पालघर जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी अपुरे मनुष्यबळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |
Palghar _1  H x




पालघर (नवीन पाटील) : पालघर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा मोठा तुटवडा भासत आहे. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातही ही रुग्ण संख्या अशीच झपाट्याने वाढत गेली व पालघर जिल्ह्यातही अशी परिस्थिती ओढवली तर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.


पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्ह्यात कोरोना रुग्ण उपचारासाठी कार्यान्वित केलेल्या १३ कोरोना उपचार केंद्रांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आरोग्य यंत्रणेला भासत आहे. तरीही कमी मनुष्यबळाच्या जोरावर आरोग्य यंत्रणा तितक्याच जोमाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच रुग्णांच्या उपचारासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या १३ उपचार केंद्रांमध्ये १२९ विविध तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र यामध्ये एकच अर्ज प्राप्त झाल्याने १२८ पदे आजही रिक्त आहे. रिक्त पदांसाठी अजूनही अर्ज आलेले नाहीत. या उपचार केंद्रांमध्ये विविध तज्ञ डॉक्टरांची असलेली उणीव व कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांच्या सेवा आरोग्य यंत्रणेने अधिग्रहित केल्या आहेत.


पालघर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत उभारलेल्या कोरोना उपचार केंद्रांमध्ये उपचार व तत्सम कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार विविध ११ प्रकारची पदे जूनमध्ये भरण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार या कार्यालयाने जूनच्या पहिल्या आठवडायात तज्ञ डॉक्टरांसह कक्ष सेवकपर्यंतच्या विविध ७९९ जागा भरण्यासाठी जाहिरात दिली. मात्र कोरोना उपचार केंद्रांमध्ये सेवा द्यावी असल्याने या भीतीने कमी अर्ज केले गेले.


७९९ पैकी केवळ १०७९ अर्ज केले गेले. जे अर्ज स्वीकारण्यात आले व पात्र ठरले अशा १९८ विविध पदांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना उपचार केंद्रांमध्ये सेवा देण्यासाठी आदेश देण्यात आले.ही प्रक्रिया अजूनही सुरूच असली तरी सद्यस्थितीत यातील ६०१ पदे अजूनही रिक्तच आहे. याचाच अर्थ मनुष्यबळ कमतरता असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण दिसून येत आहे. मनुष्यबळाची उणीव असल्याने त्यांचे विविध ठिकाणी नियोजन करणे यातच आरोग्य यंत्रणेचा वेळ खर्ची जात असल्याचे कळते.


प्रशासनाने त्यांच्या अधिकारान्वये तज्ञ डॉक्टरांची उणीव भरून काढण्यासाठी खासगी डॉक्‍टरांच्या सेवा अधिग्रहीत केल्या असल्या तरी त्या व्यतिरिक्त तुटवडा असलेल्या कर्मचाऱ्यांबाबतीचे धोरण प्रशासनाला ठरवावे लागणार आहे. पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढतच गेली तर प्रशासनासमोर मनुष्यबळाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे व ते आव्हानात्मक ठरेल.याचा आतापासून विचार व नियोजन करणे अपेक्षित आहे.


कोरोना काळात कोरोना उपचार केंद्रांसाठी लागणाऱ्या विविध तज्ञ डॉक्टरांची एकूण १२९ पदे मंजूर आहेत. यापैकी एकच अर्ज आल्याने १२८ पदे अजूनही रिक्त आहेत. याच बरोबरीने या उपचार केंद्रांमध्ये २६ रुग्णालय व्यवस्थापकांची आवश्यकता होती. यामध्ये आतापर्यंत ३ जणांना सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी महत्त्वाच्या अशा परिचारिका पदांसाठी ४१३ पदे मंजूर होती. यातील ८७ पदे भरली गेलेली आहेत. पुढील ३२६ पदे भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरु असल्याचे समजते.


रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या क्ष-किरण तंत्रज्ञानाची १७ पदे या अंतर्गत मंजूर करण्यात आली होती. यामध्ये फक्त २ अर्ज आल्याने १५ पदे अजूनही रिक्त आहेत. इसीजी तंत्रज्ञसाठी १५ पदे मंजूर असून ३ भरली गेली आहे. तर १२ रिक्त आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी २३ पदे मंजूर तर ८ जणांना आदेश दिले आहेत. यासाठी ही अर्ज प्राप्त होत असून या पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे.


औषध भांडार अधिकारी पदाची १८ पदे मंजूर असून १५ पदे भरली गेली आहेत. यामध्ये ३ पदे रिक्त आहेत. टंकलेखकांचीही २५ पदे मंजूर असली तरी १५ पदे भरली गेली आहेत व १० पदे रिक्त आहेत, मात्र ही पदे पुरेशी असल्याचे कळते. याउलट कोरोना उपचार केंद्रांमध्ये साफसफाई करण्यापासून ते रुग्णांना सहकार्य करण्यापर्यंतची महत्त्वाची अशी कक्ष सेवकाची १३३ पदे मंजूर असली तरी आत्तापर्यंत ६४ जणांना आदेश देण्यात आलेले आहेत. एकूण ७० पदे रिक्त आहेत. या ६९ पदांसाठी अर्ज येत आहेत व ही पदे भरण्याची पुढील प्रक्रिया सुरू असल्याचेही कळते.



कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा एकजुटीने काम करून याचा प्रादुर्भाव थांबवण्याच्या दृष्टीने कार्यरत असले तरी आरोग्य विभागातील या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आरोग्य केंद्रांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याचे दिसून येत आहे.



या आधी आरोग्य उपसंचालक ठाणे यांच्यामार्फत थेट पदे भरण्यात आली होती. मात्र ही पदे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असल्याने ती अपुरी पडल्यानंतर शासनाच्या आदेशान्वये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत तज्ञ पासून ते कक्ष सेवकापर्यंतची ७९९ पदे भरण्यास सुरुवात झाली. या विविध पदांसाठी अर्ज आले असले तरी ते तुटपुंजे आहेत. तसेच यातील काही अर्जांवर पात्र असलेले अधिकारी-कर्मचारी प्रतिसाद देत नसल्यामुळे ही पदे अजूनही रिक्तच राहिलेली आहे.



आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण व कर्मचाऱ्यांची कमतरता यानंतरही अव्याहतपणे,अखंडितपणे सेवा सुरूच आहे.मात्र डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी लक्षात घेता पुढे येऊन आरोग्य व जनसेवेसाठी आपली सेवा देणे अपेक्षित आहे. आरोग्य सेवेत सामावल्यानंतर त्यांची योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षा दिली जात असल्यामुळे त्यांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. 
- कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक पालघर





@@AUTHORINFO_V1@@