मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील `राजगृह`वर झालेल्या हल्लाप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीतील चेहऱ्याशी साधर्म्य असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तेथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी राजगृहबाहेरच्या फुलझाडांची नासधूस केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून पळ काढला. या घटनेचे वृत्त पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात तीन वायरलेस आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आला आहे. तसेच राजगृह परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिसरातील रस्ते वाहतूक सुरू असली तरी वाहनांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवले असता यातील संशयिताची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीशी मिळत्या जुळत्या व्यक्तीने ६ जुलै दरम्यान पाऊस सुरु असल्याने राजगृह परिसरात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले होते, अशी माहिती सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर संशयित व्यक्तीची चौकशी सुरू आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबेडकर कुटुंबीयांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिले असून संबधित माथेफिरू हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयीताचा नासधूस करण्यात सहभाग आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मालमत्तेत विनापरवानगी शिरणे, मालमत्तेची नासधूस करणे आदी विविध कलमांतर्गत याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राजगृहावरील हल्ला निषेधार्ह आहे. मात्र आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू आहे. त्यामुळे कुणीही राजगृह परिसरात येऊ नये. तुम्ही राहत असलेल्या जिल्हाधिकारी-तहसिलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करा. पण लॉकडाऊनच्या नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.