जखमी ‘ड्रॅगन’ अधिक धोकादायक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020   
Total Views |


Xi Jinping_1  H


गलवान भागात चीनला माघार घ्यावी लागली. पण, आपण झुकलो असे चित्र जगासमोर गेले तर ‘आसियान’मधील आपले छोटे शेजारीही आपल्याकडे डोळे वटारुन पाहतील, याची चीनला पुरती जाणीव आहे. त्यामुळे चीन लवकरच भारताची खोडी काढण्याचा प्रयत्न करेल.


आपल्याकडे अशी म्हण आहे की, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगले. पण, आंतरराष्ट्रीय संबंध हे पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या कथेप्रमाणे संपणारे नाहीत. जोपर्यंत देश आहेत, तोपर्यंत त्यांचे परस्परांशी संबंध राहणार आहेत. क्रिकेटचा एकदिवसीय सामना निकाली ठरतो. पण, कसोटी सामन्यात दर सत्रात चित्र बदलू शकते आणि अनेकदा सामना अनिर्णित राहू शकतो. भारत आणि चीन यांच्यात गेले दोन महिने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उद्भवलेली तणावाची परिस्थिती ५ जुलै रोजी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमधील सुमारे दोन तासांच्या सविस्तर आणि मनमोकळ्या चर्चेनंतर निवळू लागली आहे. गलवान नदीच्या खोर्‍यात तसेच हॉट स्प्रिंग्स आणि घोगरा भागात दोन्ही देशांनी आपापली सैन्यं दीड ते दोन किमी मागे घेतली असून ड्रोनद्वारे परस्परांच्या माघारीवर लक्ष ठेवले जात आहे. एका लष्करी राहुटीत तीसहून अधिक सैनिक असणार नाहीत, याबाबतही दोन्ही देशांमध्ये मतैक्य झाले आहे. याबाबत भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकांमध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये मतभेदांचे वादांमध्ये रुपांतर होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचा उल्लेख आहे. भारताच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तर चीनच्यावतीने परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी आपापल्या देशांचे विशेष प्रतिनिधी म्हणून या चर्चेत भाग घेतला.

 
१५ जून रोजी गलवान आणि श्योक नदीचा संगम होतो, त्या भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये माघार घेण्याबाबत मतैक्य होऊनही चीनने राहुटी उभारल्यावरुन भारतीय आणि चिनी सैनिकांतील वादाचे पर्यवसान हिंसक झटापटीत झाले. चिनी सैनिकांनी अनपेक्षितरित्या लोखंडी तारा आणि खिळे लावलेल्या काठ्यांचा हल्ल्यासाठी वापर केला. भारतीय सैनिकांनीदेखील त्याला चोख उत्तर दिले. या झटापटीमध्ये भारताच्या तीन सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले. कडाक्याची थंडी, ऑक्सिजनचे हवेतील कमी प्रमाण आणि वातावरणाचा कमी दाब यामुळे जायबंदी झालेल्या आणखी १७ भारतीय सैनिकांना वीरमरण आले. या झटापटीत मोठ्या संख्येने चिनी सैनिकही मारले गेले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संभवित युद्धाचे नगारे वाजायला लागले. चीनने अक्साई चीन भागात मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केली असली तरी यावेळी १९६२, खरंतर १९५०च्या दशकासारखी परिस्थिती नव्हती.
 
भारताने चीनच्या या दबावतंत्राला उत्तर देण्यासाठी सर्व पर्यायांची चाचपणी सुरु केली. ‘टिकटॉक’सह ५९ चिनी मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. सीमा भागात तैनात वाढवली. विविध मंत्रालयांनी आपल्याकडून निघणार्‍या कंत्राटांत चिनी कंपन्यांना सहभागी होण्यास बंदी घातली, तसेच दिलेली कंत्राटे रद्द केली. सीमा भागातील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करुन बंदरात येणार्‍या सर्व चिनी मालाची तपासणी सुरु झाल्याने कोट्यवधी रुपये किमतीचा माल प्रवासात अडकून राहिला. यातून चिनी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना मोठा फटका बसू लागला. दरम्यानच्या काळात परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पिओ यांची सविस्तर चर्चा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणुका आणि ‘कोविड- १९’मुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणि राजकीय संघर्षात गुंतले असताना पॉम्पिओ यांनी भारताच्या चिनी अ‍ॅपवरील बंदीची पाठराखण केली. ५-जीबाबतही त्यांनी चीनवर टीका केली. या सर्व प्रयत्नांवर कळस चढवला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. स्वतः लडाखला भेट देऊन पंतप्रधानांनी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधला, तसेच लष्करी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी सैनिकांची विचारपूस केली. लडाखमधील निमू येथील पंतप्रधानांच्या भाषणामुळे तसेच त्यांनी आवर्जून केलेल्या सिंधुपूजनामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि त्यातही सुमारे ९८ वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पंतप्रधानांनी लडाखला भारतमातेच्या मस्तकाची उपमा देऊन ही भूमी १३० कोटी भारतीयांच्या सन्मानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. कुशॉकबकुला रिनपोंछेंचे स्मरण करुन कशाप्रकारे त्यांनी स्थानिक जनतेला एकत्र करुन शत्रूचे अर्थात चीनचे इरादे सफल होऊ दिले नव्हते याची आठवण करुन दिली. ‘खड्गेन आक्रम्य भुञ्जित:’, ‘वीरभोग्या वसुंधरा’ हे वचन उद्धृत करुन त्यांनी सैनिकांना केवळ तलवारीच्या जोरावरच मातृभूमीचे रक्षण करता येते, याची आठवण करुन दिली. आपल्या भाषणात त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून, महान संत तिरूवल्लुवर ते राष्ट्रकवी दिनकर यांच्या पंक्तींचा समावेश करुन या परिस्थितीत संपूर्ण देश एक असल्याचे सांगितले. चीनचे नाव न घेता त्यांनी विस्तारवादाच्या युगाचा अंत झाला असून हे विकासाचे युग असल्याचे ठणकावून सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात सिंधू नदीमुळे भारताला आणि भारतीयांना ‘हिंदू’ हे नाव प्राप्त झाले असून पश्चिमवाहिनी सिंधू नदी, या नदीचीच पूर्ववाहिनी शाखा समजली जाणारी ब्रह्मपुत्रा आणि सिंधू (हिंद) सागर या ऐतिहासिक काळापासून भारताच्या भौगोलिक सीमा असल्याचे प्रतिपादन केले आहे.
 
 
डेंग शाओपिंग यांच्या अध्यक्षकाळात चीनने जागतिकीकरणाची कास धरताना आर्थिक विकास आणि व्यापारावर लक्ष केंद्रित केले. हे आशियाचे युग असल्याची भूमिका घेऊन आपल्या शेजारी देशांशी सहकार्यावर चीनने भर दिला होता. पण, शी जिनपिंग चीनच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी चीनच्या परराष्ट्र धोरणात आक्रमकता आणली आहे. २१वे शतक हे चीनचे शतक असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली असून ऐतिहासिक काळातील दाव्यांवर चीनच्या भौगोलिक सीमा आखण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे केवळ लडाखमधील गलवान खोरे आणि पँगाँग सरोवरातील परिसरातच नाही, तर भूतान, अरुणाचल प्रदेश यासह दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागर सुदूर बेटांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे व्हिएतनाम, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, जपान आणि फिलिपिन्ससारख्या देशांशी चीनच्या संबंधांत वितुष्ट आले आहे. यात चीनच्या ‘अरेला का रे’ करण्याची हिंमत फक्त भारत आणि व्हिएतनाम दाखवू शकतात. कारण, दोघांनाही युद्धांचा प्रदीर्घ अनुभव आहे. पूर्वीच्या दरोडेखोरांवर आधारित चित्रपट कथांमध्ये दरोडेखोरांची टोळीने गावावर हल्ला केला असता, काही मागणी करण्यापूर्वी, जरब बसवण्यासाठी हे दरोडेखोर जे आपल्याला विरोध करु शकतील, अशा दोन-चार लोकांना गोळ्या घालायच्या तसा काहीसा प्रयत्न चीनने केला. भारत जर दबावाखाली झुकला तर अन्य आशियाई राष्ट्रांची डोके वर काढण्याची हिंमत होणार नाही, असा त्यांचा अंदाज असावा. पण, भारताने धाडस आणि राष्ट्रीय निश्चयाचे प्रदर्शन करुन चीनला चोख उत्तर दिले. त्यामुळे गलवान भागात चीनला माघार घ्यावी लागली. पण, आपण झुकलो असे चित्र जगासमोर गेले तर ‘आसियान’मधील आपले छोटे शेजारीही आपल्याकडे डोळे वटारुन पाहतील, याची चीनला पुरती जाणीव आहे. त्यामुळे चीन लवकरच भारताची खोडी काढण्याचा प्रयत्न करेल. भूतानच्या पूर्व भागात, अरुणाचल प्रदेशमधील तवांगला लागून असलेल्या भागावर दावा सांगून चीनने तशी चुणूक दाखवली आहे. त्यामुळे लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा परिसरातून दोन्ही देशांच्या सैन्य माघारीचे स्वागत करत असताना अन्य सीमाभागांकडे, ज्यात सागरी सीमांचाही समावेश आहे, भारताने डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यायला हवे.
 

@@AUTHORINFO_V1@@