महिमा शाश्वत सत्य वाणीचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |


111_1  H x W: 0


ऋतमार्गावर चालणार्‍या मुलामुलींमुळे त्यांच्या माता-पित्यांचे, गुरुजनांचे व कुटुंबाचे लौकिक वाढीला लागते. अशी संतती म्हणजे एक प्रकारे त्या वंशाचे दीपस्तंभ होत. जगाच्या प्रेरक इतिहासात अशा प्रेरक सत्यवादी संततीमुळे त्या त्या वंशांची नावे अजरामर ठरली आहेत. आपल्या श्रेष्ठ गुण, कर्म व आचरणामुळे अनेक मुलामुलींनी आपल्या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण केली व आदर्श स्थापन केला.
 

ऋतस्य जिह्वा पवते मधुप्रियं
वक्ता पतिर्धियो अस्या अदाभ्य:।
दधाति पुत्र पित्रोरपीच्यां नाम
तृतीयमधिरोचनं दिव:॥
(ऋग्वेद-९/७५/२, सामवेद-७०१)
 

अन्वयार्थ

 


(ऋतस्य) शाश्वत सत्य बोलणार्‍यांची (जिह्वा) जीभ, वाणी ही (प्रियं) प्रिय आणि (मधु) गोड शब्दांना (पवते) प्रवाहित करते, (अस्या) अशा वाणीचा (वक्ता) वक्ता आणि (धिय:) व्यवहारबुद्धीचा (पति:) पालन करणारा, अशा या दोघांनाही या जगात (अ + दाभ्य:) कोणीही दाबू किंवा रोखू शकत नाही. (पुत्र:) असा सत्यवादी मुलगा (पित्रो) आपल्या माता-पित्यांच्या (अपीच्याम्) अज्ञात व गुप्त (नाम) कीर्ती व यशाला (दधाति) धारण करतो, प्रकाशित करतो. मग तो (तृतीयम्) उत्कृष्ट अशा तिसर्‍या (दिवे:) द्युलोकातदेखील (अधिरोचनम्) आपल्या त्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करतो.
 
विवेचन

 


या जगात सत्यवादी व प्रामाणिकपणे जीवन जगणार्‍या पुरुषांची ओळख कोणती, ते कसे जगतात आणि ते आपल्या आईवडिलांकरिता व गुरुजनांकरिता कसे उपयुक्त ठरतात, या संदर्भात वरील मंत्रात प्रकाश टाकला आहे. या मंत्रात ‘ऋत’ हा शब्द अतिशय मौलिक अर्थाला प्रकट करतो. ‘ऋत’ म्हणजे सृष्टीचे शाश्वत नियम! जे की कधीही बदलत नाहीत. जे सदैव अखंडितपणे टिकून राहतात. कोणीही त्यात परिवर्तन घडवू शकत नाही अथवा ईश्वराच्या त्या शाश्वत नियमांना कोणीही बदलू शकत नाही. म्हणूनच ‘ऋत’ या शब्दात महदाशय दडल्याचे दिसून येते. याच अर्थासारखा ‘सत्य’ हादेखील शब्द प्रचलित आहे. जे प्रामाणिक व खरे असते, त्याला ‘सत्य’ असे म्हणतो. पण, ‘ऋत’ आणि ‘सत्य’ या दोन शब्दांमध्ये फार फरक आहे. ‘सत्य’ बदलू शकते, पण ‘ऋत’ मात्र कधीच बदलणार नाही. ‘ऋतवाणी’ म्हणजे न बदलणारी वाणी, तर ‘सत्यवाणी’ म्हणजे बदलणारी वाणी! जे ऋषिमुनी व महापुरुष असतात, त्यांच्या मुखातून ‘ऋतवाणी’ बाहेर पडते. तिलाच आपण ‘अमृतवाणी’ असेही म्हणतो, पण सामान्य लोक जे काही खरे बोलतात किंवा ‘सत्यवाणी’ उच्चारतात, ती ‘सत्यवाणी’ होय. त्यांचे सत्य हे पूर्णांशाने शाश्वत सत्य असतेच असे नाही. ते पदोपदी बदलू शकते. पण, ऋषी व संतमहात्म्याचे मात्र कदापि असे होऊ शकत नाही. त्यांच्या वाणीमागे सृष्टीचे शाश्वत नियम दडलेले असतात. त्यांचेकडे अपरिवर्तनीय सत्य असते. ते आपले ऋततत्त्व आहे. केवळ वाणीतून नव्हे, तर व्यवहारातूनदेखील अभिव्यक्त करतात. आत्मा, परमात्मा आणि निसर्गविज्ञान यांना प्रमाण म्हणून ते बोलत असतात. ते पूर्णतया विश्वसनीय, स्वीकार्य आणि सर्वथा शुद्ध व पवित्र असते. अशा या अखंडित व निसर्गनियमांना अनुसरून असलेल्या ऋततत्त्वांमध्ये विजय दडलेला असतो. तो कदापीही पराजित होऊ शकत नाही. यासाठी उपनिषदांनी म्हटले आहे - ‘सत्यमेव जयते नानृतम्।’ हे आपल्या देशाचे बोधवाक्य देखील आहे. इथे ‘सत्यम्’साठी ‘ऋतम्’ म्हटले आहे. कारण, पुढे ‘न + अन् + ऋतम्’ हा शब्द आल्याने सत्यासाठी ‘ऋत’ हा शब्द ग्राह्य धरणे संयुक्तिक ठरते. मंत्रात ऋषी म्हणतात - ‘ऋतस्य जिह्वा पवते मधुप्रियम्।’ जे ऋतगामी असतात किंवा शाश्वत अशा सृष्टी नियमांप्रमाणे चालणारे असतात, ज्यांची जीभ ही प्रिय व गोड अशाच शब्दांना उच्चारण करते. प्रिय हे मन, इंद्रिय किंवा शरीर यासाठी नव्हे, तर आत्म्यासाठी! मन व इंद्रिय हे बहिर्मुखी असल्यामुळे त्यांना या जगातील काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्षा-द्वेष, अहंकार या दोषांतून निर्माण होणारे विषय आवडतात. याउलट आत्म्याला मात्र दया, करुणा, प्रेम, सहिष्णुता, परोपकारभक्ती उपासना या सद्गुणांतून उत्पन्न होणारे आध्यात्मिक विषय आवडतात. म्हणूनच ऋतमार्गावर चालणार्‍या लोकांची वाणी ही नेहमी वैश्विक कल्याणाच्या गोष्टी व्यक्त करते. त्यांच्या मुखातून सदैव मानवतेच्या शाश्वत मूल्यांचा प्रवाह वाहतांना दृष्टीस पडतो. जे बोलावयाचे आहे, ते चांगलेच...! वाईट कदापि नाही. संत ज्ञानेश्वर अशा या महापुरुषांच्या ऋत(अमृत) वाणीचा महिमा व्यक्त करताना म्हणतात –

 

 


साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ।
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे॥

 

 


आपले शब्द हे ‘अमृताचे कल्लोळ’ कधी बनतात, तर त्याकरिता ‘साच’ म्हणजे ‘सत्य’ आणि ‘मवाळ’ म्हणजेच ‘मधाळ’ किंवा गोड! तसेच ते अल्प आणि रसयुक्त असावेत. जेणेकरून ते सर्वांना आवडतील आणि सर्वजण आनंदात राहण्याच्या दृष्टीनेदेखील उपयुक्त ठरतील. ईश्वराने मानवाला दिलेली जीभ ही दोन प्रकारची कामे करते. एकतर ती पदार्थांचे रसास्वादन करते आणि दुसरे म्हणजे इतरांशी नाते जोडण्याकरिता पवित्र अशा शब्दांचे उच्चार करते. म्हणूनच हिला ‘रसना’ व ‘रदना’ असे म्हणतात. घेताना सात्त्विक व शुद्ध आहारांचे ग्रहण तर बोलताना ‘ऋत’ व पवित्र’ शब्दांचे प्रतिपादन! या दोन कार्यांसाठी मिळालेले हे मोठे ईश्वरीय वरदान होय. म्हणूनच या वाक् इंद्रियांचा सदुपयोगच व्हावयास हवा. आपण साधारण लोक मात्र मनाला वाटेल ते, व नको ते काहीही बोलतो. पदोपदी खोटे बोलतो. शब्दांची हेराफेरी करतो. याचा परिणाम मात्र चांगला कधीच होत नाही. एक असत्य लपविण्याकरिता दहा वेळा असत्याचे उच्चार करतो. यामुळे आपणास कधीही सुख किंवा आनंद लाभणार नाही. जे काही मिळाले तेदेखील टिकून राहणार नाही. याउलट ऋततत्त्वाचे अनुगामी संत-महात्मे हे सर्वांच्या आत्म्याला व हृदयाला रुचेल, आवडेल असेच प्रिय व गोड बोलत असतात. कारण, ते शब्दांना जागणारे असतात. प्राणाहूनही त्यांना आपली वचने प्रिय वाटतात. रघुकुळातील राजांची आदर्श परंपरा ही त्यांच्या ऋतवाणीमुळेच तर आजही विश्ववंदनीय ठरली आहे. असत्य उक्ती किंवा वाक्य परिवर्तन हे त्यांच्या जीवनी मुळीच नव्हते. म्हणूनच संत तुलसीदासदेखील म्हणतात-

 

 


रघुकुल रीत सदा से चली आई।
प्राण जाए पर वचन न जाई ॥

 

 


केवळ बोलणेच नव्हे, तर वागणेदेखील ‘ऋत’ असावे. प्रथमदर्शनी वाणीचा प्रभाव सामान्य लोकांवर किंवा श्रोत्यांवर टाकता येतो, पण वक्त्यांचे विपरीत आचरण दिसले की लोक त्यांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचे हे बोलणे हवेत विरून जाणारे ठरते. याउलट आपल्या सत्य व्यवहाराचा प्रभाव मात्र चिरकाळ श्रोत्यांच्या मनावर वर हृदयावर साम्राज्य स्थापन करणारा असतो. यासाठी तर उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असे आपण नेहमीच म्हणतो. अशा उक्ती व कृतीची एकरूपता व समानता असलेल्या सत्पुरुषांना या जगात कोणीही रोखू शकत नाही. कोणीही त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. कारण, त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये समाज व राष्ट्राचे सर्वांगीण हित सामावलेले असते. मानवमात्राचे व प्राणिसमूहाचे कल्याण करण्यात ते अहर्निश तल्लीन झालेले असतात. दुःखितांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांचे समग्र जीवन समर्पित झालेले असते. त्यांचे बोलणे म्हणजे मांगल्याची अभिव्यक्ती आणि उत्तम वागणे म्हणजे जणू काही आदर्शांची दिव्योत्तम प्रेरणा होय. म्हणूनच या जगात त्यांचा कुणीही शत्रू होऊ शकत नाही. सारेजण त्यांचे मित्र बनतात. कारण, ते सत्य वक्ते आणि व्यवहार बुद्धीचे पालनकर्ते असतात. मग अशांना कोण दाबणार आणि कोण रोखणार? त्यांची आदर्श जीवनाची अथांग ज्ञानाची व कर्माची पावन गंगा ही अनिर्बंधपणे सतत वाहतच राहते. त्यांच्या या जीवनप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. किंबहुना, दुष्ट प्रवृत्तीचे लोक अनेक अडचणी निर्माण करतात, पण असे हे थोर ऋतमार्गी सुजन मात्र कदापि थांबत नाहीत. ते संकटांना कधीही घाबरत नाहीत. दुर्जनांनी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही ते आपल्या सत्यमार्गावर दृढपणे चालतच राहतात. या सृष्टीव्यवस्थेत ऋतमार्गावर चालणार्‍या मुलामुलींमुळे त्यांच्या माता-पित्यांचे, गुरुजनांचे व कुटुंबाचे लौकिक वाढीला लागते. अशी संतती म्हणजे एक प्रकारे त्या वंशाचे दीपस्तंभ होत. सदरील मंत्राच्या उत्तरार्धात हा भाव विशद झाला आहे. जगाच्या प्रेरक इतिहासात अशा प्रेरक सत्यवादी संततीमुळे त्या त्या वंशांची नावे अजरामर ठरली आहेत. आपल्या श्रेष्ठ गुण, कर्म व आचरणामुळे अनेक मुलामुलींनी आपल्या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण केली व आदर्श स्थापन केला. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या आदर्श जीवनामुळे दशरथ व कौशल्य या मात्या पित्यासह समग्र रघुकुळाचे नाव जगासमोर आले. योगेश्वर श्रीकृष्णांच्या प्रेरक सच्चारित्र्यामुळे वसुदेव व देवकी यांची कीर्तीपताका जगात उंचावली व यदु वंशाचाही नावलौकिक झाला. अलीकडील काळात छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली जीवन व कार्यामुळे राजे शहाजी व माता जिजाऊंचे उज्ज्वल जीवन विश्वाच्या माणसपटलावर कायमचे कोरले गेले. असे कितीतरी पुत्र आहेत की, ज्यांनी आपल्या प्रखर ऋत्तकार्यामुळे आपल्या वंशाचा कीर्ती ध्वज उंचावला आणि आजही ते सर्वांकरिता प्रेरणेचे दीपस्तंभ ठरले आहेत.
 

 

 

-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 

@@AUTHORINFO_V1@@