नाकर्त्या श्रेष्ठींमुळे दिशाहीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020
Total Views |


Shashi Tharoor_1 &nb


कार्यकर्त्यांना कोणताही ठोस कार्यक्रम देऊ न शकणार्‍या नाकर्त्या काँग्रेस श्रेष्ठींमुळे संपूर्ण पक्षच भरकटला असून कोणाचा पायपोस कोणात नाही, असा प्रकार झाल्याचे दिसते. शशी थरुर यांनी पक्षश्रेष्ठींच्या याच कामगिरीवर बोट ठेवले व काँग्रेस पक्ष दिशाहीन झाल्याचे म्हटले.


“काँग्रेस पक्ष भरकटला असून राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यास सक्षम नाही. काँग्रेस पक्षाची जनतेत निर्माण झालेली प्रतिमा सुधारणे आवश्यक आहे,” अशा शब्दांत तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला. तसेच पक्षाला लवकरात लवकर लोकशाही पद्धतीने पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची गरज असल्याची मागणीही थरुर यांनी केली. कोणत्याही देशातील सुदृढ लोकशाहीसाठी सत्तापक्षाबरोबरच सक्रिय विरोधी पक्षाचीदेखील गरज असते. कारण, सत्तापक्षाला पाठिंबा न देणार्‍यांचा आवाज कायदेमंडळापर्यंत पोहोचवण्याचे, सत्तापक्ष कुठे चुकत असेल तर ती चूक दाखवून देण्याचे आणि त्याला विरोध करण्याचे काम विरोधी पक्षच करत असतो. मात्र, स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ देशावर एकहाती राज्य केल्याने काँग्रेस पक्षाला अजूनही आपणच सत्तेत असल्याचे आणि विद्यमान केंद्र सरकारने आम्ही सांगू त्या पद्धतीनेच कारभार हाकावा, असे वाटते आणि यामुळेच तो पक्ष राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडू शकत नसल्याचे दिसते. दरम्यान, विरोधी पक्ष म्हणजे सत्तापक्षाच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्यापुरता अर्थ सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाने घेतलेला आहे. ‘काँग्रेस नेतृत्व’ म्हणजे ‘काँग्रेस श्रेष्ठी’ आणि ‘काँग्रेस श्रेष्ठी’ म्हणजेच गांधी घराण्याचे नाव लावणारी व्यक्ती. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा आताच्या घडीला ‘काँग्रेस श्रेष्ठी’ असून त्यांनी केवळ नरेंद्र मोदी सरकार व भाजपला बरे-वाईट बोलण्यालाच विरोधी पक्षाचे कर्तव्यकर्म मानले आहे. परिणामी, कार्यकर्त्यांना कोणताही ठोस कार्यक्रम देऊ न शकणार्‍या नाकर्त्या श्रेष्ठींमुळे संपूर्ण पक्षच भरकटला असून कोणाचा पायपोस कोणात नाही, असा प्रकार झाल्याचे दिसते. शशी थरुर यांनी पक्षश्रेष्ठींच्या याच कामगिरीवर बोट ठेवले व काँग्रेस पक्ष दिशाहीन झाल्याचे म्हटले.


 
काँग्रेस पक्षाची जनतेत निर्माण झालेली प्रतिमा सुधारण्याची आवश्यकता असल्याचे थरुर म्हणत असले तरी, त्यांच्या म्हणण्याने काहीही होणार नाही. देशातील जनतेलाच काँग्रेस पक्ष नको आहे नि त्याला कारण ठरले ते त्या पक्षाचे आतापर्यंतचे वर्तन. भ्रष्टाचार, लाचखोरी, आर्थिक अफरातफरीचे उद्योग तर काँग्रेसने अगदी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या सरकारपासून हयातभर केले. २००४ ते २०१४ पर्यंत त्यात वाढ झाली असेल आणि भ्रष्टाचारविरोधी जनमताने काँग्रेसला धक्का दिला असेल. मात्र, काँग्रेसची भ्रष्टाचारापेक्षाही अधिक वाईट प्रतिमा निर्माण झाली ती सर्व समाजाच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी त्या पक्षाच्या राष्ट्रघातकी व हिंदूंना डावलणार्‍या मुस्लीम तुष्टीकरण धोरणामुळे. अर्थात, हिंदूंच्या अस्मिता व प्रतीकांचा मानभंग करण्याचे कामदेखील काँग्रेसने सातत्याने केले, पण याची जाणीव हिंदूंनाच होत नव्हती. नंतर जसजसा हिंदू समाज जागृत झाला तसतसा काँग्रेसच्या हिंदूविरोधी कारवाया उजेडात आल्या आणि त्यातून काँग्रेसची बहुसंख्यविरोधी प्रतिमा तयार झाली. काँग्रेसच्या सत्ता काळात उभ्या केलेल्या हिंदू दहशतवादाच्या थोतांडाने त्या पक्षाचा र्‍हास केला. तसेच देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे काँग्रेस पंतप्रधानाचे सांगणे, अल्पसंख्याक समुदाय अत्याचारविरोधी कायद्याचा आग्रह, जम्मू-काश्मीरला लागू असलेल्या ‘कलम ३७०’चे समर्थन व दहशतवाद्यांप्रति आपुलकीची भावना बाळगणे आणि इतरही अनेक घटनांमुळे काँग्रेस देशवासियांना नकोशी झाली. आता ही प्रतिमा सुधारण्याची अजिबात शक्यता नाही, कारण गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसने ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चा प्रयोग करुन पाहिला, पण तो फसला. आताही अयोध्येतील श्रीराम मंदिराला पाठिंबा देत आहोत, असे दाखवून देण्याचे काम काँग्रेसने केले, पण त्याला जनसमर्थन न मिळता जनतेने काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे उद्योग पाहून लाथा घालण्याचेच काम केले. हीच काँग्रेसची जनमानसातली प्रतिमा आहे, त्यामुळे ती बदलणार नाही आणि शशी थरुर यांना प्रतिमा बदलायचीच असेल, तर बोलण्यापेक्षा कृती करुन दाखवावी. काँग्रेसने तसे काही केले, तर बदलली तर बदलू शकते त्या पक्षाची प्रतिमा.


 
पुढचा मुद्दा पूर्णवेळ अध्यक्षाचा. गेल्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तत्कालीन काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन विजनवास पत्करला. परिणामी, नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसला चालवण्यासाठी कोणीतरी ‘गांधी’ हवा म्हणून सोनिया गांधींना तात्पुरते किंवा हंगामी पक्षाध्यक्ष करण्यात आले. मात्र, त्यांचे वय व आजारपण पाहता त्या पक्षात प्राण फुंकण्यासाठी योग्य नव्हत्या आणि तसेच झाले. म्हणूनच आता परत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी मागणी थरुर वगैरेंकडून होत असल्याचे दिसते. शशी थरुर यांनी राहुल गांधी अध्यक्ष झाले तर उत्तम, असे म्हटले तर अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी अध्यक्ष झाले तर चांगलेच, पण त्यांना अध्यक्ष व्हायचे नसेल तर दुसर्‍या कोणाला तरी अध्यक्ष करावे, असे मत व्यक्त केले. मात्र, तसे काही होणार नाही. गांधी घराण्याव्यतिरिक्त अन्य कोणी अध्यक्ष झालेला काँग्रेस नेत्यांनाच मानवणारा नाही. कारण, ‘गांधी’ नावाच्या आड पक्षातील प्रत्येकाच्या उचापत्या खपून जातात, त्यांना आपापले गड सांभाळणे सोपे होऊन जाते. गांधीव्यतिरिक्त कोणी मोठा होऊ लागला की त्याला मागे खेचण्याचे काम त्याच पक्षातली मंडळी इमानेइतबारे करतात. म्हणूनच कोणी सोनिया गांधी तर कोणी राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, असे म्हणताना दिसते. यातूनच सोनिया गांधींची आताची परिस्थिती पाहता त्या नाही तर राहुल गांधी हाच पर्याय काँग्रेसपुढे उभा राहतो. पण, राहुल गांधी काँग्रेसाध्यक्षपदी येऊन करणार काय? कारण, राजकीय पक्षाचा अध्यक्ष अपयशाने खचून पळ काढणारा नव्हे, तर अपयश आले तरी जोपर्यंत यशस्वी होत नाही, तोपर्यंत झुंजणारा, कार्यकर्त्यांत प्रतिस्पर्धी पक्षाशी झगडण्याची मानसिक शक्ती जागवणारा, त्या शक्तीला प्रोत्साहन देणारा असावा, तसेच प्रतिस्पर्धी पक्षाला मात देऊ शकेल, इतके संघटन वाढवणाराही असावा लागतो. पण राहुल गांधींचा इतिहास पाहता, ते असे काही करु शकतील असे वाटत नाही. उलट काँग्रेसला आणखी रसातळाला घेऊन जाण्याचे कामच ते करत राहतील. अर्थात, काँग्रेसचीच तशी इच्छा असेल तर उत्तमच, निदान काँग्रेस गेल्यानंतर अन्य कोणी पर्यायी विरोधी पक्ष तरी पुढे येऊ शकेल.

 
@@AUTHORINFO_V1@@