अंधारातून प्रकाशाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020   
Total Views |

 


Shankar Patole_1 &nb

 

 

शंकर पाटोळे. प्रशासनातील एक संवेदनशील मानवी चेहरा. समाजासाठी अहोरात्र झटणारे, प्रशासनातील कामगिरी निष्ठेने पार पाडणार्‍या या जबाबदार व्यक्तिमत्त्वाविषयी...

 

 


शंकर पाटोळे, ठाण्याचे साहाय्यक आयुक्त. ठाणे शहराच्या पाणी, घनकचरा व्यवस्थापन ते इतर महत्त्वाच्या कामांची जबाबदारी त्यांच्यावर. सध्या कोरोनाच्या काळात त्यांच्यावर आणखीन एक जबाबदारी आली. ठाण्यातील कोविड रुग्णालयांची आणि कोरोना रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था. ते ठाणे शहरातील प्रत्येक वंचित-शोषित गरजूंबरोबरच, सर्वच स्तरातील लोकांना आपले स्नेहीच वाटतात. त्याला कारणंही तशीच आहेत म्हणा. कोरोना काळातली गोष्ट. एका रूग्णाला घेऊन त्याचा मुलगा दवाखान्याच्या बाहेर उभा होता. दवाखान्यात नव्या रुग्णांसाठी जागाच नव्हती. रुग्णाची आर्थिक परिस्थिती अतिशय विपन्नतेची. महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याला प्रवेश मिळणे गरजेचे. त्याने खूप प्रयत्नाअंती शंकर पाटोळेंचा संपर्क क्रमांक मिळवला. शंकर एका महत्त्वाच्या बैठकीत होते. पण, त्या गृहस्थांची व्यथा त्यांनी शांतपणे ऐकून घेतली. बैठक संपल्या संपल्या त्यांनी त्या रुग्णासंबंधी कारवाई करायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्या रुग्णाची व्यवस्था झाली. यावर त्या रुग्णाचा मुलगा शंकर पाटोळेंच्या अक्षरश: पाया पडू लागला. शंकर पाटोळे म्हणाले, “आपण सगळे एकच. आर्थिक परिस्थितीच्या चटक्यांनी कुणीच होरपळू नये, असे मला वाटते आणि मी जे काही केले ते माझे कर्तव्यच होते.” ठाणे शहरातील सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत यांचे विचारांचे देवाणघेवाण करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे शंकर होत. जेव्हा कार्यकर्ते पोटतिडकीने जातीयता, विद्रोह वगैरेची भाषा करतात, त्यावेळी शंकर त्याला म्हणतात, “बाबा रे, द्वेष किंवा तणाव वाढवून समाजाची कामे होणार नाहीत. आपण जातपात विसरून एकोप्याने मिळून काम केले, तरच समाजाचा विकास होईल. भांडणतंटा करून समाज विभागेल आणि आपलेच नुकसान होईल.”
 

पालिकेत साहाय्यक आयुक्त म्हणून काम करताना ते सामाजिक भानही जपत आहेत. या सामाजिक संवेदनशीलतेच्या मागे काय असेल? तर, ते दृश्य डोळ्यापुढे येते. शंकर लहान होते. आई त्यांना दररोज बाजारात घेऊन जायची. त्यावेळी शंकर दररोज आईला प्रश्न विचारायचे, “आई, लोक बघ किती किती किलो धान्य घेतात अन् आपण का गं एक एक किलू ज्वारी दररोज घेतो. ते पण एका बाजूला उभं राहून?” त्यावेळी राजूबाई डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाल्या, “लेका आपल्याकडं इतकं पैसं नाहीत की आठ दिसांच धान्य घेऊ.” मग यावर शंकर म्हणायचे, “मग आपल्याकडं पैसे कधी येतील?” यावर राजूबाईंच्या चेहर्‍यावर एक चमक येई. त्या म्हणत, “शंकर, तू शिकून खूप मोठा साहेब झालंस की आपल्याकडं खूप पैसं येतील, मग आपण आठ दिसांच धान्य एकदाच घेऊ. दररोज तुझा बाप कधी येतू आणि मजुरीचे पैसे कधी देतो, मंग कधी बाजारात जातो अन् धान्य आणून जेवण बनवतो, हे असलं काहीबी वाट बगावी लागणार नाय.” शंकर यांनी मनात ठरवलं, आपण शिकायचं आणि ‘साहेब’ व्हायचचं. आईने शंकर यांना सांगितलेले की, “तुला आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो, ती परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी तू शिकायचे आहेस.” त्यामुळे शंकरने लहानपणापासूनच निश्चय केला तो महाविद्यालयात काम करण्याचा. 
 
सोलापूरच्या रावजी पाटोळे आणि राजू पाटोळे या दाम्पत्याला एकूण १३ मुले. त्यापैकी एक शंकर. रावजी गावात छोटी-मोठी मेस्त्री कामे करत. मजुरीमध्ये कधी पैसे मिळत, तर कधी रिकाम्या हाताने घरी यावे लागे. घरात पोराबाळांचे लेंढार. कसं होणार, याची सगळी चिंता राजूबाईंना. त्या पहाटे ४ वाजता उठत. जवळच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरात जात. पहिली काकड आरती त्यांनी कधी चुकवली नाही. धार्मिक पारायण, सत्संग, अभंग, कीर्तन ऐकण्यासाठी त्या वेळात वेळ काढून जायच्याच. त्या शंकर यांना सांगायच्या की, “आपल्याला खायला मिळत नाही म्हणून दुसर्‍याचे हिसकवायचे नाही आणि चोरायचेही नाही, भगंवत म्हणतात हेही दिवस जातील, कष्ट करा, सत्याला सोडू नका, माणूसपण विसरू नका, त्यातच देव आहे.”
 
या असल्या वातावरणात शंकर वाढत होते. अत्यंत गरिबीत, हलाखीत, ‘नाही रे’ परिस्थितीमध्ये शिक्षण घेत शंकर यांनी पदवीनंतर समाजशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यावेळी ‘एमपीएसी’ची सरळ सेवाभरती निघाली. त्या परीक्षेत शंकर उत्तीर्ण झाले. ‘उपसमाज अधिकारी’ म्हणून ठाणे शहरात सरकारी नोकरी मिळाली व घरही मिळाले, गाडीही मिळाली. आईची तपस्या पूर्णत्वास आली. शंकर आजही आईचे कष्ट, समाजाची स्थिती आणि प्रश्न विसरलेले नाहीत. ते म्हणतात, “मला एका समाजासाठी नाही, तर सर्वच समाजांसाठी काम करायचे आहे, तेही शैक्षणिक क्षेत्रात.” गरजू, हुशार विद्यार्थ्यांना मदत करताना शंकर पाटोळे नेहमीच पुढे असतात. ते स्वत:च्या आयुष्याबद्दल म्हणतात, “माझे आयुष्य म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आहे, समाजासाठी आणि देशासाठीही.”
 
 

 

@@AUTHORINFO_V1@@