चिनी मित्रत्व की जागतिक शत्रुत्व?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020   
Total Views |


Pak China_1  H

 

 

 

 
व्यापाराच्या बाबतीतही, पाकिस्तान-चीनमधील व्यापारी तूट ही १० अब्ज डॉलरहून अधिक आहे. यावरुन पाकिस्तान चीनवर किती जास्त अवलंबून आहे, ते लक्षात येते. जागतिक पातळीवरही पाकिस्तान चीनच्या पंखांखालीच वावरतो. त्यामुळे चीनसोबतचे मित्रत्व कायम ठेवायचे की जगाचे शत्रुत्व पत्करायचे, अशा एकीकडे विहीर, तर दुसरीकडे दरी अशा परिस्थितीत आज पाकिस्तान गोंधळलेला दिसतो.



देशावर संकटं आली की ती बरेचदा चहुबाजूंनी घेरतात. नेतृत्वाची सत्वपरीक्षा पाहतात. पण, जर देशाचे नेतृत्व खमके, कणखर आणि आत्मविश्वासाने भारलेले असेल, तर या संकटांचा सामना नेतृत्वाबरोबर देशही तितक्याच जिद्दीने, ताकदीने करतो. याबाबतीत आपण नशीबवान असलो तरी शेजारी पाकिस्तानात मात्र नेमकी विपरीत परिस्थिती. कोणे एकेकाळी पाकिस्तानी क्रिकेट संघाची शान, माजी कप्तान असलेले इमरान खान पंतप्रधान म्हणून मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्यकाळात केवळ आर्थिक, औद्योगिक क्षेत्रांतच पाकिस्तानची पिछेहाट झालेली नाही, तर पाकिस्तानमधील पंजाब सोडल्यास जवळपास सर्वच प्रांतांमध्ये ‘आझादी’चे नारे आणखीन बुलंद झाले आहेत. पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरुन तेथील अस्थितरतेचा आणि चीनबरोबरच्या मित्रत्वाची परीक्षा पाहणार्‍या घटनांंचा अंदाज यावा.
 

त्यातील पहिली आणि दखलपात्र घटना म्हणजे, जागतिक पटलावर वाढत्या चीनविरोधामुळे पाकिस्तानचीही कोंडी होण्याची भीती आता त्यांच्याच परराष्ट्र खात्याने पंतप्रधान कार्यालयाला रीतसर कळवली आहे. त्यामुळे आता चीनसोबतच्या संबंधांचा नव्याने पुनर्विचार करण्याची गरज पाकिस्तानी परराष्ट्र खात्याला भेडसावू लागली. पाकिस्तानची चिंताही तशी रास्तच म्हणा. कारण, त्यांचा मित्र, कर्ताधर्ता, दाता असलेल्या चीनला आधी कोरोनाचा फैलाव आणि आता भारताशी झालेल्या आगळीकीनंतर जागतिक पातळीवर एकाकी पाडण्याचे सर्वोपरी प्रयत्न सुरु आहेत. मग मुत्सद्देगिरीचा मार्ग असो वा आर्थिक हितसंबंध, अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रेही चीनला धडा शिकवण्यासाठी सज्ज आहेत. त्यात भारताने चीनवर केलेल्या अ‍ॅप्सबंदीच्या ‘डिजिटल स्ट्राईक’नंतर अमेरिका, ऑस्ट्रेलियानेही भारताच्या पावलावर पाऊल टाकण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे चीनबरोबरच पाकिस्तानचीही तितकीच तंतरलेली दिसते. ‘शत्रूचा मित्र तो आपलाही शत्रूच’ या नीतीने जागतिक पटलावर चीनबरोबर पाकिस्तानचीही कोंडी होऊ शकते. खरंतर त्याची सुरुवातही झाली आहे. पाकिस्तानी वैमानिकांच्या फर्जी परवान्यांचे कारनामे नुकतेच उघडकीस आले. त्यानंतर लगेचच युरोपियन युनियनने पाकिस्तानमधील सर्व विमानांच्या प्रवेशावर युरोपमध्ये बंदीची घोषणा केली. त्यातच चीनची साथ दिल्यास पाकिस्तान आगामी काळात ‘एफएटीफ’च्या ‘ग्रे’ यादीतून काळ्या यादीतही जाऊ शकतो. तसे झाल्यास पाकिस्तानचे जागतिक मदतीचे सर्व दरवाजेही बंद होतील आणि आधीच कर्जबाजारी झालेला हा देश पूर्णत: डबघाईला येईल. पण, दुसरीकडे चीनशी संबंध तोडणे तर दूरच, चीनवरील परावलंबित्व कमी करणेही आजघडीला पाकिस्तानसाठी शक्य नाही. पाकिस्तानच्या एकूण कर्जांपैकी ७५ टक्के देणे हे एकट्या चीनचे आहे. शिवाय ‘सीपेक’मध्येही चीनची अब्जावधींची गुंतवणूक असून पाकिस्तान त्या कर्जाच्या बोज्याखाली दबलेला आहे. पाकिस्तानात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांमध्येही बहुतांशी कामगार हे चिनीच आहेत. व्यापाराच्या बाबतीतही, पाकिस्तान-चीनमधील व्यापारी तूट ही १० अब्ज डॉलरहून अधिक आहे. यावरुन पाकिस्तान चीनवर किती जास्त अवलंबून आहे, ते लक्षात येते. जागतिक पातळीवरही पाकिस्तान चीनच्या पंखांखालीच वावरतो. त्यामुळे चीनसोबतचे मित्रत्व कायम ठेवायचे की जगाचे शत्रुत्व पत्करायचे, अशा एकीकडे विहीर, तर दुसरीकडे दरी अशा परिस्थितीत आज पाकिस्तान गोंधळलेला दिसतो.
 
उघूर मुसलमानांवरील अत्याचाराचा विषय असेल किंवा पाकमध्येच चिनी कंपन्यांनी पाकिस्तानी कामगारांना नमाज अदा करण्यापासून रोखण्याचा विवादास्पद मुद्दा, पाकमधील चीनविरोधी जनमतही खवळलेले दिसते. त्यात पाकव्याप्त काश्मिरातील नागरिकही झेलम आणि नीलम नद्यांवरील पाकिस्तान-चीनच्या एकत्रित धरण प्रकल्पाच्या विरोधात मोठ्या संख्येने निदर्शने करत रस्त्यावर उतरले. या धरण प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान, स्थानिकांचे विस्थापन आणि याचा चीनलाच होणार्‍या फायद्याविरोधात या नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. तिथे बलुचिस्तानमध्येही ‘सीपेक’च्या कामांवर ‘बलुच लिबरेशन आर्मी’कडून वेळोवेळी हल्ले होत असून चिनी कामगारांच्या हत्याही झाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान अंतर्गत चीनविरोधी रोष सध्या शिगेला पोहोचलेला दिसतो. पण, पाकिस्तानची सद्यस्थिती पाहता, आतून-बाहेरुन कितीही चटके बसले तरी चिनी ड्रॅगनला गोंजारण्याशिवाय पाकला गत्यंतर नाहीच!

 

 
@@AUTHORINFO_V1@@