इच्छाशक्तीचे ईप्सित...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2020
Total Views |


will power_1  H
 

आपण लोकांना पसंतीची संधी दिली तर प्रत्येकाला इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे असते. इच्छाशक्तीच्या मुळाशी काय आहे, तर आपल्या छोट्या-छोट्या मोहांना बळी न पडता आपल्या जीवनातील महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षांना कितीही वेळ लागला तरी प्राप्त करण्याची इच्छा आणि बांधिलकी. यासाठी आपल्याला छोट्या-छोट्या मोहांना दूर ठेवायला लागते.



महात्मा गांधी यांनी ‘इच्छाशक्ती’ या संकल्पनेचे वर्णन अगदी साध्या सोप्या शब्दांत केले आहे. माणसाचे सामर्थ्य त्याच्या शारीरिक सक्षमतेतूनच येत नाही, तर ते त्याच्या अदम्य उत्साहातून येते. ‘इच्छाशक्ती’ ही संकल्पना तशी नवीन नाही. तथापि, जितक्या सहजपणे तिचा उल्लेख केला जातो, तितकी ती सहज नाही. सर्वसामान्यपणे इच्छाशक्ती तितकी सामान्यही नाही. आपण अगदी सामान्य आणि दैनंदिन गोष्टींमधून इच्छाशक्तीचा संदर्भ देत असतो. व्यसन सोडायचे असेल, वजन कमी करायचे असेल, दैनंदिन व्यायाम करायचा असो वा बचतीचा संकल्प असेल, या गोष्टींमध्ये इच्छाशक्तीच्या बळावर मात करता येईल, असा ‘पॉप्युलर’ समज आहे. अर्थात, वर्तवणूक शास्त्राचे या विविध वागणूक संबंधीचे विवेचन वेगळे आहे, ते आपण पाहूच. पण, बहुतेक लोक इच्छाशक्ती किंवा ‘Will Power’ या संकल्पनेला ‘सुपरपॉवर’ मानतात.


मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ‘इच्छाशक्ती’ म्हणजे एक प्रकारचा मेंदूचा स्नायू आहे. एका बॉमिस्टर नावाच्या शास्त्रज्ञाने इच्छाशक्तीची तुलना बौद्धिक स्नायूशी करून हा स्नायू जास्त वापरला तर थकून जातो, असे नमूद केले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, जर योग्य विश्रांती आणि आराम मिळाला, तर पुन्हा हा स्नायू पूर्वीसारखाच बळकट होऊ शकतो. बर्‍याच जणांनी इच्छाशक्तीची स्नायूची ही कल्पना स्वीकारली आणि जसा आपण नियमित व्यायाम करून स्नायूंना बळकटी देतो, तसेच इच्छाशक्तीलाही बळकट करण्यासाठी दीर्घकालीन मानसिक संवर्धन करायला सुरुवात केली. पण, इतर शास्त्रज्ञांनी मात्र या सिद्धांतावर विश्वासच ठेवला नाही. त्यांच्या मतानुसार, आपण जर इच्छाशक्तीचा अतिवापर केला, तर तिचा र्‍हास होतो. या सिद्धांतावर विश्वास ठेवला, तर तिचा र्‍हास होतो आहे, हा अनुभव आपल्याला येईलच. परंतु, आपण इच्छाशक्तीचा उपयोग करताना ती वाढत चालली आहे, असा विश्वास ठेवला तर आपली इच्छाशक्ती नक्कीच सक्षम होत जाईल. याचा थोडक्यात बोलका कयास असा होतो की, तुमच्या इच्छाशक्तीची ताकद ही तुमचा विश्वास कशात आहे, तिच्या संवर्धन होण्यात की, तिचा निचरा, यावर अवलंबून आहे. शेवटी ते स्वनिश्चयाचे भाकीत आहे. असं म्हणतात ना की, यशस्वी माणूस आणि इतर लोकांमध्ये ज्ञानाचा फरक नसतो. ताकदीत फरक नसतो. अनुभवाचा फरक नसतो, तर फरक असतो तो इच्छाशक्तीचा. शेवटी सक्षमता कशात आहे, तर ती दुर्दम्य इच्छाशक्तीवर आहे. कारण, मेहनत तर बरेच जण करतात.


अर्थात, मानसशास्त्रात ‘इच्छाशक्ती’ या विषयावर संशोधन किचकट आहे. या संकल्पनेला जनसंप्रदायाने खूप सोपा आणि सहज असा मानवी अनुभव मानला आहे. त्यामुळे वास्तविक जगात इच्छाशक्ती खरी कशी प्रतिबिंबीत होत असते, याचे परिमाण घेता येत नाही. एखाद्या व्यक्तीसाठी ज्या कृतीत इच्छाशक्तीची गरज आहे, ती त्या व्यक्तीसाठी किती अर्थपूर्ण आहे, हे समजणे शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इच्छाशक्तीची पातळी वेळोवेळी बदलत असते. दिवसागणिक बदलत असते. एखाद्याला एका प्रसंगात जबरदस्त इच्छाशक्तीची अनुभूती येते, तर त्याच व्यक्तीला दुसर्‍या प्रसंगात अनेक प्रयत्न करूनसुद्धा घोर निराशा पदरी पडते. यासाठीच एखादी कृती वा प्रसंग त्या व्यक्तीसाठी किती अर्थपूर्ण आहे, किती कळकळीचा आहे, हे मोलाचे ठरते. म्हणूनच आपल्याला इच्छाशक्तीची कार्यपद्धती कळत नाही. कदाचित कळणारही नाही. कारण, ती आपली स्वतःची अनुभूती आहे. ती वस्तुनिष्ठपणे जाणून घेणे जरा कठीणच आहे.


आपण लोकांना पसंतीची संधी दिली तर प्रत्येकाला इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे असते. इच्छाशक्तीच्या मुळाशी काय आहे, तर आपल्या छोट्या-छोट्या मोहांना बळी न पडता आपल्या जीवनातील महत्त्वाच्या महत्त्वाकांक्षांना कितीही वेळ लागला तरी प्राप्त करण्याची इच्छा आणि बांधिलकी. यासाठी आपल्याला छोट्या-छोट्या मोहांना दूर ठेवायला लागते. उदा. डाएट नियंत्रणात आणावे लागते. उद्या ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा, तर घरदार विसरून प्रशिक्षिकाबरोबर सरावासाठी त्या ठिकाणी राहावे लागते. यासाठी मनात येणार्‍या सुखासीन विचारांवर, भावनांवर मात करावी लागते. स्वतःवर स्वतःलाच जाणीवपूर्वक प्रयत्नांनी नियोजन करायला लागते. इच्छाशक्तीवर सतत मेहनत घ्यायला लागते, नाहीतर त्याचा स्रोत कधी संपेल, याची शाश्वती देता येत नाही. आपण जेव्हा जेव्हा इच्छाशक्तीचा विचार करतो, तेव्हा आपल्याला किती गोष्टींची हाव सोडायची आहे, किती प्रलोभनांना दूर ठेवायचं आहे, याची आव्हाने समोर दिसू लागतात. आपल्याला आपल्या साध्या प्रलोभनांना अगदी साखर किंवा मिठालासुद्धा ‘नाही’ म्हणताना किती पीडा होते बरं! (क्रमशः)

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@