माजी सैनिक झाला सामाजिक उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2020   
Total Views |


Mahesh Narwade_1 &nb



हुतात्मा झाल्यावर आपण मेणबत्त्या पेटवतो. हुतात्मा जवानांप्रति हळहळतो. मात्र, पुढे काय? खरी गरज आहे ती महेश नरवडे यांसारख्या निवृत्त जवानांच्या पाठीशी उभी राहण्याची. ते एक उद्योजकच नव्हे, तर सामाजिक उद्योजक म्हणून देशासाठी, पुढच्या पिढीसाठी काहीतरी करु इच्छित आहेत. त्यांना आपण सोबत दिली पाहिजे.


आज आपण प्रत्येक भारतीय सुरक्षित आहोत ते निव्वळ आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या सैनिकांमुळे. कल्पनासुद्धा करवणार नाही, असे खडतर लष्करी प्रशिक्षण, गोठवणारी थंडी असो वा सोलवटून काढणारी उष्णता कोणत्याही परिस्थितीशी ते दोन हात करतात. नाना पाटेकर यांनी ‘प्रहार’ सिनेमामध्ये हे सर्व ठळकपणे चित्रित केले होते. त्यासाठी नानांनी स्वत: खडतर असं लष्करी प्रशिक्षण घेतलं होतं. नानाचा तो ‘प्रहार’ चित्रपट ‘त्या’ कोवळ्या वयाच्या मुलाने पाहिला. नाना त्याच्या आयुष्याचा आदर्शच बनला. आपणसुद्धा लष्करात जायचं असं मनोमन ठरवून तो लष्करात भरती झाला. १६ वर्षे आणि २२ दिवसांच्या सेवेनंतर तो निवृत्तदेखील झाला. निवृत्तीनंतर त्याने आपल्या लष्करी प्रशिक्षणाचा लाभ कॉर्पोरेट जगताला देण्यासाठी ‘जय हिंद अ‍ॅकॅडमी’ सुरु केली.
 

खरी गोष्ट इथेच सुरु होते, जी नानांच्या ‘प्रहार’मध्ये संपलेली दाखवली आहे. हा माजी जवान शाळकरी मुलांना लष्करी प्रशिक्षणाची तोंडओळख देऊ लागला. कॉर्पोरेटसोबत शाळा हे त्याचं कार्यक्षेत्र बनलं. भारतीय लष्कराचा माजी जवान ते सामाजिक उद्योजक व्हाया मालिकेचा साहाय्यक लेखक. हा प्रवास आहे ‘जय हिंद अ‍ॅकॅडमी’चे संचालक माजी जवान महेश नरवडे यांचा.
 
महेश यांचं मूळ गाव वडगाव-कांदळी. शिवनेरीच्या पायथ्याशी. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत याच शिवनेरीवर जन्मलेलं. त्या मातीचा गंध रक्तात असलेलं नरवडे कुटुंब. शिवाजी नरवडे आणि मंगला नरवडे हे दाम्पत्य गोवंडी परिसरात राहायचे. शिवाजी नरवडे एका एलिव्हेटर कंपनीत इलेक्ट्रिशयन सुपरवायझर म्हणून नोकरी करायचे. मंगला या घर सांभाळायच्या. या दाम्पत्यांना एकूण तीन मुले. राजेंद्र, ऋषिकेश आणि महेश. महेशचं बालपण गोवंडीतच गेलं. देवनारच्या कुमुद विद्यामंदिरात शिशुवर्ग ते दहावीपर्यंत तो शिकला. याच वयात नाना पाटेकर यांचा ‘प्रहार’, क्रांतिवीर, तिरंगा पाहून त्याचं रक्त सळसळू लागलं. नाना पाटेकर त्या लहानग्याचा आदर्श बनले. नानांसारखंच आपण लष्करात जायचं आणि देशाची सेवा करायची हे त्याने मनोमन पक्कं केलं. लष्करात जाण्याची पहिली पायरी म्हणजे एनसीसी. या एनसीसीचं प्रशिक्षण चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात मिळतं म्हणून महेशने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
 
मात्र, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. अलिबाग येथे झालेल्या लष्करी भरतीमध्ये महेशने भाग घेतला आणि निवडला गेलादेखील. ११ महिने त्यांचं लष्करी प्रशिक्षण सुरु होतं. ३० नोव्हेंबर २००२ मध्ये कसम परेड झाली आणि महेश हा लष्करी जवान झाला. त्याची पहिली पोस्टिंग जयपूरमध्ये झाली. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, काश्मीर, आसाम येथे त्याने लष्कराची सेवा केली. राष्ट्रीय रायफलसह पाच विविध युनिट्समध्ये महेश नरवडेंनी सेवा बजावली. राष्ट्रीय रायफलमध्ये ते ‘घातक प्लॅटून’मध्ये होते. पेट्रोलिंग, रोड ओपनिंग, गाड्यांचा ताफा तपासणे, ऑफिसर गार्ड अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. काश्मीरमध्ये असताना जवानांच्या एका पथकावर अतिरेक्यांनी हल्ला चढवला होता. त्या पथकाच्या मदतीस गेलेल्या २० जणांच्या ‘घातक प्लॅटून’मध्ये महेश नरवडेंचा समावेश होता. या ‘घातक प्लॅटून’ने दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. महेश नरवडेंना त्यांच्या उत्तम लष्कर सेवेसाठी सैन्यसेवा पदक आणि ‘९ ईअर सर्व्हिस मेडल’ने सन्मानित करण्यात आले.
 
सैन्यात असतानाच महेश यांनी फायरफायटिंग आणि प्रथमोपचार हे दोन अभ्यासक्रम शिकून घेतले. लष्कर जवान ते एसीपी हवालदार अशी देशाची अन् सैन्याची सेवा करुन ३१ जानेवारी २०१८ रोजी महेश निवृत्त झाला. निवृत्तीनंतर महेश यांना थेट साहाय्यक लेखकाची ऑफर आली. ‘लागीरं झालं जी’ या प्रसिद्ध मराठी मालिकेत लष्करी प्रशिक्षणाचा भाग होता. त्याचं लेखन करण्याची संधी महेश यांना मिळाली. सोबत लष्कर अधिकार्‍याची भूमिकासुद्धा मिळाली. या मालिकेच्या अनुभवानंतर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि अजय पूरकर अभिनित ‘ऑपरेशन जटायू’ या नाटकासाठी लष्करी हत्यारे कशी हाताळावीत आणि हाताळू नये, याचं प्रशिक्षण देण्यासाठी महेश यांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान महेशने सर्वसामान्यांना विशेषत: कॉर्पोरेट जगात कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना फायर फायटिंग, प्रथमोपचार, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे मिळावे, यासाठी ‘जय हिंद अ‍ॅकॅडमी’ची स्थापना केली. आदित्य बिर्ला समूह, एटीओस, मदरसन या कॉर्पोरेट कंपन्यामध्ये महेश यांनी महिला कर्मचार्‍यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. ‘हेन्केल’मध्ये ‘लाईफ सेफ्टी’चे धडे दिले.
 
याचदरम्यान महेश यांनी युसुफ मेहेरली शाळेच्या विद्यार्थ्यांना रायफल शूटिंगचे धडे दिले. त्यानंतर ‘सोशल अ‍ॅक्टिव्हिटिज इंटिग्रेशन’ अर्थात ‘साई’ या संस्थेतील मुलांनादेखील रायफल शूटिंगचे धडे दिले. ही मुलं चांगली हुशार होती. आपण भारताच्या सीमा पाहिल्या, बर्फ पाहिला. वाळवंट पाहिलं. मात्र, आपल्या देशात अशी पण मुलं असतील, ही कल्पनाच करवत नाही. या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ही महेश यांची भावना झाली. त्याचवेळी एका शाळेत महेश यांनी मुलांना अग्निशमन दलाचा नंबर विचारला. एका मुलाने ‘९११’ हा अमेरिकन अग्निशमन दलाचा नंबर सांगितला. त्याच्यासोबत इतर मुलांना ‘१०१’ हा नंबर माहीत नव्हता. हे महेशासाठी भयंकर वेदनादायी होतं. आपण आपल्या भावी पिढीला वेळीच सावरणं महत्त्वाचं आहे. त्यांना सिव्हिक सेन्स, फायर फायटिंग, प्रथमोपचार, स्वसंरक्षण आदी मूलभूत गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. या जाणिवेतून त्याने निरनिराळ्या शाळेतून शिबिराचं आयोजन करण्यास सुरुवात केली. ‘उद्याच्या भारताचा उज्ज्वल नागरिक’ ही चळवळ त्याने सुरु केली. कोरोनापूर्व गेल्या दोन वर्षांत त्यांनी दहाहून अधिक शाळेच्या मुलांना अशा स्वरुपाचे प्रशिक्षण दिले आहे, तर ‘जय हिंद अ‍ॅकॅडमी’च्या माध्यमातून लष्करी प्रशिक्षण, साहसी प्रशिक्षण, सुरक्षितता आदी सेवा पुरविल्या जातात. कॉर्पोरेट्स, लघु-मध्यम क्षेत्रातील कंपन्यांना त्यांनी सेवा दिलेल्या आहेत. अनेक कंपन्या आणि उद्योजकीय संस्था यांच्यासाठी साहसी प्रशिक्षण शिबिराचं त्यांनी आयोजन केलेले आहे.
 
पतियाळा येथे सैन्यदलात कार्यरत असतानाची गोष्ट. तिथल्या दवाखान्यात प्रिती नावाची मुलगी सातव्या महिन्यातच जन्माला आली. मुदतीपूर्व प्रसुत झाल्याने तिच्या शरीरात रक्ताची कमतरता होती. आधीच तिला काचपेटीत ठेवण्यात आले होते. त्यात तिचा रक्तगट ‘बी निगेटिव्ह’ हा तर खूपच दुर्मीळ. मात्र, कोणीतरी तिच्या पालकांना सुचवले की रस्त्याच्या पलीकडे असणार्‍या लष्करी छावणीत आपण चौकशी करुया. सुदैवाने महेश यांचा रक्तगटदेखील ‘बी निगेटिव्ह’ आहे. त्या लष्करी अधिकार्‍याने तातडीने महेश यांना रक्तदानाची सूचना केली. महेशच्या रक्तदानाने त्या चिमुकलीचा जीव वाचला. महेश यांनी आतापर्यंत ५७ वेळा रक्तदान केले आहे. ठाण्याच्या रक्तानंद ग्रुपने ‘रक्तकर्ण’ या पुरस्काराने महेश यांना सन्मानित केले. राज्य रक्त संक्रमण परिषदेने त्यास ग्रीन कार्ड प्रदान केले आहे.
 
महेश नरवडे हे रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेतात. एखाद्या व्यक्तीने जागा उपलब्ध करुन दिल्यास मुलांना रायफल शूटिंगचे प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. ‘रायफल शूटिंग हे उत्तम करिअर होऊ शकते. या खेळामध्ये भारताने अगदी ऑलिम्पिकमध्ये अनेक पदके मिळवलेली आहेत. ‘मुलांनी पब्जी न खेळता रायफल शूटिंगमध्ये करिअर घडवावे,’ असं नरवड यांचं मत आहे. त्यांनी अगदी चार वर्षाच्या मुलीपासून ते ७६ वर्षे वयाच्या आजीलादेखील रायफल शूटिंगचे धडे दिलेले आहेत.
 
हुतात्मा झाल्यावर आपण मेणबत्त्या पेटवतो. हुतात्मा जवानांप्रति हळहळतो. मात्र, पुढे काय? खरी गरज आहे ती महेश नरवडे यांसारख्या निवृत्त जवानांच्या पाठीशी उभी राहण्याची. ते एक उद्योजकच नव्हे, तर सामाजिक उद्योजक म्हणून देशासाठी, पुढच्या पिढीसाठी काहीतरी करु इच्छित आहेत. त्यांना आपण सोबत दिली पाहिजे. त्यांनी ऐन उमेदीची वर्षे आपल्यासाठी देशाला दिली. आता त्यांना आपण उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे. निवृत्त जवान व सामाजिक उद्योजक महेश नरवडे आपणांस सलाम.
 
 

@@AUTHORINFO_V1@@