मुंबई : दुबईमध्ये होणाऱ्या आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत निवड न झाल्याने मालाडमध्ये राहणाऱ्या एका युवा क्रिकेटपटूने टोकाचे पाऊल उचलले आहे. करण तिवारी (वय २७) असे त्याचे नाव असून त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. कुरार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व भागात जानू कंपाऊंडमध्ये इमारतीत आई आणि भावासह राहत होता. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणारा करण आयपीएलसाठी तयारी करत होता.
आयपीएलसाठी संघाची निवड झाल्याची माहिती त्याला मिळाली होती. यात त्याची निवड झाली नव्हती म्हणून तो नाराज होता.
१० ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता त्याने आपल्या मित्राला फोन करत निवड न झाल्याने आत्महत्या करत असल्याची माहिती दिली, मित्राने राजस्थानमध्ये असलेल्या करणच्या बहिणीला फोन केला, तिने आपल्या आईला तातडीने फोन केला.
कुटूंबियांनी दरवाजा तोडून करणला वाचवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घरातील चादरीने त्याने गळफास घेऊन आत्मह्त्या केली. करणच्या कुटूंबियांनी कुरार पोलीसांत या संदर्भात एफआयआर नोंदवली आहे. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. करणला क्रिकेटचे प्रचंड वेड होते. कुठल्याही प्रकारे आयपीएलमध्ये खेळावे हे त्याचे स्वप्न होते, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.