जागतिक लोकसंख्या दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020   
Total Views |


Population_1  H


उद्या ११ जुलै. जागतिक लोकसंख्या दिवस. ११ जुलै १९८७ रोजी युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रातर्फे ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून पाळला जातो. ‘पाळला जातो’ म्हणण्यापेक्षा ‘इशारा दिन’ म्हणून पाहिला जातो. विसाव्या शतकात अनेक शोध लागले, जागतिक इतिहासाच्या संदर्भात अनेक मोठमोठ्या घटना घडल्या. पण, विसाव्या शतकातली सर्वात क्रांतिकारी घटना कोणती असेल तर ती लोकसंख्येचा विस्फोट.


विसाव्या शतकात अनेक शोध लागले. आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक पाया घेऊन लागलेल्या शोधांनी मानवी जीवनात खूपच बदल घडवला. त्यामुळे माणसाचा मृत्युदर कमी आणि जन्मदर वाढला. त्यामुळेच की काय विसावे शतक हे लोकसंख्येचा विस्फोट होणारे शतक म्हणूनही ओळखले जाते. १९२७ साली जगाची लोकसंख्या होती दोन अब्ज. पण, अवघ्या ३० वर्षांत, १९५९ मध्ये ती झाली तीन अब्ज आणि ३९ वर्षांत विश्वलोकसंख्या दुप्पट म्हणजे सहा अब्ज झाली. याच गतीने आज जगाची लोकसंख्या अफाट आहे. त्यामुळे अनेक प्रश्न नव्याने उभे ठाकले. वाढत्या लोकसंख्येला अन्न, पाणी आणि निवारा तसेच इतरही मूलभूत सुविधा कुठून आणि कशा द्याव्यात, हा प्रश्न जगासमोर उभा आहे. त्यामुळेच ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस’ लोकसंख्येसंबंधी ‘इशारा दिन’ म्हणून पाळता जातो.


प्राचीन काळापासून लोकसंख्या व तिची वैशिष्ट्ये याविषयीचे औत्सुक्य लोकांच्या मनात आहेत. ख्रिस्तपूर्व ३२१ ते २६९ या काळात लिहिलेल्या ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ या भारतीय ग्रंथात तसेच ‘ऐन ए अकबरी’ या ग्रंथातही लोकसंख्याविषयक विवेचन केले आहे. लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचा पाया घालण्याचे श्रेय जॉन ग्रँट या ब्रिटिश संशोधकाकडे जाते, तर ‘जनगणनेचा जनकम्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते. ठराविक वर्षाने जगभरातले देश जनगणना करत असतात. त्यानुसार आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या पाच खंडांमधील देशात सर्वात कमी लोकसंख्या आहे ती ऑस्ट्रेलियाची. इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्याही अगदी कमी वेगाने वाढते. तसेच जगाच्या एकूण लोकसंख्यपैकी ६० टक्के लोकसंख्या आशिया खंडात वास्तव्यास आहे. कारण, चीन व भारत हे लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या दोन क्रमांकाचे देश या खंडामध्ये आहेत.


लोकसंख्या अभ्यासकांच्या मतानुसार, २१व्या शतकात आशिया हा सर्वात अधिक लोकसंख्येचा खंड असेल. आफ्रिका खंडाची लोकसंख्या तिपटीहून अधिक असेल, तर युरोपची लोकसंख्या २०२५ मध्ये केवळी ०.७४ अब्ज असेल. या अभ्यासानुसार आफ्रिका खंडाच्या लोकसंख्येत वाढ दरवर्षी २.३ टक्के होत आहे, तर आशिया खंडाची वाढ होत आहे १ टक्के. आपल्या देशाचा विचार केला तर भारताची लोकसंख्या १९४७ मध्ये अंदाजे ३६ कोटी होती. २०११च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या १.२१ अब्ज झाली आहे. म्हणजे ६४ वर्षांत भारताची लोकसंख्या तिपटीहून अधिक वाढली. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे १० वर्षांत प्रत्येक वर्षी लोकसंख्येत १.५० ते १.७५ कोटींची भर पडत आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशा या आठ राज्यांतील लोकसंख्या वाढ विशेष आहे. या आठ राज्यांची एकूण लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येत जवळजवळ 48 टक्के आहे.


दरवर्षी सरकारी नियोजनात लोकसंख्या वाढ नियोजनावर प्रत्येक देश कामही करत आहे. मात्र, तरीही लोकसंख्या वाढ थांबत नाही. याला धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक आयाम आहेत. मात्र, काही जणांच्या मते निसर्गचक्र समतोल साधत असते. त्यामुळे लोकसंख्या वाढ प्रमाणाबाहेर झाली तरी त्यावर नियंत्रण करण्यास माणूस अपयशी ठरेल मात्र ‘निसर्ग’ यशस्वी होईल. जगात दर १०० वर्षांनी पसरणार्‍या विविध महामारी हे त्याचेच प्रतीक आहे. अर्थात, हा केवळ तर्क आहे. जोपर्यंत जगभरातले सर्वच लोक लोकसंख्यावाढीच्या संकटाची जोखीम ओळखत नाहीत, तोपर्यंत लोकसंख्या कमी होणे शक्य नाही. येणार्‍या काळात लोक आपापली समाज आणि देशाप्रति असणारी जबाबदारी ओळखून लोकसंख्येला आळा घालतील, तोच सुदिन समाजावा!

@@AUTHORINFO_V1@@