कोरोना कहर (भाग-२१) : ‘कोरोना’ व्हायरस आणि मानसिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |
Corona_1  H x W




साधारणपणे २०१९च्या शेवटी चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसच्या साथीला सुरुवात झाली आणि त्यानंतर झपाट्याने हा व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला. या ‘कोविड-१९’च्या आजाराने फक्त लोकांच्या शरीरावरच हल्ला नाही केला, तर मानसिकतेवरही प्रचंड प्रमाणात आघात केल्यामुळे त्याचे वाईट परिणामही दिसून आले. तसेच संपूर्ण जगभरात या साथीने सामाजिक, आर्थिक व मानसिक नुकसानीलाही तोंड द्यावे लागले.


कोरोना विषाणूच्या साथीच्या अगोदर सर्व काही सुरळीत, वेळेवर व प्रत्येकाच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होते. एखाद्या वादळाप्रमाणे आलेल्या या साथीच्या आजाराने लोकांचे सर्वच मनसुबे व वेळापत्रक कोलमडून पडले. लोकांची मानसिकता, मुख्यत्वे भारतीयांची मानसिकता याविषयी कशी बदलत गेली, हे आपण पाहूया. त्याचबरोबर नंतर आपण या बदललेल्या मानसिकतेमुळे ज्या लोकांना मानसिक आजार झाले, त्यांना होमियोपॅथीद्वारे कशी मदत करता येईल, त्याचाही आढावा घेऊया.


सर्वप्रथम ज्यावेळी कोरोनाचे संकट जगाबरोबरच भारतातही दाखल झाले, त्यावेळी या संसर्गजन्य रोगाची व्यापकता जनतेला ठावूकच नव्हती. त्याचप्रमाणे आपल्या राज्यकर्त्यांनाही या आजाराच्या गंभीरतेचा अंदाज आला नाही. त्यामुळे ज्यावेळी भारत सरकारने सर्वप्रथम ‘लॉकडाऊन’ व ‘जनता कर्फ्यू’ घोषित केला, त्यावेळी सुरुवातीला सर्व लोकांनी, अतिशय उत्साहाने यात भाग घेतला. कोरोनाचे संकट लवकरच निघून जाईल, अशी सर्वांची मानसिकता होती. सुरुवातीच्या १५ दिवसांत लोकांना घरीच राहणे, हे अतिशय सोयीचे व आनंदाचे वाटू लागले. कित्येक लोकांनी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या. जुने छंद जोपासले. या सर्व उत्साहाचे व आनंदाचे कारण हे एक सकारात्मक आशावाद हे होते. सकारात्मक आशावाद म्हणजे आपण लवकरच या साथीच्या आजारातून बाहेर पडू, अशी सर्वांची आशा होती. जागतिक पातळीवर कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असताना भारतात मात्र सुरुवातीला अतिशय कमी रुग्ण आढळून आल्यामुळे सर्व लोकांचा असाच समज होता की, १३६ कोटींच्या आपल्या लोकसंख्येत फक्त काही शेकड्याने रुग्ण आढळल्याने ही साथ भारतात टिकणार नाही. भारताच्या पंतप्रधानांनीसुद्धा सर्व जनतेला सुरुवातीला अतिशय सकारात्मक संदेश दिल्यामुळे सर्व भारतीय जनता बर्‍यापैकी आश्वस्थ होती.


म्हणजेच काय, तर सुरुवातीच्या काळात ज्यावेळी सरकारने २१ दिवसांचा ‘लॉकडाऊन’ जाहीर केला, तेव्हा भारतातील सर्वच पातळीवरील तसेच सर्व राज्यातील लोकांनी त्याचे जोरदार समर्थन करत स्वागतच केले. सर्व लोकांनी घरीच राहणे पसंत केले. आपण जो सकारात्मक आशावाद म्हणत होतो, त्या आशावादामुळेच सर्व लोक कुटुंबासाठी वेळ देऊ लागले. बाहेरील सर्व कामे बंद असल्याने जास्तीत जास्त वेळ हा कुटुंबाकरिता देता येऊ लागला. सर्वसामान्य लोकांमध्ये दिसणारा हा उत्साह सुरुवातीला पोलीस व सरकारी कर्मचार्‍यांमध्येसुद्धा दिसून आला. संचारबंदीच्या काळात सुरुवातीला पोलिसांनी अनेक लोकांना लाठीचा प्रसाद दिला. तसेच सरकारी कर्मचारी, महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी हे अतिशय उत्साहाने कामाला लागले. एखाद्या इमारतीत किंवा गृहनिर्माण संस्थेत (सोसायटीत) जर कोरोनाचा रुग्ण सापडला, तर त्यास लगेच इस्पितळात व नंतर विलगीकरण कक्षात ठेवले जात होते. इतकेच नव्हे, तर संपूर्ण इमारत वा सोसायटी ‘सील’ केली जात असे व कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई केली जात असे.


नोकरी किंवा व्यवसाय करणारे जे लोक आहेत, त्यांची नेहमीच तक्रार असायची की, आम्हाला कुटुंबासाठी व स्वतःसाठी वेळ देता येत नाही. कोरोनाच्या साथीमुळे अशा सर्व लोकांसाठी आयतीच संधी चालून आली व सर्व लोक सुरुवातीच्या काळात अतिशय खूश झाले. या मागील कारण असे होते की, सर्व लोकांना हे माहीत होते की, ही स्थिती अतिशय तात्पुरती आहे व काही दिवसांच्या सुट्टीनंतर परत सर्वांना पूर्वीच्या कामाला लागायचे आहे. त्यामुळे ही सुट्टी प्रथम ‘एन्जॉय’ करण्यात सुरुवातीचे काही दिवस गेले.


लोकांची ही मानसिकता नंतर फार काळ टिकली नाही, हे असे का घडले व लोकांच्या विचारांवर त्याचा कसा परिणाम झाला, हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.
(क्रमशः)

- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)


@@AUTHORINFO_V1@@