सर्व माणसे एकसारखीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |


aacharya_1  H x

 


या पृथ्वीतलावर सर्वजण एकसारखेच आहेत. परमेश्वराने सर्वांना एकसमान बनवून पृथ्वीवर पाठवले आहे. ना कोणी हिंदू, ना कोणी मुस्लीम, ना कोणी देशी, ना विदेशी, ना गरीब, ना श्रीमंत, ना काळा, ना गोरा, ना अस्पृश्य, ना स्पृश्य! आपण एकाच आईबापाची लेकरे! सर्वांना मिळून प्रगती साधावयाची आहे. आध्यात्मिक व भौतिक अशा दोन्ही स्तरांवरील ऐश्वर्य मिळविण्याकरिता प्रयत्न करावयाचा आहे.

 


अज्येष्ठासो अकनिष्ठास एते
सं भ्रातरो वावृधु: सौभगाय ।
युवा पिता स्वपा रुद्र एषां
सुदुघा पृश्नि: सुदिना मरुद्भ्य:॥ (ऋग्वेद ५/६०/५).

 
अन्वयार्थ

 


या जगात (अज्येष्ठास:) कोणीही मोठा नाही आणि (अकनिष्ठास:) कोणीही छोटा, लहान नाही. (एते) असे हे आपण सर्वजण (भ्रातर:) एक-दुसर्‍यांचे भाऊ-भाऊ आहोत. आपण बंधुभावाने मिळून (सौभगाय) उत्तम ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी (सं वावृधु:)चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूय, ऐश्वर्य वाढवूया! कारण, (एषाम्) आपणा या सर्वांचा (पिता) पालक, पिता हा एकच असून तो (युवा) सदैव चिरतरुण युवा आहे. तसेच तो (स्वपा) सुख व कल्याण प्रदान करणारा आणि (रुद्र) आमच्या शत्रूंना रडविणारा, दंड देणारा परमेश्वर आहे. त्याचबरोबर (मरुद्भ्य:) सर्व मनुष्यासाठी (सुदिना) सुख देणारी, चांगले दिवस आणणारी (सुदुघा) उत्तम प्रकारचे मधुर दूध प्रदान करणारी आई (प्रश्नि:) प्रकृती म्हणजेच सृष्टी आहे.

विवेचन

 


वेदांचे तत्त्वज्ञान प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. मग ते भूतकालीन असो वर्तमानकालीन असो की भविष्यासाठी असो! आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक विषयांना अनुसरून वेदांची पवित्र वाणी नेहमीच बहुमूल्य असे मार्गदर्शन करणारी व दिव्योत्तम पावन ज्ञानगंगा प्रवाहित करणारी आहे. मानवी जीवनाच्या सार्वकालिक व सार्वभौमिक प्रश्नांचे शाश्वत समाधान वेदमंत्रांद्वारेच होऊ शकते, ही गोष्ट अनेक तत्त्वचिंतकांनी नमूद केली आहे.

वरील मंत्रात जागतिक पातळीवर सामाजिक समरसता निर्माण व्हावी, यासाठी अत्यंत मार्मिक उपदेश करण्यात आला आहे. त्यातील आशय वैश्विक स्तरावर आम्हा सर्वांना बंधुत्वाच्या पवित्र नाते संबंधात जोडतो. तसेच जर आम्ही एक दुसर्‍यांचे भाऊ आहोत, तर मग आमचे आई-वडीलदेखील एकच असणार! ईश्वर हा आम्हा सर्वांचा पिता, तर प्रकृती ही आम्हा सर्वांची माता म्हणजेच आई आहे. आम्ही तिची सर्व लेकरे आहोत, असे असताना मग वेगळेपण कशासाठी? या जगातील समस्त भेदभाव कोणत्या कामाच्या? इथे कोणीही मोठा नाही की छोटा नाही. सर्वजण एकसमान आहोत. एका हिंदीच्या कवीने आपल्या भजनातून जे म्हटले आहे, ते सत्यच आहे –

 


एक पिता के बच्चे हैं हम,
एक हमारी माता है
दाना पानी देनेवाली वही हमारी माता है,
फिर ना जाने किस मूरख ने लड़ना हमें सिखाया?
सबसे कर लो प्यार जगत् में कोई नहीं पराया रे,
तुझमें ओम्, मुझमें ओम्, सब में समाया....॥

 


या पृथ्वीतलावर सर्वजण एकसारखेच आहेत. परमेश्वराने सर्वांना एकसमान बनवून पृथ्वीवर पाठवले आहे. ना कोणी हिंदू, ना कोणी मुस्लीम, ना कोणी देशी, ना विदेशी, ना गरीब, ना श्रीमंत, ना काळा, ना गोरा, ना अस्पृश्य, ना स्पृश्य! आपण एकाच आईबापाची लेकरे! सर्वांना मिळूून प्रगती साधावयाची आहे. आध्यात्मिक व भौतिक अशा दोन्ही स्तरांवरील ऐश्वर्य मिळविण्याकरिता प्रयत्न करावयाचा आहे. जसे एकाच कुटुंबातील सगळे भाऊ घराची व कुटुंबाची काळजी घेतात. कधी कोणाचे चुकले तरी रागवत नाही. यश आणि अपयश आपलेच समजून त्यामध्ये सर्वजण सहभागी होतात. वात्सल्याची पवित्र भावना एक-दुसर्‍यामध्ये दिसून येते. आपल्या उत्कर्षासाठी सर्वजण प्रयत्न करतात. एका दिलाने एका मनाने संघटित होऊन कामाला लागतात. कधीही भेदभाव किंवा पक्षपात होत नाही. जसे हे छोटे कुटुंब तसेच विश्व हे मोठे कुटुंब! या विश्वात राहणारे सर्वजण आपण एक आहोत. वेगळेपणा कुठेच दिसत नाही. परमेश्वरीय दृष्टिकोनातून सगळे एक समान आहेत. भेदभाव निर्माण केला आहे, तो मानवाने निर्माण केलेल्या मत-पंथांने व जातीभेदाने! कारण, मानवी मनाच्या संकुचित वृत्तीतून आणि स्वार्थाच्या भावनेतून हे व्यर्थ अर्थाचे भेदभाव उदयास आले आहेत. या भेदांनीच माणसा-माणसांत दुरावा निर्माण केला आहे. सांप्रदायिक विचारांची ही विषवल्ली किंवा प्रांतवादांचे भूत या सर्वांमुळे माणसा-माणसात प्रचंड अंतर पडले आहे. एक भली मोठी दरी निर्माण झाली आहे. यामुळे परस्परांमध्ये प्रेमवस्तू, स्नेहाची भावना नष्ट झाली आणि शत्रुत्वाच्या भिंती उभ्या राहिल्या. या सर्वच संकीर्ण दुर्भावनांना त्यागून जर काय आम्ही वेद माऊलींचा आश्रय घेतला तर निश्चितच सर्वजण सुखाने नांदू शकतो. प्रस्तुत मंत्रात तीच भावना व्यक्त होते-
एते सं भ्रातरो वावृधु: सौभगाय!

 


आम्ही सर्व भाऊ मिळून या वसुंधरेला कुटुंब मानूया! या वसुंधरेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करूया! वैश्विक स्तरावर आपण सगळे एक होऊया! कारण, वेदांमध्ये आम्हा भावंडांचा एकच पिता आहे. म्हणून ईश्वराला संबोधित केले आहे. हा पिता कधीही थकत नाही की म्हातारा होत नाही. तसा तर तो सदैव युवाच आहे. परमेश्वर चिरतरुण बनून आम्हा सर्वांचे रक्षण करतो. आम्हावर आलेली संकटे दूर करतो. म्हणून तो आम्हाला सर्वांचा ‘स्वपा’ म्हणजे ‘सुख प्रदान करणारा’ आहे. आम्हा भावंडांवर जर कोणते संकट आले किंवा एखादा शत्रू चालून आला, तर त्यांना धडा शिकविण्याकरिता ‘रुद्र’ बनतो. तो त्यांना रडवितो. शत्रू हे आंतरिक व बाह्य असे दोन प्रकारचे असतात. काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी षड्रिपु हे आमच्या मन व इंद्रियांच्या दोषामुळे बनतात. यामुळे आमचे जगणे असे बनते, तर बाहेरचे शत्रूदेखील आम्हाला त्रस्त करतात. पण, बाहेरच्या शत्रूपेक्षा आतील शत्रू हे फारच घातक असतात. म्हणूनच त्या परमपिता परमेश्वाने आध्यात्मिक ज्ञानाची शिदोरी वेदविज्ञानाच्या रुपाने आम्हा सर्वांसाठी पूर्वीच बनवून ठेवली आहे. म्हणून तो पिता खर्‍या अर्थाने आम्हा सर्वांचा स्वतः म्हणजे सुख प्रदान करून पालन करणारा आहे. 

त्याच्या जोडीला आहे ती म्हणजे ही सृष्टीमाता! ही माता आम्हा भावंडांना सतत ‘सुदिन’ म्हणजे चांगले दिवस आणणारी आहे. ती उत्तम प्रकारचे धनधान्य व पदार्थ प्रदान करुन आम्हा सर्वांचे रक्षण करते. याच सृष्टीतील धरणीमाता आम्हाला आपल्या विविध धनधान्यरुपी दुधाने तृप्त करणारी आहे. आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही. असा पिता व अशी माता जेव्हा आम्हां भावंडांना लाभते, तेव्हा आम्ही एक बनून आनंदाने राहत. त्याद्वारे आपली जीवनयात्रा सफल केली पाहिजे. वेदांचा हा विश्व कल्याणकारी संदेश वर्तमान युगातील नाना प्रकारच्या मतभेदांना दूर करून एक दुसर्‍यांना बंधुत्वाच्या भावनेने जोडणारा आहे.
 

 

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

@@AUTHORINFO_V1@@