‘इनकमिंग’ हवे, ‘आऊटगोईंग’ नको!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020   
Total Views |


Parner_1  H x W

 


निवडणुकीपूर्वी सचिन अहिरांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याला पुत्रविजयासाठी ‘गळाला’ लावणार्‍यांनी आता नगरसेवकांसाठी असा ‘गळा’ काढला. तेव्हा, ‘इनकमिंग’ हवेहवेसे वाटते ना, मग जरा ‘आऊटगोईंग’चीही किंमत मोजायला शिका !


राजकारणामध्ये आयाराम-गयाराम संस्कृती’ ही तशी जुनीच राजकीय (गैर)परंपरा. कार्यकर्ते, नेत्यांच्या या पळवापळवीतून देशातील कुठलाही पक्ष ‘वंचित’ नाही. काँग्रेस असेल अथवा भारतीय जनता पक्ष, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्षांतरंही केली आणि आपल्या पक्षात इतर पक्षीयांना सामावूनही घेतले. अगदी लहानात लहान कार्यकर्त्यापासून ते मोठमोठ्या नेत्यांपर्यंत अशी पक्षांतराची, सत्तापालटाची शेकडो उदाहरणे आपल्याला देता येतील. पण, ‘तुम्ही आमचे ढापलेले कार्यकर्ते, आता परत आमच्या पक्षात पाठवा,’ अशी बालिश मागणी राजकीय वर्तुळात मात्र ऐकिवात नव्हती. पण, पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमधील प्रवेश ‘मातोश्री’च्या एकदम जिव्हारी लागला आणि ‘आमचे नगरसेवक आम्हाला परत द्याम्हणून फोनाफोनी आणि पवारांसोबत बैठकांचेही सत्र रंगले. अखेरीस आता शिवसेनेच्या राष्ट्रवादीला विनवण्यांनंतर या नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर जाऊन हाती पुन्हा ‘शिवबंधन’ही बांधले. खरं तर या नगरसेवकांची नाराजी शिवसेनेवर वा उद्धव ठाकरेंवर नसून स्थानिक नेतृत्वावर असल्याचे यापूर्वीच समोर आले. परंतु, तरीही आघाडीतील आपल्याच मित्रपक्षाने केलेली ही उचलाउचली शिवसेनेला चांगलीच झोंबली. त्यात या प्रकरणी संजय राऊत तर अजित पवारांना ‘क्लिनचीट’ देऊन मोकळेही झाले. त्यामुळे ‘ते नगरसेवक परत पाठवा,’ असा आदेश झाडण्यापूर्वी त्या नगरसेवकांच्या समस्या ‘मातोश्री’च्या कधीही कानी पडल्या नव्हत्या का? स्थानिक पातळीवर आपल्याच पक्षातील नाराजीची ‘मातोश्री’ला कानोकान खबर का लागली नाही? की त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले? पण, इथे ‘पक्षप्रमुख’ आणि ‘मुख्यमंत्री’ अशी दोन्ही जबाबादारी आपल्या खांद्यावर पेलणार्‍या उद्धव ठाकरेंशी जर आरोग्यमंत्र्यांचाच संपर्क वेळेत होऊ शकत नसेल, तर कार्यकर्त्यांची काय तर्‍हा? तेव्हा, निवडणुकीपूर्वी सचिन अहिरांसारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याला पुत्रविजयासाठी ‘गळाला’ लावणार्‍यांनी आता नगरसेवकांसाठी असा ‘गळा’ काढला. तेव्हा, ‘इनकमिंग’ हवेहवेसे वाटते ना, मग जरा ‘आऊटगोईंग’चीही किंमत मोजायला शिका!



मनसेचे ‘ते’ नगरसेवक आठवतात का?

 


पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांची ‘घरवापसी’ झाली. पण, या निमित्ताने का होईना शिवसेनेने, आपल्या पक्षात राष्ट्रवादीतून आजवर किती ‘इनकमिंग’ झाले, त्याचीही जरा माहिती काढावी. कोकण असेल, जळगाव अथवा कर्जत, कित्येक स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडून हाती ‘शिवबंधन’ बांधले. पण, त्यावेळी किंवा निकालापश्चात ‘महाविकास आघाडी’ स्थापन झाल्यानंतरही राष्ट्रवादीने तरी ‘आमचे कार्यकर्ते परत करा,’ अशी मागणी केलेली दिसत नाही. इतकेच काय, २०१७ साली मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या संख्येत फारसा फरक उरला नव्हता. तेव्हा, भाजपने पालिकेच्या चाव्या आपल्या हातातून हिसकावून घेण्याच्या भीतीपोटीच शिवसेनेने मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांना फोडले होते. त्यावेळीही शिवसेनेने पैशांचे आमिष दाखवून गैरमार्गाने हे नगरसेवक फोडल्याचा आरोप मनसेने केला होता. नगरसेवकांना आपल्या गोटात सामील करुन शिवसेनेने आपली पालिकेतील सत्ता राखली होती. तेव्हा क्षणभरही उद्धव ठाकरेंनी चुलत बंधू असलेल्या राज ठाकरेंचा विचार केला का? नाही ना. कारण, हे राजकारण आहे आणि इथे कधी, कोणत्या क्षणी कुठला डाव खेळायचा, हे ज्याला कळले, तोच ‘चोर’ असला तरी शेवटी ‘शिरजोर’ ठरतो. अटीतटीच्या परिस्थितीत मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंना राजकीय डावपेच चांगलेच ठावूक आहेत आणि आज म्हणूनच ते तिघाडीच्या खुर्चीवर मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत. मग राज्यात, मुंबई पालिकेतही सत्ता असताना पारनेरच्या त्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश एवढा का बरं खटकावा? भुजबळ, कोल्हेंसारखे दिग्गजही सेनेतून राष्ट्रवादीत गेले. पण, त्यांना माघारी परत पाठवा, म्हणून सेनेने पवारांकडे शब्द टाकल्याचे ऐकिवात नाही. मग हे तर साधे नगरसेवक ना? त्यांच्यासाठी एवढा आटापिटा कशाला? याचे कारण म्हणजे, इतर नेते-कार्यकर्त्यांनी पुढे जाऊन हाच कित्ता गिरवू नये, पक्षप्रमुखांचा नाकर्तेपणा समोर येऊ नये, राष्ट्रवादीने सेनेपेक्षा वरचढ ठरु नये आणि महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये, हीच भीती शिवसेेनेला सध्या सतावताना दिसते. तेव्हा, इतरांकडून काही ओरबाडताना जसे जिभेला पाणी सुटते, तसेच इतरांनी आपले काही हिसकावल्यानंतर जिभही कोरडी पडते, हे शिवसेनेने लक्षात घ्यावे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@