अवघे रामरंगी रंगले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020   
Total Views |


Ram Janm Bhumi_1 &nb
 

राम मंदिराचे भूमिपूजन होत असताना काही विघ्नसंतोषी नेते आणि पक्ष यांनी विरोध करून पाहिला. पण, त्यांच्या विरोधास हिंदू समाजाने मुळीच धूप घातला नाही. प्रचंड उत्साहाने कोट्यवधी हिंदू त्या सोहळ्यात सहभागी झाले. समस्त विश्वातील रामभक्त त्या दिवशी रामरंगी रंगून गेले!



दि. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील रामजन्मभूमीवर आयोजित भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला आणि त्याद्वारे कोट्यवधी हिंदू समाजाने अयोध्येत रामजन्मस्थानी प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे राहिले जावे, असे जे स्वप्न उराशी बाळगले होते, त्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकले गेले. विश्वातील समस्त हिंदू समाजाच्या नजरा त्या दिवशी अयोध्येकडे लागल्या होत्या. त्या सोहळ्यात सहभागी होण्याची मनीषा लाखो रामभक्तांनी उराशी बाळगली होती. पण, कोरोना महामारीचा प्रकोप लक्षात घेऊन जे निर्बंध घालण्यात आले होते, त्यांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ध्यानात घेऊन आणि ती मर्यादा पाळून कोट्यवधी हिंदू समाज शरीराने नसला तरी मनाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झाला होता. त्या सोहळ्याच्या आधीपासूनच अयोध्यानगरी सजली होती. दीपज्योतींच्या प्रकाशाने शरयू नदीचा काठ उजळून गेला होता. समस्त अयोध्यानगरीच नव्हे, तर देशाच्या विविध भागातील मंदिरे रोषणाईने उजळली होती. सर्वत्र रामनामाचा जयघोष होत होता. अशा मंगलमय वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महंत नृत्यगोपाल दास यांच्यासह विविध भागांमधून आलेल्या संतमहंतांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. भव्य राम मंदिर उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले.

 
पण, या राम मंदिराचे भूमिपूजन होऊ नये म्हणून काहींनी विघ्ने आणण्याचाही प्रयत्न केला. सध्या कोरोना महामारीच्या प्रकोपाचा सामना देश करीत असताना आताच कशाला हे भूमिपूजन, असा अनाहुत सल्ला काहींनी दिला. भूमिपूजन करून कोरोना नाहीसा होणार आहे का, असे प्रश्न काही जाणत्या नेत्यांनी उपस्थित केले. काही नेत्यांनी ई-भूमिपूजन करावे, असे सुचविले. पण, एकीकडे कोरोना महामारीशी सामना करीत असतानाच सर्व मर्यादा लक्षात घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देशातील जनतेलाही त्याची पूर्ण कल्पना असल्याने असली बाष्कळ बडबड करणार्‍यांकडे रामभक्तांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्राथमिक अंदाजानुसार, जगभरातील १८ कोटी रामभक्तांनी दूरचित्रवाहिन्यांवरून हा सर्व सोहळा डोळ्यांमध्ये साठवून ठेवला. आपण तनाने नसलो तरी मनाने या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचा आनंद प्रत्येक रामभक्ताच्या चेहर्‍यावर दिसत होता. रामजन्मस्थानी पुन्हा प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे राहावे यासाठी हिंदू समाजाने कित्येक शतके जो संघर्ष केला, असंख्य रामभक्तांनी जे बलिदान दिले त्यातून हे राम मंदिर निर्माण होणार असल्याचा कृतज्ञतेचा भाव सर्वांचा मनामध्ये होता. त्यामुळे हिंदू समाज या सोहळ्यात कोट्यवधींच्या संख्येने तनाने नसला तरी मनाने सहभागी झाला होता.
 
काही नेत्यांनी या सोहळ्यासाठी जो मुहूर्त काढण्यात आला, त्यावरून रामभक्तांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आघाडीवर होते ते काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह. आषाढी वारीच्या वेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी धावणारे आणि नर्मदा परिक्रमा करून पुण्य पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्या मनात असा पापी विचार कसा आला ते समजत नाही! संघ परिवाराने एखादा उपक्रम हाती घेतला की त्यास विरोध करायचा, असा ज्यांनी निर्धार केला त्यांच्याकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार! माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे त्यातल्या त्यात शहाणे ठरले! भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण हनुमानचालिसा पठण करणार असल्याचे घोषित करून अप्रत्यक्षपणे राम मंदिर भूमिपूजनास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी मान्य करून टाकले. राम मंदिराच्या बाजूने संपूर्ण देश उभा असल्याचे लक्षात घेऊन नंतर बहुतांश राजकीय पक्ष आणि नेत्यांनी राम मंदिर उभारण्यास आपला पाठिंबा देऊ केला. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर पक्ष कार्यालयात कार्यक्रमांचे आयोजन केले! याला ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणता येईल. हे आधीच केले असते तर जनतेने तुमच्या कृतीचे कौतुकच केले असते ना!
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनास जाऊ नये, अशी कोल्हेकुई मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमनचे नेते ओवेसी यांनी करून पाहिली. पण, ही कोल्हेकुई रामनामाच्या आणि ‘जय श्रीराम’च्या प्रचंड जयघोषात कोणाच्या कानावरच पडली नाही. देशामध्ये जे वातावरण निर्माण झाले, त्यामुळे देशाच्या ‘सेक्युलर’ चौकटीस धक्का पोहोचला, अशी हाकाटी साम्यवादी पक्षांकडून आधीपासूनच केली जात आहे . केरळचे मुख्यमंत्री आणि साम्यवादी नेते पिनराई विजयन यांनी तर काँग्रेसने ‘सेक्युलरिझमबाबत स्पष्ट भूमिका घेतली असती तर देशाचे चित्र वेगळे दिसले असते,’ असे सांगून सर्व खापर काँग्रेसच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला. पण, या साम्यवाद्यांचे कान अमेरिकेतील एक विचारवंत डेव्हिड फ्रावली यांनी चांगलेच टोचले आहेत. भारतातील साम्यवाद्यांनी अयोध्या यात्रा करावी, भारताच्या महान संस्कृतीचा आणि आध्यात्मिक परंपरांचा ‘बारकाईने सखोल अभ्यास’ करावा, असा सल्ला त्यांनी साम्यवाद्यांना दिला आहे. या साम्यवाद्यांनी भारताचा इतिहास विकृतपणे मांडला आहे. तसेच हिंदू समाज आणि त्यांच्या परंपरा यांची माध्यमांचा वापर करून पुरेपूर बदनामी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. साम्यवाद्यांनी तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण अभ्यासावे, तसेच भारताची महान संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरा जाणून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
 
राम मंदिराचे भूमिपूजन होत असताना काही विघ्नसंतोषी नेते आणि पक्ष यांनी विरोध करून पहिला. पण, त्यांच्या विरोधास हिंदू समाजाने मुळीच धूप घातला नाही. प्रचंड उत्साहाने कोट्यवधी हिंदू त्या सोहळ्यात सहभागी झाले. समस्त विश्वातील रामभक्त त्या दिवशी रामरंगी रंगून गेले!
 
  
चीनची दादागिरी!


 
In Article_1  H
 
 
 
 
चीन आपल्या विस्तारवादी भूमिकेमुळे जगातील विविध देशांची नाराजी ओढवून घेत आहेच. भारताचा भूभाग गिळंकृत करण्याचा त्या देशाचा प्रयत्न सुरु असल्याचा अनुभव आपण घेत आहोतच. अशी भूमिका घेणार्‍या चीनला आपल्यावर किंवा आपल्या नेत्यावर कोणी टीका केल्याचे सहन होत नसल्याचे अलीकडील एका घटनेवरून दिसून आले आहे. ‘स्ट्रॅटन्यूज’ नावाचे एक पोर्टल नितीन गोखले नावाची व्यक्ती चालविते. नितीन गोखले हे त्या पोर्टलचे प्रमुख संपादक आहेत. त्यांनी आपल्या पोर्टलवर चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांची जर्मनीचा दिवंगत हुकूमशहा हिटलर याच्याशी तुलना करणारी एक चित्रफीत टाकली. या चित्रफितीमध्ये शी जिनपिंग यांची तुलना हिटलरबरोबर केल्याचे पाहून चीनला राग आला. चीनच्या भारतातील दुतावासाने त्या पोर्टलशी संपर्क साधला आणि सदर चित्रफीत मागे घेण्यात यावी आणि मागे न घेतल्यास गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, अशी धमकी त्या पोर्टलच्या संपादकांना दिली. संबंधित पोर्टलने सात मिनिटांची ही चित्रफीत १ ऑगस्ट रोजी अपलोड केली होती. हिटलरने जसे आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी जगाला विश्वयुद्धात लोटले, तसेच वर्तन चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून घडत असल्याचा उल्लेख त्या चित्रफितीत करण्यात आला आहे.


ही चित्रफीत अपलोड झाल्यानंतर दोन दिवसांतच नवी दिल्लीतील चिनी दुतावासाच्या प्रवक्त्या जी राँग यांनी त्या पोर्टलशी संपर्क साधला. सदर चित्रफीत मागे घेण्यास जी राँग यांनी संपादकांना सांगितले. चित्रफीत मागे न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही त्यांनी दिली. मात्र, गोखले यांनी तसे करण्यास नकार दिला. आपण आपले निषेधाचे पत्र वा स्पष्टीकरण द्यावे. ते जसेच्या तसे प्रसिद्ध करू, असे त्यांनी चीनच्या प्रवक्त्यास सांगितले. पण, चित्रफीत मागे घेणे हा त्यावरचा पर्याय ठरू शकत नसल्याचे स्पष्टीकरण गोखले यांनी त्यांना दिले. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चीनने त्यांना पत्र पाठवून आपल्या धमकीचा पुनरुच्चार केला. चिनी दुतावासाने दिलेल्या या धमकीची माहिती गोखले यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर दिली आहे. तसेच आपण सदर चित्रफीत मागे घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या देशातील माध्यमांवर वचक प्रस्थापित केलेल्या चीनची अरेरावी खपवून न घेण्याचा तडफदारपणा त्या पोर्टलच्या संपादकांनी दाखविला याबद्दल त्यांचे नक्कीच कौतुक करायला हवे! चीनने दादागिरीची भाषा वापरायची ती आपल्या देशात, भारतात अशी दमबाजी चालणार नाही, हेच त्या पोर्टलने दाखवून दिले आहे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@