अन्न हे पूर्ण ब्रह्म (भाग ९) : ‘क’ जीवनसत्वाचा स्रोत - लिंबू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |
Vitamin C_1  H



सध्याच्या ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर, प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वाचा (व्हिटॅमिन) वापर (गोळ्या, रासायनिक पद्धतीने बनविलेल्या) खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. काही जाहिराती बघून किंवा कुणाचे ऐकून या गोळ्या हमखास सुरू केल्या जातात. ‘ व्हिटॅमिन सी’चे शरीरात कार्य काय, त्याचे गुणधर्म काय, किती प्रमाणात त्याची गरज असते, कुठल्या आहारद्रव्यातून ते मिळू शकते. याबद्दल आपण जाणून घेऊयात.


‘क’ जीवनसत्त्व हे पाण्यात विरघळणारे असे आहे. ‘क’ जीवनसत्त्वाच्या उत्तम कार्यामुळे त्वचा व प्रतिकारशक्ती सुधारते. दात, हाडे, शरीरातील छोट्या रक्तवाहिन्या इ. साठी ‘क’ जीवनसत्त्व गरजेचे आहे. नित्य दिनक्रमात ‘क’ जीवनसत्त्वाची लागणारी गरज ही ९० मिग्रॅ आहे. शरीरात याची साठवण होत नसल्याने याचे नित्य आहारातून सेवन करणे गरजेचे आहे. ‘क’ जीवनसत्त्वामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते. सर्दी-पडसे होण्यापासून टाळता येते किंवा झाल्यास लवकर आटोक्यात येते. शरीरातील उती आणि पेशी यांची दुरुस्ती व रक्षण ‘क’ जीवनसत्त्व करते. याचा एक उत्तम गुण म्हणजे हे अ‍ॅण्टिऑक्सिडंट आहे. अ‍ॅण्टिऑक्सिडंट असल्यामुळे शरीरातील Free radicals कमी करून विविध कर्करोग, हृदयरोग यापासून दूर राहणे शक्य होते. शरीरातील collagen synthesis सुधारून त्वचेचे स्वास्थ्य व firmness (स्थिरता) टिकविण्यास मदत करते. शरीरातील लोहाची कमतरता म्हणजेच अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी रोज ‘व्हिटॅमिन सी’ खावे. (१.२ ग्रॅम प्रतिदिन या प्रमाणात घ्यावे.)


आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, किवी, टोमॅटो, बटाटा, ब्रॉकोली, भोपळी मिरची, निवडक हिरव्या पालेभाज्या, पेरू, फणस, फ्लॉवर, पपई इ. मधून ‘व्हिटॅमिन सी’ मुबलक प्रमाणात मिळते. लिंबाबद्दल आज जाणून घेऊया.


आयुर्वेदाप्रमाणे, लिंबू हे त्रिदोषशामक आहे. अग्नी (पचनशक्ती) सुधारून अन्न पचविण्यास मदत करते. (दीपन-पाचन कार्य) खूप तहान लागली असल्यास, घशाला कोरड/शुष्क पडले असल्यास लिंबाने चटकन आराम पडतो. तोंडाला चव नसणे, मळमळणे, उमासे येणे, जेवणावरची इच्छा नसणे अशा लक्षणांमध्ये लिंबाचा उत्तम उपयोग होतो. लिंबामुळे पोटातील वायू अधोमार्गाने सरण्यास मदत होते. (अनुलोमक आहे.) त्याचबरोबर पित्ताचेही शमन करणारे आहे. वायूला काढून पोटफुगी कमी करतो. मलबद्धता कमी करण्यास उपयुक्त ठरते. डोळ्यांचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी आणि स्मरणशक्ती उत्तम राखण्यासाठी लिंबू उपयोगी आहे. शरीरातून कफाचे निस्सरण करण्यासाठी व कोरडा खोकला आटोक्यात आणण्यासाठी लिंबाचा वापर करावा.


लिंबू धुवून, चिरून, त्याचा रस काढून सरबत करावे. गरम पाण्यातून हे सरबत केल्यास, तापातही उपयोगी ठरते. लिंबाच्या रसामुळे स्वेदप्रवृत्ती होते. यामुळे ताप उतरण्यास मदत होते. तापात तोंडाची चव गेलेली असते. तीही आणण्यासाठी लिंबू उपयोगी ठरते. पिळलेली फोड तोंडात धरल्याने मळमळणे, तोंडाची चव जाणे, तोंडाला गुळचट चव येणे हेही कमी होते. लिंबाने लघवीचे प्रमाणही वाढते. मूत्रातील आम्लता कमी करून सहज मूत्रप्रवृत्ती होण्यास मदत होते. थांबून थांबून मूत्रप्रवृत्ती होत असल्यास गरम पाण्यातून लिंबाचे पाणी पिण्यास द्यावे. लिंबाचा रस व यवशार दिल्यास मूतखड्यावरही फायदा होतो.


लहान मुलांमध्ये जंतांची जर वारंवार तक्रार असेल, तर शहाळ्याच्या पाण्यातून एका लिंबाचा रस पिळावा व प्यायला द्यावा. जंतांचा त्रास कमी होतो. अजीर्ण, अग्निमांद्य असताना, आलं-लिंबू पाचक अत्यंत उपयोगी ठरते. लंघन करुन आलं-लिंबू पाचक घेतले, तर लवकर गुण येतो. लिंबाच्या सालीचाही आहारात परदेशातून समावेश केला जातो. त्याचा एक विशिष्ट स्वाद येतो. लिंबाचे साल किसून वापरले जाते.


लिंबाच्या रसाने त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत होते. कोपर-गुडघा काळवंडला असल्यास, त्वचा जाड व खरबरीत झाली असल्यास पिळलेल्या लिंबाची फोड वापरावी. त्यात थोडे मीठ घालून ती या जाड त्वचेवर चोळावी नंतर स्वच्छ पाण्याने धुवून खोबरेल तेल, एरंडेल किंवा शतधौत धृत लावावे. त्वचा-मऊ, मुलायम व गोरी होते.


लिंबाच्या सालीपासून तेल तयार करावे व हे तेल देवी, गोवर, कांजिण्या यांच्यावर लावावे, डाग कमी करुन त्वचा मऊ करण्यासाठी उपयोगी ठरते. लिंबू हे असे फळ आहे, जे बारा महिने उपलब्ध असते. याचा नित्य आहारातून वापर अवश्य करावा. गरम भातावर वरण-तूप-मीठ आणि लिंबू घ्यावे. याने अन्नामध्ये रुची तर उत्पन्न होतेच, पण पचनही सुधारते. तोंडातील लाळेचा स्राव उत्तमरित्या होऊन पचनास मदत होते.


त्वचा अधिक तेलकट होत असल्यास कोमट पाण्यात लिंबाचा थोडा रस घालून त्वचा / चेहरा धुवावा. ‘ऑईल कंट्रोल’ उत्तमरित्या घडून येते. लिंबाचा वापर सॅलड, कोशिंबीर, मिसळ इ. आहार पदार्थांमधूनही करता येतो. टिकण्याच्या दृष्टीने लिंबाचे (बिन तेलाचे) लोणचे करावे. हे लोणचे उपवासालाही चालेल आणि अन्नामध्ये रुची उत्पन्न करणारे आहे. लिंबाचा रस काढून खूप दिवस टिकत नाही. त्यात मीठ घालून ठेवल्यास तो अधिक काळ टिकतो.


‘क’ जीवनसत्वाची गरज भरुन काढण्यासाठी महागडी फळे किंवा परदेशात उत्पन्न होणारी फळे वापरण्याचा सध्या जोर दिसतो. पण, या फळांनी काही वेळेस पित्ताचा त्रास उद्भवतो, अ‍ॅसिडिटी होते. ते टाळण्यासाठी लिंबू वापरणे हा पर्याय उत्तम. कारण, आवळ्याप्रमाणेच लिंबूही आंबट असून पित्तशामक आहे, पित्तवृद्धिकर नाही. ताजे फळ आणि ताजा रस भारतात सर्वत्र उपलब्ध आहे. तेव्हा याचा अवलंब करावा.
(क्रमश:)



- वैद्य कीर्ती देव




@@AUTHORINFO_V1@@