दिव्यांगांना रोजगारातील समान संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |


disabled employment_1&nbs


कोरोनाकाळात दिव्यांगांच्या रोजगाराच्या प्रश्नाने अधिक गंभीर स्वरुप धारण केले. तेव्हा ‘सक्षम’ व इतर सामाजिक संस्थांनी याविषयी व्यापक मोहीम हाती घेतली असून दिव्यांगांना रोजगारातील समान संधीसाठी चालना दिली आहे. याविषयीचे कायदेशीर नियम आणि सद्यस्थिती याचा आढावा घेणारा हा लेख...


केंद्र सरकारद्वारा लागू करण्यात आलेल्या ‘दि राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी रूल्स, २०१६’ या कायद्यामुळे देशातील दिव्यांगांना नोकरी-रोजगार संदर्भात समान संधी या मार्गदर्शक तत्त्वांश कायद्याचे अधिष्ठान लाभले. पूर्वी केवळ सरकार दिव्यांग उमेदवारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, आता खासगी उद्योगक्षेत्रालाही या कायद्याच्या परीघात घेण्यात आले आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय म्हणावे लागेल. या कायद्यानुसार सर्वच आस्थापनांना दिव्यांगजन उमेदवारांना नोकरी-रोजगाराच्या संदर्भात समान संधी देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या संस्थांनी त्यांच्याकडे कार्यरत दिव्यांग कर्मचार्‍यांना कोणकोणत्या सोयीसवलती पुरविल्या जातात, याचे विवरण देणेही बंधनकारक आहे. याशिवाय यासंदर्भातील करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी द्यावा लागणार आहे. याशिवाय नव्या कायदेशीर तरतुदींनुसार ज्या आस्थापनांमध्ये २० हून अधिक दिव्यांगजन कर्मचारी असतील, अशांनी या कामासाठी समन्वय अधिकारी नेमणे आवश्यक ठरणार आहे. या विशेष अधिकार्‍यांची मुख्य जबाबदारी दिव्यांगजन उमेदवारांची निवड करण्याबरोबरच त्यांना मिळणार्‍या सोयी-सवलतींची निगराणी करणे व त्याचवेळी नोकरी-रोजगाराच्या संदर्भात आप-परभाव होणार नाही, याची खात्री करून घेणे अशा दुहेरी स्वरुपात राहणार आहे. या पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांसह अनेक खासगी कंपन्यांनी आपल्या स्तरावर यापूर्वीच दिव्यांगजनांसाठी समानसंधी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला होता. त्यांचे हे धोरण यापूर्वी स्वेच्छेने आणले होते, ते आता कायदेशीर स्वरुपात अमलात आणावे लागणार असल्याने, अशा कंपन्यांना आपल्या कर्मचारीविषयक ध्येय-धोरणांचा विचार करून त्यामध्ये काही फेरफार करावे लागतील.


सरकारी स्तरावर एकूण कर्मचार्‍यांच्या पाच टक्के कर्मचारी दिव्यांगजन असावेत, असे कायदेशीर निर्देश देण्यात आले असले, तरी या निर्देशांची स्वयंप्रेरणेने अंमलबजावणी केल्याची काही प्रमुख व उत्साहजनक उदाहरणेही आहेत. यासंदर्भात ‘महिंद्र हॉलिडेज अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स’ कंपनीचे उदाहरण वानगीदाखल म्हणून सांगता येईल. कधी आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या शारीरिक अपंगत्वामुळे विख्यात हॉकी खेळाडू अन्वर यांना आपले सुवर्णपदक व पुरस्कार विकण्याची वेळ आली होती. तेव्हा ‘महिंद्र हॉलिडेज’ने त्यांना मोठ्या सन्मानाने आपल्या कंपनीत रोजगार दिला व अल्पावधीतच ते कंपनीमध्ये ‘खरेदी’ विभागात ‘सिनीअर सर्व्हिस फॅसिलिटेटर’ म्हणून मोठ्या आनंदाने कार्यरत झाले. अन्वर यांच्याशिवाय ‘महिंद्र हॉलिडेज आणि रिसॉर्ट्स’ने आपल्या विविध आस्थापनांमध्ये ६० हून अधिक दिव्यांग कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याचे महनीय काम केले आहे. हे कर्मचारी कंपनीच्या प्रशासन-स्वागतकक्ष, सेवा विभाग, प्लंबर-इलेक्ट्रिशियन-बागकाम करणारे एवढेच नव्हे, तर अन्नप्रक्रिया विभागातील जबाबादारी अगदी जोखपणे बजावतात. दिव्यांगजन उमेदवार व त्यांची निवड-नेमणूक करण्याच्या संदर्भात असणार्‍या व ‘महिंद्र हॉलिडेज अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स’ कंपनी व्यवस्थापनाच्या ध्येयधोरणांनुसार कंपनीद्वारा दिव्यांगजनांच्या शिक्षण-प्रशिक्षण-पुनर्वसन करणार्‍या विविध संस्थांशी स्वतःहून संपर्क साधण्यात येतो. या संस्थांमधून निवडलेल्या उमेदवारांना आपल्या व्यावसायिक गरजांनुसार कंपनीद्वारा प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य व साधने उपलब्ध करून मगच त्यांची योग्य ठिकाणी व योग्य कामावर नेमणूक करण्यात येते. यातून दिव्यांगजन उमेदवारांना रोजगार संधी तर मिळतेच. शिवाय त्याद्वारे त्यांच्या आणि इतर दिव्यांगजन उमेदवारांच्या आत्मविश्वासात वाढ होण्याचा दुहेरी फायदा होतो व त्यांच्या जीवनाचे स्वरुपच बदलून जाते.

कंपनीत दिव्यांगजन उमेदवारांना रोजगाराच्या संदर्भात समान संधी प्रदान करणारी कंपनी म्हणून ‘लेमन ट्री हॉटेल’चाही विशेष उल्लेख करावा लागेल. कंपनीमध्ये सर्वसाधारणपणे काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या ५०० असून तिची टक्केवारी कंपनीतील सरासरी कर्मचार्‍यांच्या संख्येच्या तुलनेत सुमारे १३ ते १५ टक्के आहे. यासाठी अर्थातच दिव्यांगजन पुनर्वसनाच्या कामाच्या संदर्भात व्यवस्थापनेच्या प्रतिबद्धतेला दिव्यांगजनांच्या विशेष प्रशिक्षणासह त्यांना सर्वार्थाने सक्षम बनविण्याचे व्यापक प्रयत्नही तेवढेच कारणीभूत आहेत. ‘लेमन ट्री हॉटेल’ने आपल्या देखरेख व स्वच्छता विभागात काम करणार्‍या दिव्यांग कर्मचार्‍यांसाठी व्हिडिओवर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत, तर सामान्य प्रशासन व खाद्य सेवा विभागातील दिव्यांगजन कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रादेशिक भाषा व चित्रात्मक संकेतांचा मोठ्या खुबीने उपयोग केला असून त्याचे योग्य व सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. ‘डॉईश बँके’त दिव्यांगजन उमेदवार व कर्मचार्‍यांचा प्रश्न व त्याच्याशी निगडित सर्व मुद्दे सर्वोच्च म्हणजे संचालक मंडळ पातळीवरून हाताळले जातात. याशिवाय बँकेत दिव्यांग कर्मचार्‍यांची निवड झाल्यावर नव्याने रूजू होणार्‍या दिव्यांग कर्मचार्‍यांना कामावर रूजू होण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय ‘डॉईश बँके’ने ‘डी-एनेबल’ ही संगणकीय पद्धतीवर आधारित अशी कार्यप्रणाली बँकेच्या कामकाजासाठी विकसित व क्रियान्वयित केली असून त्याचा फायदा बँकेतील १०० हून अधिक दिव्यांग कर्मचारी आज घेत आहेत. या प्रणालीमध्ये अशा कर्मचार्‍यांच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक अशा बाबींपासून कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा, प्रत्यक्ष कामाशी निगडित प्रशिक्षण व त्यांची भविष्यकालीन प्रगती या बहुविध मुद्द्यांच्या समर्पकपणे समावेश करण्यात आला आहे.
बँकेत लक्षणीय संख्येत दिव्यांग कर्मचारी काम करीत असल्याने अशा कर्मचार्‍यांशी सहजतेने कसे वागायचे व त्यांना अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रेरित-प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ‘डॉईश बँके’ने आपल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळेही दैनंदिन कामकाजामध्ये अधिक सकारात्मक व परस्परपूरक असे वातावरण निर्माण झाले आहे. दिव्यांग क्षेत्रात समदृष्टी, क्षमता विकास व संशोधनपर काम राष्ट्रीय स्तरावर व अग्रणी स्वरुपात काम करणारी ‘सक्षम’ ही सेवाभावी संस्था देशांतर्गत विविध प्रांतांमध्ये दिव्यांगांचे शिक्षण-प्रशिक्षण, कौशल्य विकास व खर्‍या अर्थाने पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवत असून या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणार्‍या अन्य स्वयंसेवी संस्थाही दिव्यांग रोजगार क्षेत्रात पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. सामाजिक संस्थांच्या दिव्यांग रोजगार पुनर्वसनातील आपले योगदान स्वरुपात काही व्यावसायिक-उद्योजक तर स्वयंप्रेरणेने दिव्यांग उमेदवारांना त्यांचे शिक्षण, कौशल्य व क्षमतेच्या आधारे रोजगारासाठी आवर्जून व प्रसंगी प्राधान्य तत्त्वावर प्रयत्नशील असल्याचे आशादायी चित्रही दिसून येत आहे. सद्यस्थितीत व विशेषतः केंद्रीय स्तरावर आणि कायदेशीर स्वरुपात समानसंधी कायद्याच्या कक्षेत, समाजातील दिव्यांग उमेदवारांना समाविष्ट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय खर्‍या अर्थाने परिणामकारक ठरला आहे. आता दिव्यांगजन उमेदवारांना पूर्वीपेक्षा अधिक व्यापक स्वरुपात रोजगार मार्गदर्शन व संधी उपलब्ध होणार आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे, आता विविध कंपन्या-संस्था दिव्यांगजनांना रोजगार देण्याच्या संदर्भात कायद्याच्या कक्षेपलीकडे जाऊन उत्स्फूर्तपणे काम करीत आहेत व त्यांच्या या प्रयत्नांना समाजातून मिळणारा वाढता प्रतिसाद उत्साहवर्धक ठरला आहे.
 

- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत)
 
 

@@AUTHORINFO_V1@@