कल्याणकारी विरोधीपक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020   
Total Views |


nashik_1  H x W

भारतीय लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तसेच, सत्ताधारी पक्षाने कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत रयतेचे कल्याण करण्यास प्राधान्य द्यावे, असे घटनादत्त कर्तव्य सत्ताधारी पक्षांवर असते. मात्र, महाराष्ट्राच्या भाळी सध्या उलटेच चित्र दिसून येते. सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. या भेटी दरम्यान तेथील कोरोना स्थिती, त्यावर प्रशासन करत असलेले कार्य, नागरिकांच्या भावना जाणून घेत आहेत. वेळप्रसंगी प्रशासनाला सूचना देणे, दिशा दाखविणे, मार्गदर्शन करणे हे कार्यदेखील फडणवीस करत असल्याचे दिसून येते. जे कार्य प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे, ते विरोधी पक्ष नेते करत आहेत. जनतेला विश्वास देणे, जनतेच्या जीवनातील नैराश्य दूर करणे यांसाठी मुख्यमंत्र्यांच्याऐवजी विरोधी पक्षनेते पालक म्हणून भूमिका बजावत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाऐवजी विरोधी पक्षच कल्याणकारी धोरणाचे घटनादत्त कर्तव्य पार पाडतानाचे चित्र आहे. नुकताच फडणवीस यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयासह विविध ठिकाणी भेटी देत नेमकी स्थिती जाणून घेतली व त्यानुसार नेमक्या काय उपाययोजना करता येणे शक्य आहे, याबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. कार्य करत असताना त्यास मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ते कार्य नक्कीच फलदायी ठरते. हाच विश्वास प्रशासकीय अधिकारी वर्गात निर्माण झाला. त्याचवेळी राज्याचे प्रमुख म्हणून थेट संवादाची निकड मुख्यमंत्री यांच्याकडून प्रशासकीय अधिकारी वर्गाला होती. मात्र, थेट संवादाची उपयुक्तता विरोधी पक्षाने जाणली व आम्हास प्रोत्साहित केले, हीच भावना काही प्रशासकीय अधिकारी नक्कीच व्यक्त करत असणार. कोरोनाला न घाबरता थेट ‘फिल्ड वर्क’चे कार्य ज्यांनी करायला हवे, ते न करता विरोधी पक्ष करत असल्याने जनतेलादेखील योग्य ते समजल्याशिवाय राहणार नाही. मात्र, धोरण अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या सरकारने आतातरी समोर येऊन काम करावे, हीच रास्त अपेक्षा...


एकवाक्यतेची निकड
 
 

राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू केले असताना आता काही ठिकाणी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पुन्हा उद्योगांसह अत्यावश्यक सेवाही बंद करणे सुरू झाले आहे. याबाबत नाराजी व्यक्त करीत ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने ‘लॉकडाऊन’ व ‘मिशन बिगीन अगेन’बाबत एकवाक्यता असावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘कोरोनासोबतच जगावे लागेल,’ अशी भूमिका खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी मागे मांडली होती. त्याला अनुसरून सामान्य जनताही त्यासाठी तयार झाल्याचे जाणवले. सध्या अर्थचक्र पूर्ववत करण्यासही प्राधान्य दिले जात आहे. हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. यावरून सरकार एकीकडे ‘मिशन बिगीन अगेन’चे धोरण अवलंबवत आहे, असे दिसते. उद्योजक, व्यापारी वर्गाने आवश्यक ती काळजी घेऊन सरकारला सहकार्यही केले आहे. कोरोनाबाधित संख्या नियंत्रणात आणून सर्व प्रयत्न केले जात असताना औरंगाबादसारख्या शहरात स्थानिक प्रशासनाने आठवडाभर कडेकोट टाळेबंदीचा घेतलेला निर्णय अचंबित करणारा आहे. त्यामुळे औरंगाबादचा हा निर्णय राज्यातील इतर जिल्ह्यातदेखील राबविला जाण्याची भीती चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्येही नुकताच असा अनुभव आला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप करून सद्यपरिस्थिती ‘मिशन बिगीन अगेन’ची असून काहीही बंद केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. व्यापार व उद्योग बंद करणे हा कोरोना संकटावर मात करण्याचा उपाय नाही, हे स्थानिक प्रशासनाने लक्षात घेऊन कार्यवाही केली पाहिजे. ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याचे अधिकार पुन्हा वरिष्ठ पातळीवर देण्यात यावे, असा सूर आता उमटू लागला आहे. याबरोबरच सुरू झालेले उद्योग पूर्णपणे सक्षमतेने कसे चालतील, याकडे लक्ष द्यावे आणि ‘मिशन बिगीन अगेन’चाच विचार व्हावा, अशीदेखील मागणी उद्योग वर्तुळातून पुढे येत आहे. याबरोबरच उद्योगांची टाळेबंदी करण्याचे अधिकार उद्योगमंत्री किंवा उद्योग विभागाचे सचिव यांच्याकडेच असू द्यावेत, अशी सूचनादेखील मंडलेचा यांनी मांडली आहे. सरकारमध्ये एकवाक्यता नसणे, त्यामुळे प्रशासनास योग्य तो संदेश न पोहोचणे आणि त्यातून संभ्रम निर्माण होणारे निर्णय घेतले जाणे, अशी स्थिती सध्या राज्यात आहे.

 

- प्रवर देशपांडे

@@AUTHORINFO_V1@@