मला आत्महत्या करू द्या! : एसटी कर्मचाऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    06-Jul-2020
Total Views |
UT _1  H x W: 0
 
 


 

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीतील कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. तसेच परवानगी देणे शक्य नसेल तर सीमेवर चीनशी युद्ध करण्यासाठी मला पाठवावे जेणेकरून तिथे माझे मरण सत्कारणी लागेल, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आईच्या आजारावर उपचार करू न शकल्याने तसेच गेल्या कित्येक दिवसांपासून पगार मिळत नसल्याने त्याने ही मागणी केली आहे. 


एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात काम करणाऱ्या आनंद हेलगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्याच सरकारच्या खात्याच्या भोंगळ कारभारामुळे आपल्या जीवनाची कशी दुर्दशा झाली आहे, हे त्यांनी पत्रात मांडले आहे. या पत्रात ते म्हणतात, प्रति, मुख्यमंत्री साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र. विषय आत्महत्या किंवा चीन सीमेवर लढण्यासाठी परवानगी मिळणे बाबत.' असा या पत्राचा मथळा आहे. 


ते म्हणतात, "मी विनंती अर्ज करतो की, 'मी १९९९ पासून एसटी महामंडळात मुंबई सेंट्रल विभागात चालक म्हणून सेवेत आहे. दमा व मधुमेहाचा त्रास असल्याने मी सेवानिवृत्तीची मागणी विभागाकडे केली होती. मात्र, ती विनंतीही मंजूर झालेली नाही. लॉकडाऊनमध्ये मी अत्यावश्यक सेवेत काम करत आहे. मार्च २०२० पासून आम्हाला सरकारी निर्देशित नियमांनुसार वेतन मिळालेले नाही. यामुळे माझ्यावर आणि कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे."


"माझ्या आईला कॅन्सरसारखा दुर्धर आजार आहे. तिच्यावर शस्त्रकियेसाठी मी महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत मदतीसाठी अर्ज केला होता. मात्र, शस्त्रक्रिेयेसाठी तिही मदत मिळालेली नाही. वरील सर्व बाबींमुळे मला आत्महत्या करण्यासाठी किंवा भारत-चीन सीमेवर जाऊन लढून मरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मी पत्राद्वारे करत आहे."


दरम्यान, हे पत्र मिळाल्यानंतर तरी किमान आनंद हेलगांवकर यांना मदत मिळेल का हा देखील प्रश्नच आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारविरोधात जनआक्रोश तीव्र झाला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या वाहनखरेदीसाठी विशेष बाब म्हणून परवानगी देणारे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऐकणार का, असा प्रश्न आता सामान्यांकडून विचारला जात आहे.






Letter to UT _1 &nbs