लोकमान्य टिळकांचे प्राच्यविद्या संशोधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2020
Total Views |


Lokmanya Tilak_1 &nb



असामान्य व्यक्तिमत्व, इंग्रजांनी ज्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले, ज्यांनी बलाढ्य इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढा उभारून तीन वेळा तुरुंगवास भोगला आणि तुरुंगवासांदरम्यान विद्वत्तापूर्ण आणि मूलभूत विचार मांडणारे ग्रंथ लिहिले, त्या लोकमान्य टिळकांच्या शतवार्षिक पुण्यस्मरण वर्षात त्यांच्या प्राच्यविद्या क्षेत्रातील संशोधनाचा आढावा घेऊन आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. हा लेख माझ्या The Orion, The Arctic Home, Archaeology, the Indus Cultureand Antiquity of the Vedas (पृ १ते ६५) या विस्तृत लेखाचा संक्षेप आहे.



प्राच्यविद्या-Indology, भारताच्या बुद्धपूर्व काळातील सांस्कृतिक संशोधनाच्या क्षेत्रात लो. टिळकांचे गुरू असलेले प्रा. भांडारकरांच्या बरोबर इतरही विद्वान होते. पण, टिळकांचे वैशिष्ट्य असे की, राजकारण आणि समाजकारण यांच्या धकाधकीतून वेळ काढून त्यांनी वैदिक वाङ्मयाचा आणि त्याची उपांगे असलेल्या भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्मशास्त्र, खगोलशास्त्र अशा विषयांचा सखोल अभ्यास करून काही नवे संशोधन केले, जे अजोड ठरले. ‘गीतारहस्य’ हा त्यांच्या जीवनाचे जणू सार सांगणारा प्राच्यविद्येत येणारा, पण तत्वज्ञानात्मक ग्रंथ आहे. तत्पूर्वी त्यांनी १८९३ मध्ये वैदिक काळ ठरविणारा The Orion (TO) - मृगारंभ (मृगशीर्षातील वर्षारंभ) असे ज्याचे शीर्षक देता येईल, हा बृहत निबंध एका चर्चासत्रासाठी पाठविला. तो नंतर प्रसिद्ध केला. दहा वर्षांनी म्हणजे १९०३ साली ’The Arctic Home in the Vedas' - ‘आर्यांचे मूलस्थान -(आमू)’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यातील वर्ण्यविषय संक्षेपात द्यायचा झाला तर, वेद वाङ्मयातील संदर्भांवरून आर्क्टिक आणि उत्तर ध्रुव परिसरातील आर्यांच्या मूलस्थानाचा शोध, असे करता येईल. मंडालेच्या तुरुंगवासात असताना ‘गीतारहस्या’बरोबरच त्यांनी वेदांगज्योतिष, सांख्यकारिका आणि मध्य पूर्वेतील खाल्डिया परिसरात उत्खनित झालेल्या साहित्याची वैदिक साहित्याशी सांगड घालणारा मोठा निबंध इत्यादी लिहिले. त्या सर्वांचे संकलित पुस्तक त्यांच्या स्वर्गवासानंतर १९२५ साली प्रसिद्ध झाले. त्यातील संशोधनाला सर्वमान्यता मिळाली नसली तरी त्यांनी प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात नवी दालने उघडली, हे महत्त्वाचे ठरते.


‘मृगारंभ’ मधील संशोधन


लोकमान्यांचा भगवद्गीतेचा गाढा अभ्यास होता. त्यातील एका - ‘मासानांमार्गशीर्षोSहम्’ निर्देशावरून त्यांनी वैदिक साहित्याचा काळ ठरविला. लोकमान्यांचे वैशिष्ट्य असे की, वेद अनादी-अनंत आहेत, अशी धारणा असणार्‍या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात त्यांनी भौतिक स्तरावरून खगोल गणिताद्वारे ‘वेदसंहिता’ आणि ‘शतपथब्राह्मणा’सारख्या प्राचीन ग्रंथामधील काही भागांचा काल निश्चित केला. ‘वेदसंहिता’ अथवा ‘ब्राह्मणग्रंथ’ हे काही एकटाकी उतरलेले साहित्य नव्हे. पण, त्यात जे नक्षत्रांच्या निरीक्षणांना धरून वर्षारंभ आणि यज्ञारंभाचे उल्लेख आहेत, त्यावरून त्यांनी कालनिश्चिती केली. प्राचीन काळापासून वर्षारंभ हा वसंतागमनाने सुरू होतो आहे. आताच्या २०२० साली चैत्र शु. प्रतिपदा, वसंतारंभ-वसंतसंपात (vernal equinox) आणि वर्षारंभ हा २५ मार्चला होता. भगवद्गीतेतील उल्लेखाप्रमाणे तो मार्गशीर्षात होता. या वर्षी मार्गशीर्ष प्रतिपदा डिसेंबर १५ ला आहे. हे पृथ्वीच्या तिरप्या अक्षभ्रमणामुळे होत असलेल्या अयन चलनामुळे (Recession of equinox) घडते. दर ७२ वर्षांनी १ दिवस याप्रमाणे ऋतुचक्र पुढे सरकते. १५ डिसेंबर ते २५ मार्च हा या वर्षीचा बरोबर १०० दिवसांचा काळ जसाच्यातसा धरला तरी महाभारत युद्धकाळ ७२०० वर्षे मागे जातो. अर्थात, येणारे अधिक मास, लिपवर्षे, नक्षत्र गणना इ. मुळे ते कालनिर्णयाचे गणित सोपे राहात नाही. ते काही शतकांच्या अंतराचे असते. टिळकांनी वैदिक वाङ्मयातील असे उल्लेख शोधून त्या आधारे वैदिक वाङ्मयाच्या कालनिर्णयाचे चार भाग निश्चित केले.


१. मृगशीर्षारंभापूर्वीचा अदिती काळ इ. स. पूर्व ६००० ते ४००० वर्षे. या काळात वसंतसंपात पुनर्वसु नक्षत्रात होता.


२. मृगशीर्षारंभ काळ इ. स. पूर्व ४००० ते २५०० वर्षे. या काळात वसंतसंपात आर्द्रा नक्षत्रात होता.


३. कृत्तिकारंभ काळ इ. स. पूर्व २५०० ते १४०० वर्षे. या काळात वसंतसंपात कृत्तिका नक्षत्रात होता. कृष्ण यजुर्वेद किंवा तैत्तिरीय संहितेचा काळ.


४. बुद्धपूर्व काळ इ. स. पूर्व १४०० ते ५०० वर्षे. या काळात वसंतसंपात अश्विनी नक्षत्रात होता.

 
लोकमान्य टिळकांनी वरील कालमापने दिली, त्याच सुमारास हर्मन जॅकोबी यानेही समांतर संशोधन करून त्याच दरम्यानची कालनिश्चिती केली. भारतात ही खगोल गणिती, शं. बा. दीक्षित आणि व्यं. बा. केतकारांनी वैदिक खगोलीय संदर्भांद्वारे त्याला बळकटी दिली. हे संशोधन कितीतरी पाश्चात्यांच्या आणि त्यांची री ओढणार्‍या भारतीय संशोधकांच्या पचनी पडले नव्हते आणि अजूनही पडत नाही. टिळकांच्या कालनिर्णयाच्या संशोधनाला पुरातत्वीय बळकटी देणारे संशोधन या लेखात पुढे येईल. सुप्रसिद्ध गणिती आणि वैश्विकशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकरांचा अभिप्राय (Science Age - Oct १९८३)
 

If Tilak's arguments are correct, the Vedas must be considerably older than the indications so far from other age determining criteria. Tilak's method itself cannot be faulted so far as its astronomical aspects are concerned. Its possible weakness lies in interpreting the Vedic statements which (to us) sound very cryptic. Nevertheless, no one who has read "The Orion' can fail to be impressed by the deductive power of the author and the ingenious way he has used the astronomical clock to throw light on important mystery,'' असा आहे. यावर अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही.


आर्यांचे मूलस्थान


यात लोकमान्य टिळकांच्या वैदिक वाङ्मय आणि प्राचीन संस्कृत साहित्याच्या चौफेर ज्ञानाचे, प्रकांड पांडित्याचे आणि तर्कबुद्धीचे दर्शन होते. मृगारंभ लिखाण करतानाच त्यांची आर्यांचे मूलस्थान आर्क्टिक-उत्तर ध्रुव प्रदेश असावे अटकळ होती. त्यांनी विविधांगांनी अभ्यास करून दहा वर्षांनी ते ग्रंथरूपात मांडले. लो. टिळक डॉ. वारेन यांच्या ’Paradise found or the Cradle of the Human Race at the North Pole' या ग्रंथातील निष्कर्ष नोंदविताना ''the original home of the whole human race must be sought for in the regions near the North Pole.'' (पृ.६) ते अशी सहमती दर्शवितात. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी, उत्तर ध्रुवावरील वातावरण, दीर्घ दिनमान आणि रात्री कालांची माहिती, वेदसंहितांपासून ते महाभारत, पुराणे आणि थेट भास्कराचार्याच्या गोलाध्यायापर्यंतचे संदर्भ विचारात घेतले आहेत. आर्यांच्या आगमनाचा मागोवा घेताना पारशी धर्मग्रंथ ‘अवेस्त’चा संदर्भ, इंडो-इराणी आणि इंडो-युरोपीय भाषांमधून झालेल्या शब्द परिवर्तनांची माहिती दिली आहे. या सर्वांचा संक्षेप दिला तरी मोठा होईल. टिळकांचे निष्कर्ष त्यावेळी गाजले असले, तरी सर्वमान्य झाले नाहीत. अनेक पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांनी त्यांच्या निष्कर्षांचा प्रतिवाद केला, तर फार थोड्यांनी पाठिंबा दिला. अबिनास चंद्र दास यांनी ’Rigvedic India' (पृ. ६२८, प्रसिद्ध १९२१) आणि ’Rigvedc Culture' (पृ. ५६५, प्रसिद्ध १९२५) या दोन ग्रंथांद्वारे अगदी प्रकरणांना प्रत्युत्तर प्रकरणे लिहून खंडन केले आहे. टिळकांचे खंडन करणारे लिखाण आता आतापर्यंत चालले आहे. ते विविध विद्याशाखांना धरून होते आहे, हे विशेष.
 

प्रतिवादाचे मुद्दे


येथे आर्यांचे मूलस्थान प्रतिवादाचे तीन ठळक मुद्दे नोंदवितो. मानवजातीच्या मूलस्थानाचा लंबक गेल्या सुमारे सव्वाशे वर्षांत उत्तर ध्रुवापासून तो रेणुसूत्रांच्या आधुनिक संशोधनाच्या आधारे आफ्रिकेतील आदीमाता एल्सापर्यंत हलला आहे. १९८०च्या दशकात भारतात सापडलेल्या आदीमानव आणि महाकाय प्राण्यांच्या अवशेषांना धरून मानवाचे मूलस्थान हिमालय असण्याची शक्यता वर्तविली गेली. त्यामुळे उत्तर ध्रुवाचे गृहित वैज्ञानिक कसोटीवर उतरले नाही. जर आर्य टिळकांनी दिलेल्या कारणांमुळे स्थलांतरित झाले असतील, तर त्याच सुमारास अमेरिकेतील आदीमजनसमूह (Native Tribes) शुष्क असलेल्या बेरींग खाडी-अलास्का मार्गाने अमेरिकेत शिरून थेट दक्षिण धु्रवापर्यंत पसरले. त्याच कालापासून तेथे स्थिर असलेले एस्किमो-इनुइट लोक यांच्यात काहीतरी समान धागा असायला पाहिजे, असे वाटून मी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या प्रतिपादनांतील विसंगती आढळल्या. इनुइट लोकांच्या संस्कृतीत ‘सूर्य’ ही स्त्री देवता आहे, तर भारतापासून तो थेट स्कॅन्डेनेवियातील इंडो-युरोपिय संस्कृतीपर्यंत ‘सूर्य’ ही पुरुष देवता आहे. या महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना छेद देणार्‍या आहेत. उत्तर ध्रुव प्रदेशात चाकाचा वापर नव्हता. तिथून स्थलांतरित झालेल्या अमेरिकेतील आदीम जनजातींनाही हजारो वर्षे चाक आणि त्याला धरून वाहनाची साधने अज्ञात होती. मात्र, टिळकांनी आरे आणि दोन चाकांना जोडणार्‍या आसाची उपमा थेट उत्तर ध्रुव प्रदेशातील आकाश-पृथ्वीला जोडून लावली. त्यामुळे ऋतुचक्र, दीर्घ उष:काल इत्यादींना धरून केलेले त्यांचे प्रतिपादन असंयुक्तिक ठरते.
 

तिसरा महत्त्वाचा मुद्दा ऋग्वेदातील वृत्रासुर वधकथा आहे. ती घटना उत्तर ध्रुवीय आहे, हे टिळकांनी सचित्र प्रतिपादन केले आहे. त्याच्याशी संबंधित अनेक ऋचांचा संदर्भ देतांना त्यांनी विश्वामित्र-नदी संवाद सूक्त पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहे. त्या सूक्तावरून असे स्पष्टपणे दिसते की, वृत्रवधाची घटना आधुनिक सतलज-बियास नद्यांच्या प्रदेशात घडली. वृत्रवधकथा हा माझ्या संशोधनाचा प्रमुख विषय आहे. त्यावरील ’Vedic Entities and Identities' (VEI), (Oriental Institute, Vadodara, २०१२) या माझ्या पुस्तकात सविस्तर चर्चा केल्याप्रमाणे वृत्राचा वध घटना भूपृष्ठचालनामुळे निर्माण झालेल्या भुसभुशीत बांधाशी निगडित असून पंजाब आणि सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात घडली, असे मी साधार सिद्ध केले आहे. हे उत्तर ध्रुवीय संकल्पनेशी अगदी विसंगत आहे. त्याचबरोबर वृत्राची हत्या करणारा म्हणून इंद्राचे जे ‘वृत्रहन्-वृत्रघ्न’ हे नाव पडले, ते वृत्रवधकथेच्या अनुषंगाने इराण मार्गे थेट आर्मेनियापर्यंत वृत्रघ्न ते वेरेत्रघ्न ते वाहग्न’ असे कसे बदलत गेले, हे मी दर्शविले आहे. तसाच बदल ‘अहि दास’ ते ‘अझी दाह’ ते ‘अझो दाह’ या ‘अहि दास’ वृत्राच्या नावात घडला - ‘वाहग्न’ (इंद्र) महाकाय भुजङाला मारत असण्याचा पुतळा आजही आर्मेनियाच्या येरेवान शहरात आहे. तो वाचकांना महाजालावर पाहता येईल.


यजुर्वेदाच्या रुद्राध्यायात रुद्राची नावेपशुपति-शर्व आहेत. तीही पशुपति संकल्पनेसह इराण ते युरोपपर्यंत शर्व ते सौर्व ते सर्नुन्नोज (Cernunnos) अशी बदलत गेली. प्राण्यांनी वेढलेल्या पशुपति सर्नुन्नोजचे चित्रही महाजालावर मिळेल. हे पाहता, अनेक वैदिक संकल्पनांचा प्रवास भारतातून इराणमार्गे युरोपपर्यंत झाल्याचे मी सिद्ध केले आहे.


 
आर्य आक्रमण आणि सिंधू संस्कृती
 


उत्तरेकडून आलेल्या आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृती नष्ट केली, ही संकल्पना अनेक पाश्चात्य आणि भारतीय इतिहासकारांनी हिरीरीने मांडली. सिंधू संस्कृती उत्खननात सुमारे २५०० सिंधू मुद्रा मिळाल्या आहेत. जर वेद वाङ्मय सिंधू मुद्रा आणि सिंधू संस्कृतीशी जोडले गेले, तर आर्य आक्रमण सिद्धांतालील हवाच निघून जाते. नेमकी त्याचीच माझ्यात ’VEI' या पुस्तकात चर्चा केली आहे. त्यातील दोनच मुद्रांची इथे चर्चा देतो.
 

पशुपति मुद्रा-पशुपति सूक्ताचे चित्रांकन



sfda_1  H x W:  
 
 
पशुपति सिंधू मुद्रेत केंद्रस्थानी योगासनात उंच आसनावर बसलेल्या पशुपतिच्या सभोवती पाळीव तसेच हिंस्त्र जनावरे आहेत. योगासनात बसलेल्या आणि निरनिराळ्या प्राण्यांनी वेढलेल्या अनेक पशुपति मुद्रा मिळाल्या आहेत. त्यावरून पशुपति हा सिंधू संस्कृती कालात महत्त्वाचा देव होता, असे दिसते. अथर्ववेद काण्ड ३ सूक्त ३४चा देव पशुपति हाच आहे. त्याचे वर्णन त्या सूक्तात केले आहे. हे सूक्त यज्ञ पशुबळी देण्यासाठी नेताना म्हणत असत. हा ईश्वर पशुपति चतुष्पाद आणि द्विपादांचा, तसेच पाळीव आणि वन्य प्राण्यांचा स्वामी आहे. मुद्रेवर प्राणी आणि द्विपाद मनुष्याकृती आहे. दुसर्‍या काही मुद्रांवर (द्विपाद) पक्षी आहेत. प्रस्तुत लेखकाच्या मते, मुद्रेच्या तुटलेल्या भागावर पक्षी आणि सरपटणारा प्राणी असावेत. कारण, इतर मुद्रांवर ते आहेत. त्यामुळे पशुपति बिरूदाची पूर्तता होते.

पशुपति आपल्या निर्मितीकडे मनसा-चक्षुषा-मन आणि दृष्टीने पाहतो. असे पाहणे केवळ योगदृष्टीतून शक्य आहे. पशुपति योगस्थितीत आहे. उच्चासनारूढ पशुपति विश्वोत्पत्तीकर्ता आहे. मुद्रेवरील पशुपति हा उत्थितलिंग आणि त्याच्या समोर तळवे योनीसदृश जोडलेले आहेत. त्यातून निर्मितीची संकल्पना दर्शविली आहे. सर्व प्राणी स्वर्गगामी - स्वर्गाच्या दिशेने निघाले आहेत. एक हत्ती सोडला, तर इतर सर्व प्राणी पशुपतिच्याकडे म्हणजे स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यज्ञबळी हा स्वर्गाला जातो, अशी धारणा होती. अथर्ववेद सूक्तातील मजकूराचे तंतोतंत चित्रीकरण पशुपति मुद्रेवर दिसते. सूक्ताचा मजकूर वर्तमानकाळात आहे. त्यावरून निष्कर्ष काढता येतो की, सिंधू संस्कृती आणि वैदिक साहित्य एकाच सांस्कृतिक सहअस्तित्वात होते. सिंधू मुद्रांमध्ये सुमारे ४० प्रतिशत, सुमारे ११०० मुद्रांवर वशिंड नसलेल्या आणि समोर उंच आडणीवरील सच्छिद्र भांडे असलेल्या वृषभाचे चित्र आहे. त्याला पहिल्यापासून चुकीने ‘एकश्रृंग’ (Unicorn) म्हटले गेले. मी दाखविल्याप्रमाणे तो वृषभ असून अथर्ववेदातील एकवृष (Unique Bull) देव आहे. अथर्ववेदात एकवृष देवाची दोन सूक्ते, ५.१६ आणि ६.८२ आहेत. सिंधू मुद्रांचे तज्ज्ञ आणि सिंधू मुद्रालिपी कोशकार इरावथम महादेवन यांच्या मते, “एकवृषासमोर जे पात्र आहे, ते सोमरस गाळण्याचे पात्र आहे. देवराज इंद्राला सोमरसाची आहुती प्राधान्याने देत असत. राज्याभिषेक करताना राजाने सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ व्हावे ‘त्वं एकवृषो भव’ असे आशीर्वादपर पालुपद अथर्ववेद ६.८६ मध्ये आहे.” वैदिक वाङ्मयात इंद्रादी देवांना बलशाली वृषभाची उपमा दिली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता, एक वृषमुद्रा या राजमुद्रा आहेत आणि म्हणूनच त्या समृद्ध सिंधू संस्कृती अवशेषांत शेकडोंच्या संख्येने जर त्या मिळल्या नसत्या तरच नवल ठरते.
 
 
aser_1  H x W:
 

त्या राजपुरुष निदर्शक आहेत, हे इतर काही मुद्रा सिद्ध करतात. त्यापैकी एका मुद्रेवर एक वृषाला तीन तोंडे दाखविली आहेत. ते सूक्त अथर्ववेद ५.१६चे चित्रीकरण आहे. त्या सूक्तात राजपुरुषाने एका पासून चढत्या क्रमाने दहा वृषभांचे सामर्थ्य मिळवावे, असे आशीर्वाद आहेत. एका वृषभाच्या धडाला तीन किंवा अधिक तोंडे काढून ते चित्रित केले आहे.
 
 

as_1  H x W: 0  
 

काही अधिक सिंधू मुद्रांवरील चित्रांचा असा उलगडा वैदिक सूक्तांद्वारे होऊ शकतो. ही सर्व सूक्ते वर्तमानकाळवाचक क्रियापदांची आहेत. त्यवरून वैदिक साहित्य आणि सिंधू संस्कृतीची अभिन्नता सिद्ध होते. सिंधू लिपीचा उलगडा जरी आतापर्यंत होऊ शकलेला नसला, तरी चित्रीकरणावर अधिक संशोधन करून सिंधू लिपी उलगडण्याचे आव्हान नव्या पिढीसमोर ठेवले आहे.
 
खाल्डिया आणि वैदिक देव


टिळकांच्या निर्वाणोत्तर प्रसिद्ध झालेल्या निबंध संकलनात भारत आणि खाल्डिया प्रदेश यातील संबंधांवर लिखाण आहे. ते आजच्या तुलनेत प्रथमिक स्वरूपाचे आहे. गेल्या शंभर वर्षांत अनेक उत्खननांमधून तो संबंध अधिक दृढपणे प्रस्थापित झाला आहे. सिंधू मुद्रा मध्यपूर्वेतील देशांत आणि सिंधू मुद्रांवर मध्यपूर्वेतील ‘गिलगामेश’ कथानक असलेल्या मुद्रा मिळाल्याने व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधावर अधिक प्रकाश पडला आहे. बोगाझकोई येथील लेखांमधून संस्कृत भाषेची आणि वैदिक देवांची माहिती त्या प्रदेशात होती, हे दिसते.
 

टिळकांनी विचारात न घेतलेला, पण माझ्या संशोधनातून पुढे आलेला मुद्दा ऋग्वेदातील ‘आर्य-दास’ संघर्षाचा आहे. माझ्या ’The Afghan Connection' या पुस्तकात दिल्याप्रमाणे, दास जनसमूह हा भारतातील नसून अफगाणिस्तान-इराण या दोघांनाही समान असलेल्या सिस्तान प्रांतातील दाहमर्द जनसमूह आहे. त्या प्रदेशात ‘दाह बाशी देह’ (इराणी) - ‘दास भाषी देश’ (संस्कृत) या नावाचे गाव, तसेच ‘देह-देश’ अशी शब्दांची गावे हेच सिद्ध करतात की, ‘आर्य-दास संघर्ष’ सिस्तान प्रांतात घडला, भारतात नव्हे. लोकमान्य टिळकांनी ज्या पारशी वेंदिदादमधील स्थलांतराचा आधार घेतला आहे, त्याच्या संदर्भाने आर्य पश्चिमेकडे गेले, हे सिद्ध करता येते. तेव्हा वर चर्चेत आलेले अनेक मुद्दे एकत्रित साकल्याने पाहता, आर्य बाहेरून आले नसून सप्तसिंधू प्रदेशातून पूर्व आणि पश्चिमेकडे पसरले, हे आता स्वीकारायला पाहिजे.


शंभर वर्षांनंतरही संशोधकांसमोर वैचारिक आव्हान ठेवणारे लिखाण करणारे लोकमान्य टिळक, अत्यंत कुशलपणे तर्कशुद्ध संशोधनपर लिखाण करणारे पट्टीचे संशोधक होते. आज उपलब्ध झालेली पुरातत्वीय उत्खनातील माहिती त्यांना उपलब्ध झाली असती, तर त्यांनी सिंधू संस्कृती आणि वैदिक साहित्याची एकात्मिकता, आर्याच्या पश्चिमेकडच्या दासांविरोधातील मोहिमेच्या संकल्पनेला आणि थेट युरोपपर्यंत गेलेल्या ‘वृत्रघ्न’, ‘शर्व’, ‘अहि दास’ इत्यादी शब्द परिवर्तनांना धरून आर्य भारतातून पश्चिमेला गेले, ही संकल्पना नक्कीच मांडली असती. त्यांच्या महानिर्वाण शताब्दीच्या शुभप्रसंगी त्यांना संशोधनपर अशी ही आदरांजली.

@@AUTHORINFO_V1@@