांनीच भगवान कृष्णाची, अर्जुनाची जन्मकुंडली केली होती. वराहमिहिराची बृहत्संहिता ही गर्ग संहितेवरच आधारित आहे. हे अगदी पांडव-कौरवांच्या काळातील सत्य आहे. त्याचा संबंध थेट बृहस्पती व त्यानंतर लाभलेल्या समृद्ध पराशर, कश्यप व मय ऋषींपर्यंतच्या परंपरेत आढळतो. ज्या अश्वांसंबंधी आपण सर्वसामान्यपणे अगदी दुर्लक्ष करतो त्या अश्वांचे आयुर्मान वाढवणे, अश्वांना शिक्षण देणे, किती ओझे ते वाहू शकतील ते ठरवणे, तबेल्यांची व्यवस्था कशी ठेवायची व रथांना जोडताना त्यांना कसे जोडायचे, याचे विस्तृत वर्णन हय आयुर्वेदात असलेल्या १२ हजार ऋचांमध्ये आढळते. शालिहोत्र संहितेत याचे वर्णन सुश्रुतने केले आहे. सुश्रुत हा शालीहोत्रांचा शिष्य होता. गेल्या दीडशे वर्षांत जी संशोधनं अश्वशास्त्रात झाली आहेत, त्यांचे मूळ या ग्रंथात आहे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात मूळ नाव औलुक्य आणि कश्यप असलेल्या, ‘अणू’ कल्पनेचा जनक, आद्यसंशोधक, प्रस्थापक असे कणाद ऋषी आठवत असतीलच. विश्वातील नानाविध वस्तू विशेषांची वा अस्तित्व दर्शवणाऱ्या घटकांची वर्गवारी करणारे, परमाणु कल्पना, विविध जातीचे परमाणू आणि त्यांचे संयोग याबाबत संशोधन करणाऱ्या कणाद ऋषींची दखल आधुनिक वैज्ञानिकांनी घेऊन त्यांना अणू सिद्धांताचे आद्यजनक मानले आहे. कृषीची चर्चा झाली व खन ऋषींची चर्चाच झाली नाही असे होणे निव्वळ अशक्य. आजच्या शिक्षणाने कदाचित त्यांना स्मरणात ठेवले नसावे. पण, कोणते पीक कोणत्या महिन्यात पेरावे, कोणत्या महिन्यात पाऊस नको, तसेच कोणत्या महिन्यात पाऊस उपकारक वा अपायकारक, याचा सखोल अभ्यास करून नेमके निदान सांगितले आहे. या ऋषीने प्रत्येक महिन्याचे वर्णन त्या महिन्यातल्या पावसाने करून, कोणता पाऊस धान्य समृद्धी आणेल वा बैल विकण्याची पाळी आणेल याचे अचूक वर्णन केले आहे. असेच विलक्षण कर्तृत्व होते जीवक कुमारभक्क यांचे. तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या या तज्ज्ञाने चक्क शल्यक्रियेत इतके प्रावीण्य मिळविले होते की त्यावेळचे राजा बिम्बिसार, अवंतिराजा व खुद्द भगवान बुद्धांना पोटाच्या रोगातून शल्यक्रियेद्वारे मुक्त केले होते. बुद्धांच्या शरणी जाऊन त्यांचे अनुयायीपद स्वीकारणाऱ्या जीवकाला बिम्बिसारानंतर अजातशत्रूचा राजवैद्य म्हणून काम दिले गेले होते. आजच्या पायथागोरस प्रमेयाबद्दल बोलणारे बौधायनाला कसे विसरतात, याचे आश्चर्य वाटते. त्याकाळी बौधायनाने शुल्ब सूत्राचे लेखन केले होते. भूमितीतील रचना, कूटप्रश्न, चौकोनाचे, काटकोन समभुज चौकोनाचे तसेच अनेक भूमितीय सिद्धांत मांडणाऱ्या बौधायनाला त्याकाळी भूमितीतज्ज्ञ म्हणून गौरविण्यात आले होते. सुश्रुतांचे सिद्धांत, संशोधन आज ही शल्यक्रियेच्या अभ्यासकांना मार्गदर्शन करणारे आहे. आजची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेली शस्त्रे नसतानाही त्याकाळी सुश्रुताने कृत्रिम नाक देणे, मोतीबिंदू काढणे, कृत्रिम पाय, हात इ. अवयव देणे, आतड्यावरील शल्यकर्म करून मुंगळ्याच्या नांग्यांनी त्यावर शिवणकाम करणे अशी अनेक शल्यक्रियेतील दुर्मीळ ज्ञान जगासमोर ठेवले होते. ख्रिस्तपूर्व १७५ वर्षे ज्यांचा जन्मकाळ मानला जातो ते चरक ऋषी शेषावतार मानले जातात. पतंजली व चरक एक मानले जातात, हे केवळ शेषावतार म्हणून. जीवबीज विकासाच्या शास्त्राचा अभ्यास करून, वात-पित्त-कफ या कल्पनेवर आधारित आयुर्वेदाचा विकास, अस्थिपंजराचा अभ्यास, रोगकारण तसेच रोगनिदान यांचा अभ्यास, औषधे संग्रह करण्याची पद्धती, आरोग्यविषयक आणि वैद्यकविषयक न्याय व वैशिषिक तत्त्वज्ञानाची प्रस्थापना करणारे चरक आपल्या असीमित ज्ञानाची ओळख जगाला देऊन गेले. खगोल विज्ञानाची स्वतःची अशी पद्धती शोधून काढणारे, पृथ्वी गोल आहे आणि ती आपल्या अक्षाभोवती फिरते आहे, असे वैज्ञानिक विधान करणारे आर्यभट्ट जगप्रसिद्ध आहेतच. भूमितीत अनेक प्रमेयांचा शोध लावणारे, ‘पाय’ या स्थिरकाचे मूल्य चौथ्या दशांशापर्यंत अचूक ठरविणारे, सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन बद्दलचे संशोधन करणाऱ्या आपल्या या ऋषीला अरबी भाषेतील सर्वोच्च स्थान मिळून आर्यभर हे नाव मिळाले होते. ग्रीक शास्त्रज्ञ डायोफेन्त याच्यापेक्षा आर्यभट्ट जास्त प्रगत होता हे सर्वमान्य झाले होते. ख्रिस्ताब्द ४९९ साली आदित्य ब्राह्मणाचा पुत्र म्हणून जन्माला आलेले वराहमिहिर खगोलशास्त्र, ग्रह्ज्योतिष विज्ञान , कालमापनासाठी वापरली जाणारी छायापद्धती आणि केप्सीड्रा जलयंत्र यांच्यातील तुलना गणितीपद्धतीने करणारे व कृषिशास्त्रावर विपुल लेखन करणारे जगाला माहीत झाले होते. विश्वाला ‘शून्य’ची भेट देणारे ब्रह्मगुप्त ऋषी असोत वा कक्षापुततंत्र, आरोग्य मंजिरी, योगसार, योगशतक इ. ग्रंथांची रचना करुन पाऱ्याला पकडण्याची किमया करून दाखवणारा रसायन शास्त्रज्ञ सिद्ध नागार्जुन ऋषी असो तसेच खगोलशास्त्राच्या आधारे बीजगणिताचे सिद्धांत मांडणारा गणिती भास्कराचार्य असो. सर्वांनी हे सिद्ध केले होते की, विज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही स्वावलंबी होतो म्हणून उन्नत होतो. वेदव्यास, तुळशीदास, कालिदासांसारखे अनेकानेक असंख्य जगप्रसिद्ध साहित्यिक आपल्या देशात होऊन गेलेत. सर्व जग विविध क्षेत्रात जीवनाच्या विकासाकरिता भारताच्या त्याकाळच्या समृद्ध जीवन पद्धती अर्थातच ‘आत्मनिर्भर’ पद्धतीचे अनुकरण करण्यास सरसावत.


आत्मवंचना

सुमारे चारशेहून अधिक वर्षे मुघलांचे राज्य व जवळपास दोनशे वर्षे ब्रिटिश साम्राज्याच्या भारतावरच्या अधिपात्यामुळे येथील समाज आपली संस्कृती वाचविण्याच्या प्रयत्नात दुबळा होत गेला. अनेक असांस्कृतिक बदल आपल्या समाजात आले. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध अर्थात सुमारे ५० वर्षे ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याकरिता लढा देण्यात देश झटत होता. देश पराधीनतेतून मुक्त झाला की सर्व समस्या दूर होतील व भारत पुन्हा प्रगतिपथावर परतेल, अशी स्वाभाविक अपेक्षा देशवासीयांच्या होत्या. परंतु, स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढील ५० वर्षे भारताच्या तत्कालीन राजकीय नेतृत्वाने स्वार्थापोटी तसेच सत्तेचा माज ठेवून कष्टाने मिळवलेल्या संधीचे देशाच्या प्रगतीत रुपांतर केले नाही व ते सपशेल अपयशी ठरले. लेखाच्या सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जगाच्या जीडीपीत २८ टक्क्यांपर्यंत योगदान करणारा आपला त्याकाळचा भारत देश १९९८च्या सालापर्यंत १ टक्केसुद्धा योगदान नसलेला देश झाला. जणूकाही आत्मविश्वासहीन समाज झाला. शिक्षणात भारतीय मूल्यांची अवहेलना, चुकीचे आर्थिक धोरण, कचखाऊ वृत्ती, भ्रष्टाचार, तुष्टीकरणातून जन्मलेला सेक्युलर वाद, असांस्कृतिक पश्चिमीकरणाचे अंधानुकरण यामुळे देश अवगती करू लागला. २००४ ते २०१३ पर्यंत देशात जणू सरकार नावाचे काही नसून निव्वळ भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे की काय असा भास व्हायला लागला होता.


‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल

१९९१ साली ‘स्वदेशी जागरण मंचा’च्या स्थापनेनंतर श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी अनेक चिंतनपर भाषणांतून अत्यंत सारगर्भित मार्गदर्शन केले होते व ‘राष्ट्र का औद्योगीकरण, उद्योगो का श्रमिकीकरण व श्रमिको का राष्ट्रीयकरण’ हा विचार मांडला होता. २०१४ ला सत्तांतरण झाले व देशाचा, समाजाचा व ओघाने जनतेच्या सर्वांगिण विकासाचा विचार करणारे सरकार आले. २०१३ साली आपल्या देशात मोबाईल फोन बनविणाऱ्या फक्त चार कंपन्या होत्या त्या वाढून २०१९ पर्यंत १००च्या वर स्थापन झाल्या. रस्ते, बंधारे, विद्युत, जल इ. क्षेत्रांत रचनात्मक व धोरणात्मक बदल करून आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात झाली. ‘आत्मनिर्भर भारत’ या शब्दाचा उच्चार जरी मे, २०२० मध्ये झाला असला तरीही सरकारने त्या दिशेने पाऊल उचलायला पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली होती. कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर लादणाऱ्या चीनचा बहिष्कार विश्वातील अनेक देशांनी सुरु केला होता. भारताने या संकटाला संधीच्या रुपात रुपांतरित केले. जनजीवन ठप्प झाले असले तरीही सरकार स्वस्थ बसले नाही व सतत आवश्यक बदल करून ती आपल्या सर्वांच्या स्वप्नातला ‘आत्मनिर्भर भारत’ आत्मसन्मानाने ताठ मान करून उभा राहणारा भारत घडविण्याच्या प्रयत्नात आहे. तब्बल ६.३३ कोटींच्या ‘एमएसएमई’ क्षेत्राला संजीवन देण्याकरिता केलेली विविध साहाय्य योजना, कृषी क्षेत्राला दिलेली विशेष सवलत व साहाय्य मोठ्या व अतिमोठ्या उद्योगांना केलेली आवाहने, शिक्षण धोरणातील आमूलाग्र बदल, राम मंदिर, ३७० कलम, सीएए, तिहेरी तलाक यांसारखे अनेक जिव्हाळ्याचे विषय मार्गी लागले. ‘हर हाथ को मिलेगा काम, काम का देंगे पुरा दाम’ हे धोरण पत्करून दत्तोपंतांनी उल्लेखलेल्या ‘देश के लिये करेंगे काम’ या श्रद्धेने उद्योगांचे पुनरुज्जीवन सुरु झाले आहे. कोरोना संकटाच्या रूपाने गतिरोधक असला तरीही अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत स्वयंरोजगार करणारे नागरिक, २५ ते ३० टक्के ट्रेडिंग करणारे व्यापारी व १० ते १५ टक्के मध्यम व मोठ्या उद्योगांमध्ये नोकरी करणारे आता ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने विचार करीत आहे. ५५० अब्ज डॉलर्सची आयात करणारा व ३२५ अब्ज डॉलर्सची निर्यात करून २२५ अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट असणारा आपला देश हे सर्व गणित उलटून टाकायला तयार आहे. पूर्ण ‘यु टर्न’ घेणार आहे. आपला देश जगातील एकमेव सर्वात तरुण देश आहे. अर्थात येथील लोकसंख्येचे ६५ टक्क्यांहून नागरिक हे ३५ वर्षांहून कमी वयाचे आहेत. जगभरात बहुतेक सर्व मोठ्या कंपनींचे सीईओ हे भारतीय आहेत. जगाने चीननंतर भारताला स्वतःचा बाजार करायचा जणू निर्धार केला आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत झालेले अनेक बदल अनेक मल्टिनॅशनल्सला भारताकडे आकर्षित करत आहेत. चीनची विश्व व्यापारातली मक्तेदारी मोडीत काढत भारत उद्योगक्षेत्रात मुसंडी मारायला तयार आहे. भारताचा तरुण कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार आहे. भारताच्या महिलांनीही मनावर घेतले आहे म्हणून स्वदेशीचा मंत्र चहुबाजूला गुंजत आहे. एक स्वर्णिम भविष्य भारताची वाट पाहत आहे व स्वामी विवेकानंदांनी उच्चारलेल्या त्या प्रसिद्ध कथनाला साकार करण्याचे प्रयत्न करीत आहे - “एक जीवन स्वप्न माझ्या डोळ्यांसमोर मी स्पष्ट पाहत आहे की, आपली प्राचीन भारतमाता पुन्हा जागृत झाली आहे व कोणत्याही काळापेक्षा अधिक भव्य स्वरूपात ती आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे.”



- प्रशांत देशपांडे
(लेखक स्वदेशी जागरण मंच, मुंबई महानगर संपर्क प्रमुख आहेत.)


@@AUTHORINFO_V1@@