ऐसा नरदेह श्रेष्ठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |


Man_1  H x W: 0


चैतन्यरुपी वस्तूची ओळख ही खर्‍या अर्थाने देवाची ओळख आहे. विचारांची ही प्रगल्भता फक्त मानवाच्या ठिकाणी शक्य आहे. तिचा योग्य वापर करून ईशतत्त्वांशी तादात्म्य साधता येते. हे विचारात घेऊन स्वामींनी दासबोधात ‘नरदेहस्तवन’ केले आहे.
 
 

भारतीय परंपरेला अनुसरून दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी श्रीगणेश, शारदा व सद्गुरु यांना वंदन आणि आवाहन केले आहे. ते स्तवनाच्या स्वरुपात आहे. श्रीगणेशाचे रूप हे ज्ञानस्वरूप आहे. ग्रंथरचनेसाठी ज्ञानसाधना करताना जी विघ्ने येतील ती गणेशाने दूर करावी, असे आवाहन समर्थांनी केले आहे. कारण, तो विघ्नहर्ताही आहे. नंतर स्वामींनी शारदेला वंदन केले आहे. शारदा स्फूर्तीरुपी असल्याने ती ज्ञानाला शब्दरूप देण्यासाठी भक्ताला साहाय्य करते. म्हणून तिला वंदन व आवाहन केले आहे. पुढे स्वामींनी सद्गुरुंचे स्तवन केले आहे. सद्गुरु म्हणजे परमेश्वराचे अनंत स्वरूप आहे. श्रीगणेश, शारदा व सद्गुरु यांचे स्तवन करण्याची पूर्वापार परंपरा अनेक प्राचीन ग्रंथांतून आढळते. स्वामींनी ती परंपरा कायम ठेवली. पण, तेवढ्यावर न थांबता स्वामींनी पुढे संत, श्रोतेजन, कवीश्वर, आध्यात्मिक सभा, परमार्थ यांचेही स्तवन केले आहे. ‘स्तवन’ शब्दाचा अर्थ स्तुती करणे, प्रशंसा करणे अथवा प्रशंसापर स्तोत्रांची रचना करणे, तसेच शरणागत होऊन आपला भक्तिभाव प्रगट करणे असा आहे. शेवटी नरदेहाचे स्तवन करायला स्वामी विसरत नाहीत. या नरदेहाच्या आधारे माणूस आध्यात्मिक उन्नती साधत असतो. म्हणून स्वामींनी या स्तवन दशकाच्या शेवटी नरदेहस्तवन केले आहे. नरदेहाची प्रशंसा करताना त्या समासात स्वामींनी नरदेहाची तपशीलवार चर्चा केली आहे.


स्तवनदशकाला सुरुवात करताना समर्थ श्रीगणेश स्तवनाला प्रारंभ करून शेवटी नरदेहस्तवनापर्यंत येतात. त्यांच्या स्तवनांचा क्रम श्रीगणेश, शारदा, सद्गुरु, संत, श्रोतेजन, कवीश्वर, आध्यात्मिक सभा, परमार्थ व नंतर नरदेहस्तवन असा आहे. सामान्य माणसाच्या विचाराची सुरुवात देहापासून होते. आपली देहबुद्धी घट्ट असल्याने आपण देहापासून विचाराला लागतो. देहाशी तादात्म्य झाल्याने आपली बरीचशी सुखदुःखे देहावर अवलंबून असतात. मनुष्य सारी सुखदुःखे देहाद्वारा भोगत असतो. वासनातृप्तीचे साधन देहन आहे. परंतु, इंद्रियसुखाच्या आवर्तनात सापडून माणूस दुःखांचाही अनुभव घेत असतो. इंद्रियांद्वारा निर्भेळ सुख त्याच्या वाट्याला येत नाही. त्याला समाधान मिळत नाही. समाधानाच्या शोधात माणूस ‘परमार्था’चा विचार करू लागतो. परमार्थ साधनेत तो ‘आध्यात्मिक सभा’ जवळ करतो. त्या सभेत ‘कवीश्वरांची’ वाणी ऐकतो. तेथे सज्जन ‘श्रोतेजन’ भेटतात. तसेच ‘संत’ भेटतात. पूर्वसंचिताने म्हणजे पूर्वपुण्याईने ‘सद्गुरुं’ची भेट होते. सद्गुरुद्वारा परमार्थातील शंकांचे निरसन होते. नंतर सद्गुरु आध्यात्माचा मार्ग दाखवतात. साधक त्या मार्गाने साधना करीत असता त्याला स्फूर्तीरुपी ‘शारदेचा’ प्रत्यय येतो. पुढे तो विश्वव्याप्तीच्या शुद्ध जाणिवेपर्यंत अर्थात ‘श्रीगणेशा’पर्यंत पोचून अखंड अक्षय समाधानाची प्राप्ती करून घेतो. याला शास्त्रात ‘मुक्ती’ असे म्हणतात. समर्थांनी या दशकात स्तवनांचा जो क्रम निवडला आहे, तो विचारपूर्वक निवडला आहे. तो क्रम मानवी जीवनाच्या आध्यात्मिक उन्नतीशी नाते सांगणारा आहे, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते.


भोगवादी विचारवंत देहाला सर्वस्व मानतात. या जगात आल्यावर वाटेल, त्या भल्याबुर्‍या मार्गाने भोगवादी सुख ओरबडण्याचा प्रयत्न करीत असतात. वासनातृप्तीसाठी ते देहाचा वापर करतात. त्यामुळे भोगवादी विचारवंत देहाचे चोचले पुरवण्यात धन्यता मानतात. याउलट संन्यासवादाचा विचार करणारे देहाला अजिबात किंमत देत नाहीत. ते देहाची निंदा करण्यात धन्यता मानतात. त्यांच्या मते, शरीर म्हणजे रक्तमांसाने भरलेले नरकाचे पोतडे आहे. देहाची अत्यंत बीभत्स वर्णने त्यांनी करून ठेवली आहेत. ती वाचल्यावर माणसाच्या मनात मानवी देहाविषयी तिटकारा अथवा घृणा निर्माण झाली पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु, आपण पाहतो की मानवाने या नरदेहाच्या साहाय्याने विश्वात विद्या, कला, योग, गुण संपादन करून मानवी जीवन सुसह्य व आनंदी केले आहे. या नरदेहामुळेच अनेक शास्त्रांची निर्मिती झाली आहे. तेव्हा या नरदेहाला तुच्छ लेखून चालणार नाही. भोगवादी विचार व संन्यासवादाचा विचार यातील सुवर्णमध्य साधून समर्थांनी नरदेहाचे स्तवन केले आहे. समर्थ विवेकाचे बादशहा आहेत. त्यामुळे ते कुठलीही टोकाची भूमिका घेत नाहीत. नरदेहाबाबत विवेकपूर्ण विचार करून समर्थांनी नरदेहाचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे. ते आपल्याला ‘नरदेहस्तवन निरूपण’ या समासात दिसून येते. सर्व प्राणीमात्रात मनुष्यप्राण्याचा देह व मेंदू कल्पनातीत प्रगती करू शकतो. माणसाचा मेंदू आकाराने मोठा व वजनाने जास्त असून त्यात इतर प्राण्यात आढळून येत नाहीत. अशा अनेक शक्ती साठवलेल्या आहेत. माणसाला बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांची विलक्षण देणगी निसर्गाने बहाल केली आहे. या बुद्धी व कल्पनाशक्तीच्या जोरावर, त्यांचा विकास करून माणसाने निसर्गाची मूलतत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून विज्ञान जन्माला आले. तसेच कल्पना व प्रतिभाशक्तीचा विकास करून आपल्या अंतर्यामी असलेले चैतन्यस्वरूप तो अनुभवू शकतो. तसेच सृष्टीतील चैतन्यारुपी परमेश्वराचा साक्षात्कार करून घेऊ शकतो. यातून आध्यात्मशास्त्र उदयाला आले. चैतन्यरुपी वस्तूची ओळख ही खर्‍या अर्थाने देवाची ओळख आहे. विचारांची ही प्रगल्भता फक्त मानवाच्या ठिकाणी शक्य आहे. तिचा योग्य वापर करून ईशतत्त्वांशी तादात्म्य साधता येते. हे विचारात घेऊन स्वामींनी दासबोधात ‘नरदेहस्तवन’ केले आहे. साधकाने देहाचे महत्त्व ओळखून त्याला भोगवादी अथवा संन्यासी न बनवता, त्याचा परमार्थासाठी पुरेपूर उपयोग करून घ्यावा, ही दासबोधाची विचारसरणी आहे. यासाठी स्वामींनी नरदेहाचे गुणवर्णन केले आहे.


स्वामी म्हणतात, खरोखर हा नरदेह धन्य आहे. या नरदेहात परमार्थासाठी जे जे प्रयत्न करावेत, ते यशस्वी होतात. अशी या नरदेहाची अपूर्वता आहे.


धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ।
जो जो कीजे परमार्थ लाहो । तो तो पावे सिद्धीते ॥


या नरदेहाने परमार्थाची साधने करून लोकांनी अनेक सिद्धी मिळवल्या आहेत. कोणी भक्तीची साधना केली, ती त्यांना मिळाली. कोणी योगसाधना केली, कोणी तीर्थयात्रा केल्या, कोणी पुरश्चरणे तपसाधना केली, कोणी निष्ठेने नामस्मरण केले. या सर्वांनी आपापले ईप्सित साध्य करून घेतले. कोणी वेदाभ्यास करून विद्वान झाले. कोणी साधना करून मनोसिद्ध झाले. कोणी वाचासिद्ध झाले. काही लोकांनी लहानसहान सिद्धी मिळवल्या. हे सारे नरदेहाचेच साध्य झाले. असंख्य साधू, संत, सज्जन यांनी नरदेहात राहून आत्माह्नत करून घेतले. असा हा नरदेह विख्यात आहे.


ऐसे सिद्ध साधु संत । स्वहिता प्रवर्तले अनंत ।
ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणौनि वर्णावा ॥


पशूदेहामध्ये या गोष्टी शक्य नाहीत. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, तर त्यासाठी नरदेहच हवा. म्हणून माणसाला अव्यंग, चांगला धडधाकट देह मिळाला असेल तर त्याने तत्काळ परमार्थाची वाट धरावी व जीवन सार्थकी लावावे.


इतुके हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग ।
तेणे धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥

- सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@