स्वरकोकिळा ‘कौशिकी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020   
Total Views |


Kaushiki Chakraborty_1&nb


भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक तरुण, उमदा आवाज म्हणजे कौशिकी चक्रवर्ती. त्यांच्या सुरेल कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...


देशातील आघाडीच्या तरुण शास्त्रीय गायकांमध्ये आज या गायिकेचे नाव सामील आहे. त्यांच्या मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक शास्त्रीय संगीतवेडी तरुण मंडळी गर्दी करतात. एखादा राग सादर करण्यामधील त्यांची निष्ठा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते आणि त्यांच्या ताना, सूरावट, हरकती आणि सरगमीने रसिक मंत्रमृग्ध होऊन जातात. वडिलांकडून मिळालेला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पटियाला घराण्याचा वारसा जपून त्यातूनही कर्नाटकी संगीताचे शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या गायकीला नवा आयाम दिला. अशा लोकप्रिय तरुण शास्त्रीय गायिका म्हणजे स्वरकोकिळा कौशिकी चक्रवर्ती.
 

कौशिकी यांचा जन्म कोलकत्यामध्ये २४ ऑक्टोबर, १९८० रोजी झाला. त्यांच्या घरात शास्त्रीय संगीताचे संस्कार होते. कारण, त्यांचे पिता म्हणजे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अजय चक्रवर्ती. कौशिकी यांची आई चंदना चक्रवर्ती यादेखील गायिका होत्या. त्यामुळे पाळण्यात असल्यापासूनच कौशिकींवर सुरांचे संस्कार झाले. वयाच्या दुसर्‍या वर्षापासूनच कौशिकी यांनी आपल्या बोबड्या बोलात गाण्यास सुरुवात केली. आई त्यांची पहिली गुरू ठरली. त्यानंतर वडिलांसोबत आंतरराष्ट्रीय मैफिलींमध्ये त्यांनी जाण्यास सुरुवात केली. या दरम्यान वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ‘कोलकाता रोईंग क्लब’च्या एक संगीत बैठकीत त्यांनी तराणा सादर केला आणि संगीत क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांचे गुरु ज्ञान प्रकाश घोष यांच्या अकादमीमध्ये शास्त्रोक्त भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरूवात केली. त्यानंतर ‘संगीत रिसर्च अकादमी’मधून २००४ साली संगीताच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
 
या अकादमीचे संचालक विजय किचलू यांच्याकडून कौशिकींनी ख्याल गायिकेचे धडे गिरवले. त्यानंतर कोलकात्यातील श्रुतीनंदन म्युझिक स्कूलमध्ये त्यांनी वडिलांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. या दरम्यान त्यांनी ‘ख्याल’ आणि ‘ठुमरी’ गायनात कौशल्य संपादित केले. वडिलांप्रमाणेच हिंदुस्थानी संगीताबरोबर त्यांनी विद्या बालामुरली कृष्णाकडून दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताचे ज्ञान मिळवले. संगीताबरोबरच त्यांनी आपले शिक्षणही २००२ साली पूर्ण केले. शास्त्रीय संगीताचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी खर्‍या अर्थाने सादरीकरणास सुरुवात केली. वयाच्या २०व्या वर्षापासून कौशिकींनी डोव्हर लेन संगीत परिषदेत सादरीकरण केले आणि पुढील पाच वर्षे त्या या महोत्सवात सहभागी होत होत्या. त्यांच्या गायनांमधील परिपक्वता आणि तालबद्ध हरकती व ताना प्रेक्षकांच्या मनाला भावल्या. फेब्रुवारी २०११ रोजी पुण्यात झालेल्या गायिका किशोरी आमोणकर यांच्या सन्मानार्थ झालेल्या दोनदिवसीय महोत्सवात कौशिकी यांनी राग ‘तोडी’ सादर केला. त्या महोत्सवात त्यांना खर्‍या अर्थाने शास्त्रीय गायिका म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर सप्टेंबर २०११ मध्ये मुंबईतील ‘एनसीपीए’ आयोजित संगीत महोत्सवात कौशिकी यांनी सादरीकरण गेले. त्यावेळीही सादर केलेल्या रागमालिकेमुळे त्यांचे कौतुक झाले.
 
त्यानंतर कौशिकी यांनी मागे वळून पाहिले नाही. देशातील महत्त्वाच्या शास्त्रीय संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी दमदार सादरीकरण केले. आयटीसी संगीत संमेलन, स्प्रिंग फेस्टिव्हल ऑफ म्युझिक (कॅलिफोर्निया), सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आणि परंपरा कार्यक्रम (लॉस एंजेलिस) या महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये त्यांनी आपले सादरीकरण केले. या संगीत सादरीकरणासाठी त्यांना पटियाला परंपरेचे मशालवाहक म्हणून गौरविले गेले. गाण्याबरोबरच कौशिकींनी बंगाली भाषेतील अनेक टॉक-शोचे सूत्रसंचालन केले. ‘रूपोशी बांगला’ या वाहिनीवरील ‘गाण-गोलपो रे गाण’ हा टॉक शो खूप गाजला. शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी बंगाली भाषेतील रवींद्र संगीत, लोक संगीत, टोपा, आधुनिक, बांगला बॅण्ड, चित्रपट संगीत आणि रिमिक्स गाणी गायली आहेत.
 
कौशिकी यांनी ‘सखी’ नावाचा शास्त्रीय संगीतावर आधारित महिलांचा बॅण्ड तयार केला. या ग्रुपचा पहिला कार्यक्रम २० जानेवारी २०१५ रोजी कलामंदिर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तसेच कौशिकी यांना तरुणपणीच अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९९५ मध्ये त्यांना ‘जाडू भट्टा पुरस्कार’ मिळाला. त्यानंतर २००० मध्ये आयटीसी संगीत संमेलनाकडून ‘आऊटस्टॅण्डिंग यंग पर्सन पुरस्कार’ आणि २००५ मध्ये ‘बीबीसी पुरस्कारा’ने त्यांना गौरविण्यात आले. यावेळी त्यांची भारतीय गायन संगीतामधील उज्ज्वल कलाकार म्हणून स्तुती करण्यात आली. तसेच ‘बीबीसी’ने त्यांच्या संगीत प्रवासावर लघुपट तयार करुन प्रसिद्ध केला. २०१० मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी त्यांना संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्लाह खान पुरस्कार’ मिळाला. २०१३ मध्ये ‘आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कार’ आणि ‘शेरा बंगाली पुरस्कारा’च्याही त्या मानकरी ठरल्या. अशा या गुणवान गायिकेच्या पुढील प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!
 
 

@@AUTHORINFO_V1@@