पिकविलेस शून्यातून मोती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |
Narendra Kumar_1 &nb




मोत्यांची शेती करत लाखोंची उलाढाल करणार्‍या राजस्थानाताली नरेंद्र कुमार गरवा यांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा हा लेख...


‘गरिबी हा माणसाला मिळालेला शाप आहे’ असे फार पूर्वापारपासून म्हटले जाते. आजघडीला भारताने जगात जरी सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा नावलौकिक प्राप्त केला असला, तरी देशातील गरिबी व बेरोजगारीच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसून येत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भारतात आर्थिक नियोजन पद्धतीचा अवलंब केला गेला.
 
 
गरिबी आणि बेरोजगारीच्या समूळ उच्चाटनासाठी विविध धोरणे आणि योजनांची आखणी करण्यात आली. ‘गरिबी हटाव’चा नारा दिल्यानंतरही देशातील काही टक्के नागरिकांची दारिद्य्र रेषेखाली नोंद होणे, यासारखे दुर्दैव नाही. गरिबीचे प्रमाण दरवर्षी कमी होत असले तरी अद्याप तिचा पूर्णपणे नायनाट करण्यात यश आलेले नाही. दारिद्य्र रेषेखालील गटात सर्वाधिक शेतकर्‍यांचाच समावेश होतो. भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक व्यवसायांसाठी जोडधंदा करणारे अधिकतम नागरिक या गटात मोडतात, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
 
 
यातून मिळणारी मिळकत ही फार थोडी असल्यामुळे अशा व्यवसायांकडे वळण्यास अनेकजण सहजासहजी तयार होत नाहीत. जे व्यवसाय दारिद्य्र रेषेबाहेर पडण्याइतकीही मिळकत देत नाहीत, असे धंदे करून काय उपयोग, असाच विचार अनेकांकडून केला जातो. मात्र, याला काही मंडळी अपवादही ठरली आहेत. कुणाला माहितही नसणार्‍या अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत लाखोंची कमाई करत त्यांनी जगासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. राजस्थानमधील नरेंद्र कुमार गरवा हे त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 
एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या नरेंद्र कुमार गरवा यांनी चक्क मोत्यांची शेती करत लाखो रुपयांची उलाढाल करण्यात यश मिळविले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालायातील सदस्यांपर्यंत त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली आहे. गरवा यांनी केलेल्या मोत्यांच्या शेतीचा आदर्श घेत विविध राज्यांतील शेतकर्‍यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यात यश मिळविले आहे.
 
 
नरेंद्र कुमार गरवा यांचा जन्म राजस्थानमधील रेनवाल या गावी एका गरीब कुटुंबात झाला. गरवा कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय हा शेती. छोट्याशा जमिनीच्या तुकड्यातून शेती करून मिळणार्‍या उत्पन्नातून दोन वेळचे खायला मिळणे फार कठीण होत असे. त्यामुळे गरवा दाम्पत्यांना अनेकदा दुसर्‍यांच्या शेतीत शेतमजुरीही करावी लागत असे. शेतमजुरीच्या मिळणार्‍या या पैशांतूनच आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवताना गरवा कुटुंबीयांची दमछाक होत.
 
 
आपल्या आई-वडिलांचे हे कष्ट पाहून नरेंद्र यांनीही आपल्या कुटुंबीयांना मदतीसाठी हातभार लावण्याचा निर्णय घेतला. शाळेतून घरी आल्यानंतर मिळालेल्या या वेळेत ते आपल्या आई-वडिलांसोबत शेतात जाऊन काम करत असत. शेतीच्या कामांतून वेळ मिळत नसल्याने शिक्षणाकडेही त्यांना फारस लक्ष देता आले नाही. खूप शिकून शहरात जाऊन नोकरी करण्याची त्यांची फार इच्छा होती. मात्र, त्यांची इच्छा ही अखेरपर्यंत इच्छाच बनून राहिली.
 
 
परिस्थितीअभावी त्यांना आपले शिक्षणही अर्ध्यावरच सोडावे लागले. त्यामुळे त्यांनी शहरात जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला. एका दुकानात पुस्तके विक्री करण्याचे काम त्यांना मिळाले. खूप मेहनत करूनही हवे ते उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला. नवीन काय करता येईल याचा नरेंद्र यांनी गुगलवर शोध घेतला. तेव्हा त्यांना मोत्याच्या शेतीबाबत माहिती मिळाली. इतकेच नाही तर मोत्याच्या शेती राजस्थानात फार कमी लोक करतात असेही समजले. ओडिशामध्ये ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर’ नावाची एक संस्था आहे. जी शिंपल्याची शेती करण्याचे प्रशिक्षण देते. अशी माहिती त्यांना ‘गुगल’वर मिळाली. यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेणे गरजेचे समजले.
 
ओडिशातील संस्थेत ते गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी ३० ते ३५ हजार रुपयांत शिंपल्यातून मोती तयार करण्याला सुरुवात केली. त्यांनी याची सुरुवात घराच्या छतावर केली होती. तेव्हा लोक त्यांना वेड्यात काढत होते. इतकेच काय तर घरातील लोकांनीही त्यांना वेड्यात काढले. मात्र, नरेंद्र यांनी कोण काय म्हणत आहेत याकडे लक्ष दिले नाही. ते मोत्याची शेती करत राहिले आणि यामुळेच त्यांचे नशीब बदलले.
 
आज ते पाच लाख रुपयांपर्यंतची कमाई करत आहेत. सध्या नरेंद्र ३०० फुटांच्या प्लॉटमध्ये काम करत आहेत. त्यांनी मुंबई, गुजरात आणि केरळहून आणलेल्या शिंपल्यांची शेती सुरू केली. चांगल्या शेतीसाठी ते एका जागी साधारण एक हजार शिंपले ठेवतात. यापासून त्यांना दीड वर्षात डिझायनर आणि गोल मोती मिळतात. त्यांनी तयार केलेल्या मोत्यांना देशभरातून मागणी आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर आजच्या घडीलाही सर्व काही साध्य करता येते, असे नरेंद्र यांचे म्हणणे आहे.
 


- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@