कल्याण करी रामराया...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |


RamJanmBhumi_1  


आज जर समर्थ रामदासस्वामी असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. श्रीराम हे त्यांचे आराध्य दैवत आणि सर्वस्व होते. श्रीराम हा समर्थांचाही समर्थ, देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवणारा आणि स्वामींचा परमार्थ होता.



अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य राममंदिर व्हावे, ही अखिल हिंदूंची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मध्यंतरीच्या काळात अनेक विघ्ने येत गेली. आता त्या विघ्नांची बाधा संपुष्टात आली. लवकरच श्रीराम मंदिराची उभारणी होणार आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिराच्या पायाभरणीचे भूमिपूजन झाले. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा एक परम आनंदाचा क्षण होता, अशीच हिंदूंची भावना आहे. आज जर समर्थ रामदासस्वामी असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. श्रीराम हे त्यांचे आराध्य दैवत आणि सर्वस्व होते. श्रीराम हा समर्थांचाही समर्थ, देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवणारा आणि स्वामींचा परमार्थ होता.


आमुचे कुळीं रघुनाथ। रघुनाथें आमुचा परमार्थ।
जो समर्थांचाहि समर्थ। देवां सोडविता॥


हे स्वामींनी पुन्हा एकदा सांगितले असते. रामजन्मभूमीत भव्य राम मंदिर होत आहे, ही सुखद बातमी कानावर येताच, आपले दोन्ही बाहू पसरवून ‘जय जय रघुवीर समर्थ’ म्हणत या गोसाव्याने आपला आनंद व्यक्त केला असता. रामजन्मभूमी म्लेंछांच्या तावडीतून सोडवावी, अशी स्वामींची तीव्र इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे. हे पाहिल्यावर रामाच्या दयेला सीमा नाही. या कृतज्ञभावनेने स्वामी म्हणाले असते-


मनीं धरावें ते होते। विघ्न अवघेचि नासोन जाते।
कृपा केलिया रघुनाथे। प्रचित येते॥


रामाच्या कृपेने रामजन्मभूमीत भव्य राम मंदिराच्या पायाभरणीसाठी भूमिपूजन पार पडले, याचा प्रत्येक हिंदूला अभिमान आहे. युवराज असूनही श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला, हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांच्या प्राणप्रिय जानकीला रावणाने कपट करून पळवले. कसलीही मदत नसताना धैर्याने वानरसैन्यदल तयार करून अलंघ्य सागरी सीमा पार करून रामाने लंका गाठली. तेथे जाऊन पराक्रमाने रावणाचा वध केला. सीतेची तसेच रावणाच्या बंदिवासातील देवांची सुटका केली. नंतर वनवासाची १४ वर्षे पूर्ण झाल्यावरच राज्यपद स्वीकारले. आताही ४९२ वर्षांच्या दीर्घ विजनवासानंतर रामरायाला त्यांच्या जन्मस्थानी वैभवशाली मंदिर मिळणार आहे. श्रीरामांच्या काळी कैकयीपुढे कोणाचे काही चालले नाही. आता राम मंदिरासाठी विघ्ने आणणार्‍यांमुळे कालहरण होत गेले. परंतु, अखेर सत्याचा विजय झाला. वर्षानुवर्षे चाललेल्या रामजन्मभूमी वादाला योग्य न्याय मिळाला. अयोद्धेतील वादग्रस्त जमीन हिंदूंचीच असून तेथे पूर्वी राम मंदिर होते, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि तेथे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.


हिंदूंची देवळे पाडण्याची, मूर्तिभंजन करण्याची प्रथा मुघल राज्यकर्त्यांच्या मनात सर्रास प्रचलित होती. स्वामींनी आयुष्यभर हिंदू संस्कृती रक्षणार्थ व दुष्टांच्या नाशासाठी लोकजागृती केली. राम आणि हनुमानाचा आदर्श समाजापुढे ठेवून शक्तीची उपासना करायला सांगितले. आपली देवळे फोडली जात आहेत, देवादिकांच्या मूर्तीचे या दुष्टांकडून भंजन होत आहे, यामुळे रामदास अस्वस्थ होते. ती सल त्यांना बोचत होती. स्वामींचा अंतकाळ जवळ आला. तरी त्यांच्या सुप्तमनात कुठेतरी या देवांचा मत्सर करणार्‍या विध्वंसक कारवायांचाच विचार होता. देह ठेवण्याच्या आदल्या दिवशी दोन प्रहरी निद्रा करून उठल्यावर स्वामी म्हणाले,


‘देवद्रोही यांचा नाशाचि आहे.’


हिंदू देवादिकांच्या मूर्ती फोडून हिंदू संस्कृतीला संपवू पाहणारे हे मुस्लीम राज्यकर्ते यांचा नाशच होणार आहे. एका वैराग्याच्या तोंडून निघालेली ही शापवाणी होती. हिंदू देवदेवतांचा द्रोह करणार्‍यांचा, देवाशी वैर धरणार्‍यांचा स्वामींना अतिशय राग होता. न राहवून आपल्या परखड शब्दांत स्वामींनी त्यांचा समाचार घेतला आहे.
देवद्रोही तितुके कुत्ते। मारून घालावे परते॥


देवद्रोही म्लेंछांनी बळकावलेल्या रामजन्मभूमीचा इतिहास सर्वांना ठावूक आहे. तरी तो थोडक्यात पाहू. भारतावर सशस्त्र हल्ला करण्याच्या उद्देशाने जहिरुद्दीन बाबर हिंदुस्तानात इ. स. १५२६ साली आला. पानिपतला झालेल्या लढाईत इब्राहिम खान लोदीचा पराभव करून त्याने दिल्ली व आग्रा ताब्यात घेतले. धर्मप्रसारासाठी बाबराने पानिपत व उत्तर प्रदेशातील संभल येथे मशिदी बांधल्या. अयोध्येत राम मंदिराची तोडफोड करून मशिदीसाठी एक ढाँचा उभा केला. पण, इ. स. १५३० मध्ये तो मेल्याने मशिदीचे काम पूर्ण झाले नाही. मंदिरे पाडण्याच्या विध्वंसक कारवायांचा वारसा त्याच्या पुढील पिढ्यांनी वाढवला. समर्थांच्या काळात या बाबराचे वंशज शहाजहान व औरंगजेब यांनी त्यावर कळस चढवला. कपटी, अत्याचारी, विध्वंसक व लहरी सुलतानांच्या वागण्याच्या तर्‍हा त्याकाळी भारताला भेट दिलेल्या परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवल्या आहेत. त्यात मनुची, टॅव्हरनियर, बरनियर, मन्डेलस्लो यांनी लिहिलेली मुघल सुलतानाच्या अत्याचाराची वर्णने वाचताना अंगावर शहारे येतात.


इ. स. १६३२ला वयाच्या २४व्या वर्षी रामदासांनी तीर्थाटनासाठी नाशिक सोडले. पिळदार शरीर, तपश्चर्येचे तेज असा हा युवक गोसावी पुढील १२ वर्षे भारतभर पायी फिरला. भिक्षामिसे गावात फिरून लोकांचा परिचय करून घ्यावा व हिंदुत्वरक्षण प्रचारार्थ लोकांना तयार करावे. त्यांना रामाची व हनुमानाची उपासना लावून घ्यावी, असे चालले होते. लोकांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडत होती. काशीला गंगेच्या काठी हनुमान घाटावर हनुमान नव्हते. तेथे स्वामींनी मारुतीची स्थापना केली. तीर्थयात्रेबरोबर जनजागृतीचे काम स्वामी करीत होते. तीर्थयात्रेच्या काळात स्वामी कोठेही तीन किंवा चार दिवसांपेक्षा जास्त काळ एके ठिकाणी वस्तीस राहिले नाही. मुक्कामात लायक स्थानिक माणसांची निवड करून त्यांना दीक्षा व सूचना देऊन स्वामी पुढे निघून जात. ‘उदंड समुदाय करावे। परी गुप्तरुपे॥’ ही त्यांची कामाची पद्धत होती. रामरायाच्या अयोध्येत मात्र ते ११ महिने राहिले. रामाच्या जन्मठिकाणी उद्ध्वस्त राम मंदिर व मशिदीचे घुमट पाहून स्वामींच्या मनाला वेदना झाल्या असतील. तेथील वैभवशाली मंदिर रामरायाला परत मिळवून द्यावे असे त्यांना वाटले असेल. त्यासाठी काही योजना आखण्यासाठी समर्थ तेथे ११ महिने राहिले असावेत. त्याकाळात स्वामींनी अनेक गुप्त भेटीसाठी घेतल्या असतील. सुलतानी अधिकार्‍यांच्या नजरा चुकवत सारे गुप्तपणे केले असणार. आज ते इतिहासाला माहीत नाही. सर्व पाप्यांचा अभक्तांचा नाश करून हिंदुस्तान बलशाही झालेला त्यांना बघायचे होते. उद्ध्वस्त केलेल्या धार्मिक क्षेत्रांचे मंदिरांचे पुनर्निमाण करायचे त्यांच्या मनात होते. त्यांचे वाङ्मय हाच त्यांचा पुरावा.


बुडाले सर्वही पापी। हिंदुस्थान बळावले।
अभक्तांचा क्षत्यो जाला। आनंदवनभुवनी॥
बुडाला औरंग्या पापी । म्लेंछ संहार जाहला।
मोडीली मांडिली क्षेत्रे। आनंदवनभुवनी॥


छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी त्या दोघांचीही ही ध्येय होती. शिवाजी महाराजांना आणखी थोडे आयुष्य मिळाले असते, तर या स्वप्नपूर्तीसाठी फार काळ थांबावे लागले नसते.


आता अयोध्येच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी झाली आहे आणि लवकर ते पूर्ण होईल. तथापि काही अभक्तांचे चेहरे या काळात समोर आले. त्यांनी मंदिरापायाभरणीच्या समारंभाची निंदा केली. आज रामदास असते तर ती निंदा ऐकून ते म्हणाले असते, “निंदा कुणाला चुकली आहे? आपण त्याला एवढे महत्त्व का द्यायचे?”


जनीं निंदिता सुटला कोण आहे। जन सर्वदा निंदून राहे।
जया वर्णिता शीणली वेदवाणी। जनें निंदिला राम कोदंडपाणी॥


प्रत्यक्ष रामाला त्याच्या आयुष्यात जननिंदा सहन करावी लागली. तेथे आपण कोण? शेवटी रामाला एवढेच मागावे असे वाटते की, हे रामराया कोणी निंदो अथवा वंदो सार्‍यांचे भले कर. ‘कल्याण करी देवराया। जनहित विवरी॥’
 

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@