जनसेवा ही ईश्वरभक्ती : कोकणवासीयांच्या मदतीला ‘नमस्ते फाऊंडेशन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020   
Total Views |


Sanchit Yadav_1 &nbs




चित्रपट कलाकार, दिग्दर्शक म्हणून संचित यादव सगळ्यांनाच परिचित. पण, कलाक्षेत्रातील ‘हिरो’ असलेले संचित सध्या जनजीवनातही सत्कार्यातही ‘हिरो’च आहेत. कोरोनाच्या भीतीने जगाला गर्भगळीत केले आहे. ज्यांनी लोकांना या काळात मदत करायला हवी ते आज घरात बसून राहिल्याचे चित्रही आहे. या परिस्थितीमध्ये संचित यादव आणि त्यांच्या पत्नी पूर्णिमा या समाजासाठी झोकून काम करत आहेत. रा. स्व. संघ, जनकल्याण समिती, तसेच ‘नमस्ते फाऊंडेशन’च्या माध्यमातून ‘कोरोना योद्धा’ म्हणून ते कार्य करीत आहेत. या कार्याचा घेतलेला आढावा.



जनसेवा ही ईश्वरभक्ती
बोध यातला उमजूया
विश्वासाने बंधुत्वाने
नाते सर्वां सांगू या


मी एक संघस्वयंसेवक. संघशाखेत गायलेले हे गीत माझ्या आयुष्याची प्रेरणा आहे. देश किंवा समाजावर एखादे संकट आले की, कुणाच्या मदतीची प्रतीक्षा न करता आपण पुढाकार घेऊन जनसेवा करावी, हे संघशाखेतून शिकलो. मला वाटते कोरोना संकटकाळात कार्य करण्यासाठी हेच कारणीभूत आहे,” ‘नमस्ते फाऊंडेशन’चे अध्यक्ष संचित यादव सांगत होते. संचित यादव ‘बे एके बे’ या मराठी चित्रपटामुळे तसे सर्वांना परिचित. त्यांच्या पत्नी पूर्णिमा यासुद्धा सिनेअभिनेत्री. ‘माझी शाळा’, ‘भाकर’, ‘एक कुतुब तीन मिनार’, ‘बे एके बे’,‘भूतीयापंती’ या चित्रपटात त्यांनी काम केलेले. पूर्णिमा यांना इंटरनॅशनल फेस्टिव्हल बेस्ट अ‍ॅक्टरेसम्हणून नामांकनही मिळाले आहे. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेतले हे जोडपे आज समाजकार्याचा वसा घेऊन कोकणातल्या गावखेड्यात काम करत आहेत. खानवली, पावस, सापुचेतले ,चांदोर, भडे,बेनी, शिवार आंबेरे, गावडे आंबेरे, दोन आंबा, कोट, चिंचवड, बेनी बुद्रुक, नाखरे, नेरुळ, पेवखळ अशा १५ गावांमध्ये ते कोरोनाच्या संकटात काम करत आहेत. त्यांच्यासोबत विजय पवार, अजय पवार, प्रथम सितारे ही काही मित्रमंडळी आहेत.
 
संचित यादव आणि पूर्णिमा यादव यांनी ६०० कुटुंबीयांना रेशनकिट दिले आहे. या किटमध्ये कांदे, बटाटे, मीठ, तेल, तिखट मसाला, गरम मसाला, दोनप्रकरच्या डाळी, चण्याचे पीठ, हळद, साखर, चहा पावडर, माचीस अशा प्रकारे जीवनोपयोगी वस्तू आहेत. तसेच रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून गावपाड्यातल्या प्रत्येक घरात ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्यांचे वितरणही केले आहे. तसे पाहायला गेले तर सध्या देशभर हा उपक्रम सुरू आहे. पण, संचित आणि पूर्णिमा यांचे कौतुक यासाठी की शहरातली ही मंडळी गावाकडे वळली. दुर्गम-गावपाडे. जिथले प्रत्येक घरातला कर्ता पुरुष मुंबईचा चाकरमानी. कोरोनामुळे चाकरमान्यांचे अर्थचक्र ठप्प झाले. त्यामुळे या चाकरमान्यांचे कोकणातल्या घराचेही अर्थकारणही ठप्प झाले. काही चाकरमानी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोकणात आपापल्या घरी दाखल झाले. पण, खूप जण इच्छा असूनही कोकणात परतू शकली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात गावातल्या कित्येक घरात केवळ वृद्ध माता-पिताच असल्याचेही चित्र होते. ते माता-पिताही शहरातल्या आपल्या मुलाच्या चिंतेत आणि मुलगा गावी असलेल्या आई-बाबांच्या चिंतेत. त्यांना धीर देणे, त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे होते. नेमके हे कामही यादव दाम्पत्यांनी केले.
 
गावागावात, खेड्यापाड्यात वस्तीपातळीवर संचित आणि पूर्णिमा यांनी सर्वेक्षण केले. त्यानुसार त्यांनी त्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्यांची गरज काय आहे? अन्नधान्याच्या गरजेसोबत त्यांना काही वैद्यकीय किंवा इतरही मदत हवी आहे का, याबाबतही संचित यांनी सर्वेक्षण केले. त्यानुसार या लोकांना रेशनकिट आणि इतरही मदत केली गेली. अशातच कोकणात ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले. या वादळाने होत्याचे नव्हते केले. यावेळी कोकणवासीयांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसले ते संचित यादव यांनी. संचित यादव यांचे मूळ गाव पुणे, तर राहतात मुंबईमध्ये. मग कोकणात सेवाकार्य कसे सुरू झाले? तर संचित यांची पत्नी पूर्णिमा यांचे आजोळ कोकणात. ‘बे एके बे’ चित्रपट बनवताना त्यांना विद्यार्थ्यांच्या भूमिकेसाठी काही लहान मुले-मुली हवी होती. एका मध्यस्थाच्या माध्यमातून कोकणातून ती मुले निवडली गेली. पुढे चित्रपट प्रकाशित झाला. त्यानंतर काही कामानिमित्त संचित पुन्हा कोकणातल्या गावी आले, तर मासळी बाजारात त्यांना ‘ती’ मुलगी दिसली. ‘ती’ मुलगी जिने त्यांच्या चित्रपटात काम केले होते. शाळा सोडून ही मासळी विकते? संचित यांना प्रश्न पडला. ते तिच्याकडे गेले आणि तिला याबाबत विचारले. तेव्हा तिने जे सांगितले, ते संचित आणि पूर्णिमासाठी धक्कादायक होते. चित्रपटात भूमिका केली म्हणून या मुलांना संचितने रोख रक्कम, मानधन देण्याचे ठरले होते. संचितने चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यावर या सर्व मुलांचे पैसे ताबोडतोब त्या मध्यस्थाकडे सुपूर्दही केले होते. मात्र, त्या मध्यस्थाने मुलांना पैसे दिलेच नाहीत. त्याने परस्पर ते पैसे गिळंकृत केले. संचित आणि पूर्णिमा यांना हे ऐकून खूप वाईट वाटले. ते त्या मुलीच्या घरी गेले. पालकांशी बोलले. पालक तर ओरडायलाच लागले, “तुमच्यामुळे मुले कामधंदे सोडून शूटिंग करायला गेली. तेवढ्या दिवसांची त्यांची रोजंदारी गेली.” वगैरे वगैरे.. संचित यांनी पुन्हा ‘बे एके बे’ चित्रपटात काम केलेल्या सर्व मुलांना भेटले. सगळ्यांची घरची स्थिती हीच. संचित यांनी सर्व मुलांना त्यांच्या हिशोबाचे पैसे दिले. त्यांची एक सहल काढली. त्यांचे प्रश्न समजून घेतले. या सर्व मुलांना शिकायचे होते. संचित आणि पूर्णिमा यांनी मुलांसाठी काम करायचे ठरवले. ईश्वराच्या कृपेने त्यांची इतकी ऐपत होती की, ते या मुलांचा खर्च उचलू शकत होते. त्यांनी सुरुवातीला या १५ मुलांना दत्तक घेतले. त्यांचा सर्वांगीण खर्च उचलला. त्यातल्या काही मुलांनी आज दहावीची परीक्षा दिली आहे. संचितचे नि:स्वार्थी काम पाहून अनेक जण त्याच्यासोबत जोडले गेले. आज महाराष्ट्रातल्या शेकडो मुलांचा खर्च संचित आणि पूर्णिमा करत आहेत. सगळ्या समाजकार्याला नियमित स्वरूप मिळावे म्हणून मग त्यांनी ‘नमस्ते फाऊंडेशन’ची निर्मिती केली. महाराष्ट्रभर ‘नमस्ते फाऊंडेशन’चे कार्यकर्ते आहेत. ‘नमस्ते फाऊंडेशन’ मुख्यत: शैक्षणिक क्षेत्रात काम करते. गरजू गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च करते.
 
या मुलांच्या माध्यमातून ‘नमस्ते फाऊंडेशन’ आणि संचित, पूर्णिमा कोकणाशी जोडले गेले. कोरोनाच्या काळात या मुलांच्या घरची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेताना त्यांना दिसले की कोरोनाने या मुलांच्या घरची परिस्थिती पूर्वीपेक्षाही बिकट झाली आहे. तसेच याच मुलांच्या घरची परिस्थिती नाही तर कित्येक जणांवर भूकमारीची वेळ आली आहे. त्यातही वृद्ध, अपंग आणि एकट्या महिलेवर अवलंबून असलेल्या कुटुंबांची स्थिती तर अतिशय हलाखीची झालेली. या सर्वांना जमेल तितकी मदत करावी असे संचित आणि पूर्णिमा यांनी ठरवले. त्यातूनच कोकणातले कोरोना आपत्काळातले काम सुरू झाले. संचित आणि पूर्णिमा यांनी आवाहन केले आहे की, नुसते कोकणच नाही तर महाराष्ट्रात जिथे जिथे गरजू आहेत त्यांना मदत करायची आहे. त्यासाठी दानशूर समाजशील व्यक्तींनी एक हात मदतीचा द्यावा. एका रेशनकिटची किंमत साधारण ६०० रुपये असते. त्यासाठी दानशूरांनी समाजहितचिंतकांनी पुढे यावे. संचित आणि पूर्णिमा या दोघांकडे पाहून वाटते की, खरेच आज समाजात अशा संवेदनशील, परोपकारी व्यक्ती आहेत, म्हणूनच जग हे असंख्य संकट झेलत पुन्हा पुन्हा समर्थपणे उभे राहते. खरेच आहे, जनसेवा ही ईश्वरभक्ती...!
 

(संपर्क : संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ, यादव, ८९२८०५३०५२ / ९८७०४६७८६०)

 
 
@@AUTHORINFO_V1@@