सांग कसे विसरावे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |
Depression_1  H


सुरुवातीला जखम भळभळणारी असते. खोल असते. जसे जसे दिवस जातात तसतशी ती भरायला लागते. पण, तरीही कित्येक वेळा जेव्हा काही प्रसंगी स्मृती दाटून येतात, तेव्हा ती शोकातून प्रत्येकाने, ते अनुभवतच जाणे आवश्यक आहे. काही काळ व्यक्तीला आपल्या या भावना दडपून टाकण्यात क्षणिक दिलासा वाटतो. पण, जखम जर भरायला हवी असेल, तर तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, स्वत:ची काळजी घ्यायला हवी.


आपण ‘कोविड-१९’च्या काळातून चाललो आहोत. हा काळ काळजीचा आणि दडपणाचा आहे. आपल्याला ‘कोविड-१९’ होईल की काय किंवा झाला तर काय, या आशंकेने आपल्या मनात पाल चुकचुकत असते. तशात अलीकडे अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. काही दिवसांपूर्वी त्या दूरच्या बातम्या होत्या. पण, कोरोना काळ जसजसा पुढे सरकत चालला आहे, तसतसा या बातम्या आता आपल्याला जवळच ऐकू यायला लागत आहेत. अशा या बातम्यांनी आपल्याला शोक तर होतोच, पण आपली मनातली भीतीसुद्धा वाढू लागते. आपण काही आपल्या आयुष्यातून गमावले की आपल्याला नैसर्गिकतः शोक वाटतोच. आपल्या आयुष्यातली एखादी गोष्ट वा एखादी व्यक्ती कायमसाठी आणि पुन्हा न परतण्यासाठी निघून गेली की, आपल्याला जी भावनिक व्यथा जाणवते, ती कधीकधी खूप भयंकर असते. आपण ज्या व्यक्तीवर वा गोष्टींवर अतिशय मनापासून प्रेम करतो, तेव्हा त्यांच्या जाण्याने मनात दाटून येणार्‍या भावना अनेक प्रकारच्या असतात. त्यात धसका असतो, राग असतो, अविश्वास असतो, प्रचंड वैषम्य असते आणि अपराधीपणाची भावनाही मनात दाटलेली असते. पण, गमावण्याचा दर्दीला अनुभव जबरदस्त असतो.



शोक एखादी व्यक्ती ज्या पद्धतीने अनुभवते, तो खूप वेगवेगळा असू शकते. तो एक वैयक्तिकच अनुभव आहे. त्या अनुभवात काय चुकलं किंवा काय बरोबर आहे, अशी तुलना नसते. तुम्ही शोक कसा अनुभवला हे तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, तुम्ही स्वतःला कसं सावरता, तुमचा आयुष्यातला एकंदरीत अनुभव कसा आहे आणि तुम्ही जे गमावलं, त्याचं महत्त्व तुमच्या आयुष्यात किती आहे, या अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. या असह्य शोकातून मी केव्हा बाहेर पडेन, असं कुणी विचारलं तर त्याला वेळापत्रक नसतं. तरीसुद्धा शोकाच्या प्रक्रियेला वेळ द्यायला लागतो. काही लोकांना काही आठवड्यात बरं वाटतं. काही लोकांना काही महिने जावे लागतात आणि काही कित्येक वर्षे शोकाच्या दुनियेत अडकूनच राहतात. शोककळा जेव्हा मनाला घायाळ करते, तेव्हा प्रत्येकाला त्यातून जितक्या लवकर बाहेर येता येईल, तितकं बरंच असं मनापासून वाटत असतं.



मनोचिकित्सक एलिझाबेथ कुबलस्रॉस यांनी शोक प्रक्रियेचे एकूण पाच टप्पे वर्णिले आहेत. पहिला टप्पा असतो ‘नाकारण्याचा.’ यात असं काही दुःख घडलंच नाही, हा भाव असतो. दुसर्‍या टप्प्यात ‘राग’ असतो, ज्यात हे ‘असं घडलंच कसं?’ हा प्रश्न असतो. तिसरा टप्पा ‘सौद्याचा’ असतो, ज्यात भाव असतो की, ‘हे असं घडू देऊ नको, म्हणजे मी अमुक करेन.’ ‘औदासिन्याचा’ चौथा टप्पा असतो, ज्यात ‘मी खूप दुःखी आहे. आता मला काही करता येणार नाही. असाहाय्य आहे,’ हा भाव असतो, तर पाचव्या टप्प्यात ‘स्वीकार’ असतो. ‘जे काही घडलं आहे ते मला मान्य आहे,’ हा अविर्भाव या पाचव्या टप्प्पात आहे. ‘होनी को कौन टाल सकता है’ या मताशी बरेच जण सहमत होतात. यापैकी कुठलेही भाव शोकाच्या कालातून जाताना तुम्हाला जाणवले, तर या नैसर्गिक समर्थनाच्या प्रक्रिया आहेत आणि शोक प्रक्रियेतून जाणार्‍याला त्यातून जावे लागते, हे तुम्हाला ओळखता येईल. काही माणसं या कुठल्याही टप्प्यातून न जाता शोकाकूल अवस्थेतून बाहेर येतात. त्या आयुष्याच्या किचकट आणि कठीण परिस्थितीचा अनेक वेळा सामोरे गेलेल्या असतात. अनेक दु:खांची उन्हे त्यांनी सहन केलेलली असतात. त्यामुळे दु:ख पचवण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्यामध्ये आलेली असते. शिवाय शोक प्रक्रियेतून जाताना या पाच टप्प्यातून व्यक्ती बरोबर क्रमाक्रमाने जाते असेही नाही. काही व्यक्ती कुठल्याही एखाद्या दुसर्‍या टप्प्यातूनच जातात. शोकाच्या ज्या भावना असतात, त्या नेहमीच एकच शुद्ध सरळ भावना असते असेही नाही. आपण जे गमावलं, त्याचं जसं दु:ख असतं, तसंच आपल्या बाबतीतच हे असं का झालं, याचा रागही त्याचवेळी मनात भरलेला असतो. भावनांची ती एक संमिश्र चढ-उतारांची आणि कधीकधी अव्यवस्थित वाटावी अशी प्रक्रिया असते. अनुभवणारी व्यक्तीही कधी कधी गोंधळते यामुळे. आयुष्यात आपण अनेक माणसं आणि अनेक गोष्टी गमावतो. त्यामुळे भावनिक प्रक्रियासुद्धा विशिष्ट असतात असे नाही. बर्‍याच लोकांना या प्रक्रियेतून जाताना अनेक चढ-उतारही जाणवतात.


सुरुवातीला जखम भळभळणारी असते. खोल असते. जसे जसे दिवस जातात तसतशी ती भरायला लागते. पण, तरीही कित्येक वेळा जेव्हा काही प्रसंगी स्मृती दाटून येतात, तेव्हा ती शोकातून प्रत्येकाने, ते अनुभवतच जाणे आवश्यक आहे. काही काळ व्यक्तीला आपल्या या भावना दडपून टाकण्यात क्षणिक दिलासा वाटतो. पण, जखम जर भरायला हवी असेल, तर तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, स्वत:ची काळजी घ्यायला हवी. त्याचवेळी तो ‘दर्द’ ही अनुभवायला हवा. आपल्याला सहन होणार नाही म्हणून तो वरवर टाळायचा नाही. कारण, हा ‘दर्द’ आज नाही अनुभवला, तर उद्या डोकं वर काढतो. यासाठी धीराने आपल्या प्रिय जगाचा विरह अनुभवायला पाहिजे. त्यावर फुंकर घालायला आपणच पुढे आलं पाहिजे. कारण, या विरहातसुद्धा या प्रिय व्यक्तींवर आपण अमाप प्रेम केलेले असतं. त्यांच्या सहवासात आनंदायी प्रत्यय घेतलेला असतो. त्या प्रेमाला आणि आनंदालासुद्धा न्याय तर द्यायला हवाच, आठवणींच्या कवडशातून.


आठवणी दाटतात!
धुके जसे पसरावे
जे घडले ते सगळे
सांग कसे विसरावे...
गीतकार- योगेश्वर अभ्यंकर


- डॉ. शुभांगी पारकर





@@AUTHORINFO_V1@@