योगींचा दणका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |


Yogi Aityanath Vikas Dube


 
राज्यातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी योगी सरकारने गांभीर्याने केलेले प्रयत्न माहिती असल्याने अटक टाळण्यासाठी विकास दुबे पळापळ करत होता, कुठेतरी आसरा शोधत होता, पण कितीही धावाधाव केली तरी योगी सरकारच्या गुन्हेगारविरोधी दणक्यामुळे त्याच्या हातात बेड्या पडल्याच.


एकेकाळी ‘अपराध प्रदेश’ म्हटल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशला विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘उत्तम प्रदेश’ करण्याचा संकल्प केला. योगी आदित्यनाथ सत्तेवर येताच पूर्वाश्रमीच्या सपा-बसपा सरकारांच्या कार्यकाळात निर्माण झालेले ‘जंगलराज’ संपवण्याच्या कामी लागले. उत्तर प्रदेश पोलिसांनीच २०१९ साली दिलेल्या एका माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील पहिल्या १६ महिन्यांतच तब्बल तीन हजार एन्काऊंटर करण्यात आले व त्यात ७० पेक्षा अधिक गुन्हेगार ठार, तर ८०० पेक्षा अधिक गुन्हेगार जखमी झाले व सात हजारांपेक्षा अधिक गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या. परिणामी, राज्यातील गुंडगिरीचे कंबरडे मोडल्याने हत्या, लुटमार, दरोडे, महिलांशी संबंधित अपराधांत तुलनात्मकदृष्ट्या मोठी घटही झाली. राज्यकर्त्यांचा गुन्हेगारांवरील वचक म्हणजे काय, याचा हा धडधडीत पुरावा होता. मात्र, राज्यातील कायदा-व्यवस्थेला चूड लावणारी गुन्हेगारी इथे इतकी फोफावलेली होती की, त्यातले म्होरके अजूनही डोके वर काढतातच. विकास दुबे हा त्यापैकीच एक आणि गुरुवारीच एसटीएफच्या तुकडीने त्याच्या मुसक्या आवळल्या.

 
तत्पूर्वी २ जुलै रोजी कानपूरच्या बिकरु गावात विकास दुबे याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक गेले होते. मात्र, याचवेळी विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला आणि आठ पोलिसांची निर्घृण हत्या केली. पोलिसांच्या हत्येच्या भयंकर घटनेनंतर विकास दुबे व त्याच्या पंटरांनी पलायन केले आणि पोलीसही या सर्वांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, विकास दुबे आठ दिवसांपर्यंत पोलिसांना गुंगारा देत इकडेतिकडे पळत राहिला, तो कधी राजस्थान, कधी हरियाणा, कधी नोएडा, तर कधी नेपाळपर्यंत पोहोचला किंवा पोहोचणार अशी चर्चाही सुरु झाली. पोलिसांच्या हत्येआधीच विकास दुबेवर जवळपास ६० गुन्ह्यांचा आरोप होता आणि अशा गुन्हेगाराला मोकळे सोडून चालणार नव्हते. हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने विकास दुबेच्या मालमत्तेवर थेट बुलडोझर चालवले, त्याच्या हस्तकांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आणि त्याची चारही बाजूंनी कोंडी केली. विकास दुबेच्या तीन साथीदारांचे याच काळात एन्काऊंटर करण्यात आले आणि कायदा हाती घेणार्‍या गुन्हेगारांची हीच गत होईल, हे सरकारने दाखवून दिले. अखेरीस गुरुवारी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आलेल्या विकास दुबेला अटक करण्यात एसटीएफ पथकाच्या पोलिसांना यश आले.

 
मात्र, अशाप्रकारे गुन्हेगारांना सळो की पळो करण्यातून, ते हाती लागत नसतील तर एन्काऊंटर करण्यातून आणि त्यांची घेराबंदी करण्यातून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण, युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गृहमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई-महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्या नष्ट करण्याचे आदेश पोलीस खात्याला दिले होते. अरुण गवळी, छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम या गुन्हेगारांच्या गुन्हेगारी टोळ्या तेव्हा मुंबई-महाराष्ट्रात कमालीच्या सक्रिय होत्या. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या भक्कम पाठिंब्याने मुंबई पोलीस या टोळ्यांचा खात्मा करण्यात यशस्वी झाले. आज विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडल्यानंतर तिथेही असेच काहीसे होत असल्याचे दिसते. राज्यातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी योगी सरकारने गांभीर्याने केलेले प्रयत्न माहिती असल्याने अटक टाळण्यासाठी विकास दुबे पळापळ करत होता, कुठेतरी आसरा शोधत होता, पण कितीही धावाधाव केली तरी योगी सरकारच्या गुन्हेगारविरोधी दणक्यामुळे त्याच्या हातात बेड्या पडल्याच.

 
दरम्यान, विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आणखी बरीचशी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. त्यातून विकास दुबेचे कोणत्या पोलिसांशी आणि कोणत्या राजकारण्यांशी नेमके काय संबंध होते, त्याला कोणाचा पाठिंबा होता, याचीही माहिती समोर येईल. त्याआधी कानपूरमधील पोलिसी हत्याकांडानंतर आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीत विकास दुबेच्या काळ्या कारवायांत पोलिसांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसा-पोलिसांतील आणि विकास दुबेशी संबंधित अनेकांच्या ऑडियो क्लिपदेखील व्हायरल झालेल्या आहेत. दोघांच्या हातमिळवणीमुळे विकास दुबे याला राज्यातील जमीन बळकावणे, खणन आणि खंडणीचे जाळे चालवणे, गैरकृत्ये करणे सोपे होत होते. म्हणजेच कोणतेही बेकायदेशीर काम दीर्घकाळ पोलीस आणि राजकीय नेतृत्वाच्या वरदहस्ताशिवाय सुरु राहू शकत नाही, ही उक्ती येथे खरी ठरत असल्याचे दिसते. योगी आदित्यनाथ सरकारने आतापर्यंत गुन्हेगारांना टिपण्याची उत्तम कामगिरी केली. पण, या गुन्हेगारीची पाळेमुळे कुठपर्यंत दडलेली आहेत, हे विकास दुबेचे प्रकरण अभ्यासल्यानंतर समजते. त्याचे धागेदोरे थेट पोलिसांपर्यंत पोहोचत असल्याने योगी आदित्यनाथ सरकारला अशा संशयित पोलिसांनाही व्यवस्थेतून बाहेर काढावे लागेल. कारण, कायद्यातील उणिवांचा फायदा घेऊ देत हे पोलिसच गुन्हेगारांना मदत करत असतात. त्यात त्यांचाही वैयक्तिक स्वार्थ असतोच आणि म्हणूनच या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी सर्जरीची आवश्यकता आहे. विकास दुबेसारखी प्रवृत्ती जिथून जन्म घेते, ते जाळे उद्ध्वस्त केले तरच हे थांबू शकते.

 
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यशैलीने राज्यातील बेकायदेशीर कारवाया करणार्‍यांना नेस्तनाबूत करण्याचे काम धडाडीने करुन दाखवलेले आहे. तसेच प्रशासन व पोलीस खात्यावरही त्यांचा दरारा आहेच आणि त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वात विकास दुबेचे प्रकरणही शेवटापर्यंत जाईल. पोलीस किंवा कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला झुगारुन कार्यवाही करण्याची धमक योगी आदित्यनाथ हेच दाखवू शकतात. तसेच याआधीच्या मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव, मायावती यांच्या काळात माजलेल्या बजबजपुरीला वैतागलेल्या उत्तर प्रदेशातील सर्वसामान्य जनतेलाही योगी आदित्यनाथ सरकारकडूनच अपेक्षा आहेत. कारण, अपेक्षा जो पूर्ण करु शकतो, त्याच्याचकडून बाळगल्या जातात आणि योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशला ‘गुंडाराजमुक्त’ करण्यात यशस्वी होतील, याची खात्री वाटते.

 
@@AUTHORINFO_V1@@