स्नेहलता साठे यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |
snehlata Sathe _1 &n
 
 
ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या आणि मुलगा इंद्रजित साठे, सुना जावई, नातवंडे असा परिवार आहे. चपला हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव, चपला आत्या म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. सावरकर घराण्यातील आणि त्यांच्या विचारांचे प्रेरणादायी तसेच कृतिशील व्यक्तिमत्व गमावल्याने सावरकरप्रेमींवर एकच शोककळा पसरली आहे.
 
 
स्नेहलता साठे या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतणी आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष स्व. विक्रमराव सावरकर यांच्या भगिनी होत्या. मात्र त्यांनी त्यांची ही ओळख कधीच कुणालाही दाखवली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारसा लाभलेल्या स्नेहलता साठे यांनी सावरकर विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले. ८ एप्रिल १९३७ या दिवशी जन्म झालेल्या चपला यांचे बालपण वडील नारायण सावरकर, काका बाबाराव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात गेले. या वारशाचा परिणाम त्यांच्यावर आयुष्यभर होता. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या त्या सक्रीय सदस्या होत्या तसेच स्मारकाच्या कार्यात अधिकाधिक लौकिक वाढावा तसेच कार्य राष्ट्रपातळीवर विस्तारीत व्हावे, यासाठी त्यांची तळमळ असायची.
 
 
 
सावरकर घराण्यातील स्त्रियांचे कर्तृत्व समाजापुढे आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करत नंदादीप समितीची स्थापना केली. तसेच त्यांनी महिलांचे संघटनदेखील वाढविले. नंदादीप समितीच्या वतीने त्यांनी वीर गीत स्पर्धा तसेच वीर कथा कथन स्पर्धेचे आयोजन देखील अनेक वर्षे केले. हजारो मुलांमध्ये त्यांनी राष्ट्रभक्ती पोहोचवली. सावरकर घराण्यातील स्त्रियांवरील प्रेरणादायी कार्यक्रमाचे त्या नियमितपणे आयोजन करत असत.
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई म्हणजेच माई सावरकर यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या नंदादीप समितीच्या त्या संस्थापक सदस्य आणि आधारस्तंभ होत्या. या संस्थेच्या वतीने ३५ वर्षे मुंबईमध्ये चार केंद्रांवर वीरकथा, वीरगीतगायन स्पर्धा घेतल्या जात. या स्पर्धांमध्ये त्याच त्याच वीर कथा सांगितल्या जात हे लक्षात आल्यावर लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांच्यासारख्यांच्या वीर कथांचं नवीन पुस्तक करून घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि स्पर्धेला नवीन आयाम मिळाला. नंदादीपच्यावतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचे त्या अतिशय उत्तम नियोजन करत, प्रत्येक गोष्ट शिस्तीत व्हायला पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. त्यांनी अनेकांना व्याख्यानांसाठी तयार केले.
 
 
शुभंकरोती विवाह संस्थेच्या मुंबई शाखेची जबाबदारी
 
परिचयातून विवाह झाले तर संसार टिकतील या संकल्पनेतून तयार झालेल्या शुभंकरोती विवाह संस्थेची धुरा त्यांच्याकडे होती. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांचे वार्षिक मेळावे व नंतर दर आठवड्याला परिचय सत्रे असे उपक्रम त्यांनी राबवून अनेकांचे विवाह जुळवून आणत संसार उभे केले. उत्तम वक्त्या म्हणूनही त्यांचा लौकिक होता. शुभंकरोती विवाह संस्थेच्या मुंबई शाखेची जबाबदारी. डॉ रायकर पुणे यांची संकल्पना. परिचय विवाह, ज्यांना लग्न करायचे आहे अशा व्यक्तींनी एकमेकांचा पूर्ण परिचय करून घेऊनच मग हा निर्णय घ्यावा. यासाठी आधी वार्षिक मेळावे आयोजित झाले आणि नंतर दर आठवड्याला परिचय सत्रे आयोजित झाली. प्रत्येक व्यक्तीला अशा परिचय सत्रातून आपला जीवन साथी मिळेपर्यंत भाग घेता येईल, मग वेळ कितीही लागो अशी संकल्पना होती. त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन स्नेहलता साठे यांनी शेकडो यशस्वी विवाह जमवले.
 
राजकीय चळवळीमध्येही सक्रीय
 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या सुरुवातीपासूनच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सहभागी होत्या. विवाहानंतरही त्यांनी जिद्दीने त्यांनी एम. ए. ची पदवी संपादन केली. ज्येष्ठ बंधू विक्रमराव सावरकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार होता. विक्रमरावांच्या अनेक राजकीय चळवळीतदेखील त्यांनी सक्रीय भाग घेतला.
@@AUTHORINFO_V1@@