‘सरोद’चा जादूगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020   
Total Views |


Ustad_1  H x W:


सरोद या वाद्यावर ज्यांची लिलया बोटं फिरतात, असे ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान साहेबांविषयी...


वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी आपल्या पहिल्या सरोद वादनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. शास्त्रीय संगीताच्या आपल्या घराण्याच्या सहाव्या पिढीचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या घराण्यातील बुजुर्ग लोकांनी ‘सरोद’ या सुमधुर वाद्याचा शोध लावल्याचे म्हटले जाते. घरंदाज शास्त्रीय संगीताच्या वातावरणात वाढल्याने त्यांना साहजिकच संगीत साधनेचे वेड लागले. आज त्यांचे नाव भारतातल्या दिग्गज शास्त्रीय कलाकारांमध्ये गणले जाते. भारत सरकारचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार प्राप्त असा हा कलाकार म्हणजे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान साहेब.

खान साहेबांचा जन्म दि. ९ ऑक्टोबर, १९४५ रोजी झाला. ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज संगीतकार हाफिज अली खान साहेबांच्या सात मुलांपैकी ते सर्वात लहान. त्यांच्या घराण्याला बंगश वंशाची संगीत परंपरा लाभली आहे. अमजद खान साहेबांचे खरे नाव मसूम, असे होते. एका भिक्षुकाने त्यांचे नाव बदलले. त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण ग्वाल्हेरमध्ये घरातच झाले आणि संगीताचे शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडून घेण्यास सुरुवात केली. १९५७ साली हाफिज अली खान यांना दिल्लीतील सांस्कृतिक संघटनेने पाहुणे कलाकार म्हणून आमंत्रित केले. तेव्हा हे कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले. ही मंडळी दिल्लीला पोहोचल्यानंतर हाफिज यांच्या मित्रांने त्यांना मुलांना शिक्षण देण्याबाबतचे महत्त्व पटवून दिले आणि अमजद यांनी दिल्लीत शाळेत जाण्यास सुरुवात केली.
वयाच्या सहाव्या वर्षी अमजद साहेबांनी छोटेखानी कार्यक्रमात सादरीकरण केले होते. मात्र, त्यांना मोठा कार्यक्रम मिळाला तो वयाच्या १८व्या वर्षी, म्हणजेच १९६३ साली. या सालात त्यांनी अमेरिकेचा दौरा कथ्थक नृत्य शिरोमणी पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्यासोबत केला. या दौर्‍यामध्ये महाराजांना नृत्यात वाद्यावर साथ देण्याबरोबरच खान साहेबांचा सरोद वादनाचा कार्यक्रमही झाला. या प्रवासाची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, खान साहेबांच्या सरोद वादनाच्या वेळी पंडित बिरजू महाराजांनी तबला साथ दिली होती, तर खान साहेबांनी कथ्थक रचनांमध्ये सरोदची साथ दिली होती. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. उस्ताद अमजद अली खान यांनी भारत आणि परदेशातील बर्‍याच महत्त्वाच्या संगीत केंद्रांमध्ये सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यातील काही रॉयल अल्बर्ट हॉल, रॉयल फेस्टिव्हल हॉल, केनेडी सेंटर, हाऊस ऑफ कॉमन्स, फ्रँकफर्टचा मोझार्ट हॉल, शिकागो सिम्फनी सेंटर, ऑस्ट्रेलियामधील सेंट जेम्स पॅलेस आणि ऑपेरा हाऊस याठिकाणी त्यांनी सादरीकरण केले.
आपल्या सांगेतिक कारकिर्दीदरम्यान खान साहेबांनी सरोदमध्ये बदल करण्याचा प्रयोग केला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बोटाच्या टीपांऐवजी बोटाच्या नखांनी सरोद वाजण्यास सुरुवात केली. सरोद वादनाची ही सर्वात कठीण पद्धत आहे. आपल्या संगीतसाधनेच्या बळावर त्यांनी ‘किरण रंजानी’, ‘हरिप्रिया कानडा’, ‘शिवंजली’, ‘श्याम श्री’, ‘सुहाग भैरव’, ‘ललित धवानी’, ‘अमिरी तोडी’, ‘जवाहर मंजरी’ आणि ‘बापुकस’ असे अनेक राग तयार केले आहेत. त्यांनी हाँगकाँगच्या ‘फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रा’ची रचना करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातीही मिळविली आहे. त्यास ‘ट्रिब्यूट टू हाँगकाँग’ असे नाव देण्यात आले होते. या ऑर्केस्टामध्ये प्रसिद्ध गिटारवादक चार्ली बर्ड, व्हायोलिन वादक इगोर फ्रोलोव, सुप्रानो ग्लेन्डा सिम्पसन, गिटारवादक बॅरी मेसन आणि युके टेस्टिस्ट यांचा समावेश होता. तसेच त्यांनी न्यू मेक्सिको विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणूनही काम केले आले.  


आपल्या संगीत प्रतिभेमुळे खान साहेबांना टेक्सास राज्य आणि मेसाच्युसेट्स, टेनेसी आणि अटलांटा या शहरांचे मानद नागरिकत्वही बहाल करण्यात आले आहे. दक्षिणेतील तिरुवायूर मंदिरात सेंट त्यागराजाच्या सन्मानार्थ आपली कला सादर करणारे अमजद अली खान हे पहिले उत्तर भारतीय कलाकार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांनी ओस्लो, नॉर्वे येथे प्रतिष्ठित नोबेल शांती पुरस्कार सोहळ्यात वादन केले. तसेच क्वीन लतीफा, स्टीव्हन टायलर, नुनो बेटेनकोर्ट आणि लॉरा यांच्यासमवेत नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्यात सादरीकरण केले.

युवावस्थेपासूनच खान साहेबांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १९७१ मध्ये ते द्वितीय एशिया आंतरराष्ट्रीय संगीत-संमेलनात सहभागी झाले होते. त्या ठिकाणी त्यांना मानाया ‘रोस्टम पुरस्कार’ पुरस्कार मिळाला. हे संमेलन ‘युनेस्को’च्यावतीने पॅरिसमध्ये आयोजित केले गेले होते. त्यावेळी त्यांनी ‘आकाशवाणी’चे प्रतिनिधित्व केले होते. वयाच्या २६व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार प्राप्त केला होता. याशिवाय खान साहेबांना भारत सरकारच्या ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘तानसेन पुरस्कार’, मानाचा ‘युनेस्को पुरस्कार’, ‘युनिसेफ’च्या ‘राष्ट्रीय राजदूत पुरस्कार’, ‘इंटरनॅशनल म्युझिक फोरम पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासाला सलाम!

 
@@AUTHORINFO_V1@@